“इंटरनेटच्या जमान्यात अडगळीत पडलेलं …आईचं पत्र”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“इंटरनेटच्या जमान्यात अडगळीत पडलेलं …आईचं पत्र”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“आईचं पत्र हरवलं …तेच आम्हाला सापडलं…” हा बालपणाला आनंदात, उत्साहात जगवणारा खेळ. या खेळामध्ये जितके मुले जास्त तितकी रंगत वाढते. मुलांच्या संख्येचा तसा नियम नाही .सर्व मुले गोलाकार बसतात .या खेळासाठी फक्त एक रुमाल इतकेच साहित्य लागते. एक मुलगा तो रुमाल घेऊन गोलाच्या बाहेरून( सर्व मुलांचे तोंड गोलाच्या आत) आईचे पत्र हरवले म्हणतो, गोलातील मुले तेच आम्हाला सापडले म्हणतात. हा फिरणारा मुलगा हळूच नकळत एखाद्या मुलाच्या मागे रुमाल टाकतो आणि पुढे जातो. ज्याच्या मागे रुमाल टाकला त्याला वेळीच समजले तर तो राज असणाऱ्या मुलाच्या मागे पळतो. तो पटकन त्या रिकाम्या जागी पळत जाऊन बसला तर ज्याच्या मागे रुमाल टाकला त्याच्यावर राज येते किंवा त्याने तो बसण्याच्या आत त्याला पकडले तर पुन्हा पहिल्या मुलावरच राज येते. तसेच आपल्या मागे रुमाल आहे हे समजलेच नाही तर राज असणारा मुलगा एक राउंड मारून त्याच्या पाठीत धपाटा मारतो व त्या मुलावर राज येते. असा गमतीशीर असणारा हा खेळ आता मोबाईलच्या, व्हिडिओ गेम च्या दुनियेत हरवत चालला आहे.
आज राहुल दादांनी ‘आईचं पत्र’ हा विषय दिला आणि तो एका खेळाभोवती न राहता मनात अनेक विचार नाचू लागले. दूर ठिकाणी शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्या मुलाला आईने लिहिले पत्र, त्यातील मार्गदर्शन व गावातील हृदय द्रावक परिस्थिती. सैनिक बनून देशाचे संरक्षण करणाऱ्या मुलाला आईने लिहिलेले पत्र त्यातील तिच्या अनमोल भावना. सोशल मीडियावर सध्या आईला मुले सांभाळत नाहीत त्या आईने पत्र लिहून गुपचूप घेतलेला निरोप, आपल्या आईने काम केले म्हणून तिला मोबदला देणारा गर्विष्ठ मुलगा व त्याला हिशोब करता येणार नाही असे तिचे लिहिलेल्या कामाचे पत्र. स्वर्गात आई गेल्यानंतर मुलांची मानसिकता सांभाळण्यासाठी नातेवाईकांकडूनच येणार आईचं पत्र. कितीतरी अनमोल ह्रदय द्रावक डोळ्यात अश्रू उभे करणारे प्रसंग…
खरंच ज्याच्याकडे आई आहे तो सर्वात श्रीमंत आणि ज्यांच्याकडे आईने लिहिलेली पत्र आहेत अगदी सांभाळून ठेवलेली तो खरा भाग्यवान. आईच्या भावना समजणं, तिचं प्रेम समजणं आजच्या पिढीला खरंच जमतंय का? हा पडलेला प्रश्न. आई-वडिलांना कधीही उलट शब्दाने बोलू नये त्यापेक्षा कोणतीही मोठे पातक नाही ही माझी नियमित शिकवणी असते. विद्यार्थीही भाऊक होऊन ऐकतात.” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हेच खरे..!”
आज समूहात आईचे पत्र हा खेळ जसा रंगला तसेच वेगवेगळ्या भावभावनांनीही आईचं पत्र समूहात वाचलं गेलं. वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करून विषय निराळ्या पातळीवर घेऊन जाणे जमले की काव्यकल्पना जमलीच की. त्यात अंतर्मनातून येणाऱ्या भावना आणि बाल सुलभ शब्दांची, कल्पनांची फोडणी टाकली की मग काव्य कसे फुलते. वेगवेगळ्या कल्पनांना भरारी देण्यासाठी सर्व कवी मनाच्या, बाल मनाच्या समूहातील बंधू भगिनींना शुभेच्छा. मला परीक्षण लेखनाची राहुलदादांनी संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण.. तूर्तास थांबते धन्यवाद…!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/ मुख्य परीक्षक
मराठीचे शिलेदार समूह



