निसर्गाशी नाते म्हणजे, ‘रात्रीच्या अंधारातही चमकणारे तारे आशेचा किरणच’; स्वाती मराडे
'गुरूवारीय चित्रचारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

निसर्गाशी नाते म्हणजे, ‘रात्रीच्या अंधारातही चमकणारे तारे आशेचा किरणच’; स्वाती मराडे
‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘त्याची मुलायम माया, जणू कंच पाते,
उदय ते अस्त जुळले निसर्गाशी नाते..!’
आकाश, जल, अग्नी, वायू व पृथ्वी.. पंचतत्वांनी तयार झालेला देह. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अतूट नाते निसर्गाशी. आकाश.. उगवतीचे नी मावळतीचेही. सुरेख रंगांची उधळण करीत किती सुरेख संदेश देते. उगवणं असो की मावळणं असो, सोनेरी क्षणच हृदयात जपणारे नि स्थितप्रज्ञासम स्थिर बुद्धीचा प्रत्यय देणारे. जल.. याचेच दुसरे नाव जीवन. पृथ्वीतलावरच नव्हे तर देहातही याचं अधिराज्य. दोन तृतीयांश याचाच वाटा. त्याची रूपेही अनेक. प्रत्येक रूपही लोभसवाणे. अग्नी.. तसेतर वरवर रौद्रपण दाखवणारे, पण ऊब हवी असेल, तर अग्नीच पाहिजे. पोटातील अग्नी म्हणजे भूक.. ही भकेची आग विझवण्यासाठी अन्न शिजवून देतो तोही अग्नीच.
वायू.. चंचल. कधी वेगाने धावणारा तर कधी अगदीच गपगार बसणारा. अगदी मनासारखा. जणू मानवी भावभावनांशी नाते सांगणारा. पृथ्वी.. ‘देह मातीचा मातीत जाणार’ किती सार्थ उक्ती आहे ही. अगदी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ‘पादस्पर्श क्षमस्वमें’ म्हणत तिचेच चिंतन मनात येते नि दिवसाची सुरूवात होते नि तिच्याच कुशीत पहुडत दिवस सरतो. केवळ दिवसच नव्हे तर देहाचं देहपणही तिच्याच कुशीत सरतं.
देहाचा आकार घेत असतानाच निसर्गाशी नाते सांगणारा जीव, जीवन जगत असतानाही त्याच्याकडून अनेक पाठ घेतो. फुलासारखं निरागस फुलणं असो की संघर्षाच्या काट्यावर चालणं असो. विशाल असूनही सागरासम संयम बांधणं, मार्गात कितीही अडथळे आले, तरी खळखळत राहून पुढे पुढे चालायचं हे नदीचं वागणं, असतील ते ढग काळे.. पण तेच तर पाऊस सोबत आणतात नि रंग नव्हे तर कर्म महत्वाचे याची ग्वाही देतात व त्याच काळ्या रंगावर सप्तरंगी इंद्रधनुष्य रेखाटतात. रात्रीच्या अंधारातही चमकणारे तारे आशेचा किरणच नव्हेत काय? उंच उंच पर्वत, खोल खोल दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे, रणरणते वाळवंट, अवकाश पोकळी ते अणुरेणू.. कितीतरी विसंगत रूपे ही त्याची मानवी स्वभावातील विसंगती तर अधोरेखित करत नसतील? नक्कीच करत असतील. कारण माणसाचे अतूट नाते आहे निसर्गाशी.
आणखी किती नाती सांगता येतील या निसर्गाशी. निसर्गच तर आपले पोषणही करतो. तोच वाढवतो नि त्यातच आपण विलीनही होतो. तो पालनकर्ता आहे, तो गुरू आहे, तो वैद्य आहे, तो दाता आहे, तो प्रेरक आहे.. नि तनमनाला प्रसन्नतेची अनुभूती देणारा सखाही आहे. तरीही कधी कधी माणूस कृतघ्न होत निसर्गाची नासाडीही करतो. स्वार्थापायी निसर्गात ढवळाढवळही करतो. तेव्हा मात्र मन उद्विग्न होते. कदाचित त्याचेही होत असेल अन् तो दाखवत असेल भूकंप, पूर, वादळ या रूपातून त्याचे रौद्ररूप.
आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र निसर्गाशी नाते सांगणारे. निसर्गातील पाणी व हिरवळ ही नेहमीच मनाला भुरळ घालणारी रूपे. निसर्गाच्या या रूपांवर आधारित, निसर्गाची परोपकार वृत्ती, निसर्गाकडून मिळणारी शिकवण, माणसांकडून होणारी कृतघ्नता, मानवी मन व देहाशी असणारे तादात्म्य.. या सर्वांचा सारस्वतांच्या रचनेतून झालेला उल्लेख मनभावनच. चित्रातील भावार्थ शोधून शब्दबद्ध करणाऱ्या सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ.स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक,मराठीचे शिलेदार समूह





