Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

संत एकनाथ : भक्ती, समता आणि लोकप्रबोधनाचा तेजस्वी दीप

अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर

0 5 1 8 0 1

संत एकनाथ : भक्ती, समता आणि लोकप्रबोधनाचा तेजस्वी दीप

“जे जे भेटे भूत ते ते मानीजे भगवंत.!” प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घडवणारी ही संतवाणी म्हणजे संत एकनाथांच्या जीवनतत्त्वज्ञानाचा सार आहे. भक्ती, करुणा, समता आणि विवेक या मूल्यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात आणि वाङ्मयात दिसून येतो. महाराष्ट्राची संतपरंपरा ही अध्यात्म, समता आणि मानवतेच्या तेजाने उजळलेली आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्याप्रमाणेच संत एकनाथ हेही या परंपरेतील अत्यंत तेजस्वी आणि लोकाभिमुख संत होते. आपल्या प्रासादिक वाणीने, गूढ तत्त्वज्ञानाने आणि अभंग-भारुडांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला भक्तीचा, विवेकाचा आणि समतेचा मार्ग दाखवला.

संत एकनाथांचा जन्म पैठण येथे सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांच्या पोटी झाला. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी केले. बालपणापासूनच त्यांच्या स्वभावात शांतता, अभ्यासू वृत्ती आणि अध्यात्माची ओढ दिसून येत होती. जणू काही लहान वयातच त्यांच्या अंतःकरणात भक्तीचे बीज रुजले होते. लहान वयातच त्यांचे संस्कृत भाषेचे आणि नैमित्तिक ब्रह्मकर्माचे शिक्षण सुरू झाले. पण त्याच काळात त्यांच्या मनात अध्यात्माची तीव्र ओढ निर्माण झाली. सद्गुरूंच्या शोधासाठी ते घरात कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. अखेर देवगिरी येथे त्यांना जनार्दन स्वामी भेटले आणि त्यांनी त्यांनाच आपले सद्गुरू मानले. संत एकनाथांचा दैनंदिन क्रम अत्यंत साधा पण सात्त्विक होता. दारी आलेल्या अतिथीला भोजन देणे, ईश्वराचे नामस्मरण करणे, कथा-कीर्तन करणे, अध्यात्माचे विवेचन करणे आणि ग्रंथलेखन करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या आयुष्यात भक्ती ही केवळ विचारांत नव्हती, तर ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत होती. मानवाने मन शुद्ध केले तर देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही, हा संदेश देताना ते म्हणतात,

देह देवाचे मंदिर
मन करावे पवित्र.

भक्तीचा खरा अर्थ सांगताना संत एकनाथ अंतर्मुख होऊन म्हणतात

“काया ही पंढरी
आत्मा पांडुरंग.”

भक्ताच्या अंतःकरणातच पांडुरंगाचे वास्तव्य असते, हा अत्यंत गूढ पण सुंदर आध्यात्मिक अर्थ या ओळीतून व्यक्त होतो. इ.स. १५७० च्या सुमारास संत एकनाथांनी भागवतपुराणाच्या अकराव्या स्कंधावरील टीकेचे लेखन सुरू केले. भागवतासारख्या पवित्र ग्रंथावर टीका लिहिण्याचा अधिकार नाही असे म्हणत काशीतील काही सनातनी लोकांनी त्यांचा अपमान केला आणि त्यांना काशीला बोलावले. परंतु संत एकनाथांनी अत्यंत संयमाने हा अपमान सहन केला. काही काळ ते काशीमध्ये राहिले आणि तिथेच त्यांनी आपला ग्रंथ पूर्ण केला. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन पुढे काशीतील विद्वानांनी त्या ग्रंथाचा गौरव केला आणि त्याची पालखीतून मिरवणूक काढली. हा ग्रंथ पुढे “एकनाथी भागवत” या नावाने प्रसिद्ध झाला.

याशिवाय त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. लोकप्रबोधनासाठी त्यांनी अनेक भारुडे आणि गवळणी रचल्या. त्यांच्या भारुडांतून समाजातील अंधश्रद्धा, दांभिकपणा आणि विसंगतींवर त्यांनी प्रभावी प्रहार केला.

त्यांच्या काही भारुडांनी लोकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. त्यांपैकी एक प्रसिद्ध भारुड

“दादला नको ग बाई…”

तसेच त्यांच्या आणखी एका भारुडात ते म्हणतात

“विंचू चावला, विंचू चावला
सत्वर पाव ग मला…”

या भारुडांतून ते मानवी दुर्गुणांचे प्रतीकात्मक चित्रण करतात आणि लोकांना विवेकाचा मार्ग दाखवतात. संत एकनाथांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध आवृत्ती तयार केली. ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखित पोथ्या गोळा करून त्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि संशोधन करून शुद्ध स्वरूप तयार केले. आज महाराष्ट्रात प्रचलित असलेली ज्ञानेश्वरी ही संत एकनाथांनी संशोधित केलेली आवृत्ती आहे.

संत एकनाथांना संस्कृतबरोबरच अरबी, फारसी, उर्दू आणि हिंदी या भाषांचेही ज्ञान होते. विद्वत्ता, लोकसंग्रह, प्रासादिक वाणी आणि समाजाविषयीची करुणा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. सत्यनिष्ठा, विवेक, निष्कलंक चारित्र्य आणि सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर त्यांनी आपले जीवन उभे केले. समाजात समता आणि मानवतेची भावना रुजवणे हेच त्यांच्या कार्याचे ध्येय होते. संत एकनाथांचे संपूर्ण जीवन हे भक्ती, करुणा आणि लोकप्रबोधन यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. म्हणूनच त्यांच्या वाणीतून व्यक्त झालेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. खऱ्या अर्थाने मानवतेची शिकवण देणारे संत म्हणून संत एकनाथ महाराष्ट्राच्या संतपरंपरेत सदैव अजरामर राहतील.

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे