शब्दबाण मारणे नेमबाजीचे करतबच’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
‘शब्दबाण मारणे नेमबाजीचे करतबच’; सविता पाटील
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
झालेत ३५० वर्षे..! पण आजही धमन्यांमधील रक्त सळसळ करण्याची ताकद केवळ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे. तोंडातून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” हा जयघोष बाहेर पडतो आणि ऊर्जा शरीरांतर्गत निर्माण होते. शून्यातून विश्व निर्माण करणं तसं प्रत्येकाला थोडं जमतं?? आऊसाहेबांच्या इच्छेनुसार रयतेचे स्वराज्य निर्माण करणं हा एकच ध्यास घेऊन पुढे जाणारे आबासाहेब हे खरे नेमबाज होते. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणं असो की, शाहिस्तेखानाची बोटे छाटणं असो, आग्र्याहून सुटका असो की मिर्झा जयसिंग सोबत केलेला तह असो. प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या वैचारिक नेमबाजीचं दर्शन घडतं.
‘नेमबाज’ म्हणजे केवळ बंदुकीच्या गोळीने अचूक लक्ष्यभेद हा मर्यादित अर्थ न घेता आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतांना प्रयत्नांची पराकाष्ठा करणे असा घेणे गरजेचे आहे. स्वराज्य हे लक्ष्य अचूकपणे वेधणारे छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. आज भलेही आम्ही विज्ञानवादाच्या गोष्टी करत असू, परंतु महाराजांनी विज्ञानवादी दृष्टीकोन त्या काळीच जोपासला होता. त्यांनी बहुतांशी लढाया अमावस्येच्या रात्रीच लढल्या आणि जिंकल्या देखील. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास आजही १३६ पेक्षा जास्त देशांमध्ये केला जातो.
आपल्या वैचारिक नेमबाजींना अनेकांना घायाळ करणारे नेस्तनाबूत करणारे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे, “जनतेचे हक्काचे स्थान आणि तमाम मराठी मनाचा अभिमान”. कालपरत्वे सर्वच बदलते…. तसं नेमबाजी ही बदलली. सध्या ऑलम्पिक खेळांचे पर्व सुरू आहे. तेव्हा तिथली नेमबाजी जरा भिन्न. बंदूक, पिस्तुल, रिव्हॉल्व्हर इत्यादी साधनांनी स्थिर अथवा हलणाऱ्या निशाणावर नेम धरून गोळी मारण्याचा खेळ म्हणजे नेमबाजी आणि खेळणारा नेमबाज. २००४ च्या अथेन्समधील राजवर्धन राठोडच्या रौप्य पदकापासून बीजिंग मधील अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकापर्यंत. सध्या पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज ‘मनू भाकर’ने एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदक मिळवण्याची केलेली किमया हे सर्वच गौरवास्पद आहे. हरियाणाची ही कन्या खऱ्या अर्थाने प्रतिभावंत आहे.आजवर अनेक पदकांसह नवनव्या विक्रमांना गवसनी घालण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. पैलवान घडवणाऱ्या हरियाणाच्या या मातीत जन्माला आलेली ही एक अनमोल रत्न आहे.
मराठी साहित्यिक रसिकांना बाह्यजगातील घडामोडींसह मराठी साहित्याशी संबंध जोडून काव्य प्रभूंचे ज्ञान अद्ययावत करणे हा तर राहुल सरांचा हातखंडाच आहे. ‘शब्दबाण मारणे नेमबाजीचे करतबच म्हणायला हवे’. तेव्हाच तर आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी “नेमबाज” हा विषय दिला थोडं वेगळं लिहिण्याचं जणू आमंत्रणच दिलं. अर्थात विषयाला न्याय देणाऱ्या अनेक रचना सर्व समूहांमध्ये आल्यात. बहुतांशी रचना या मनू भाकरच्या कामगिरीचे कौतुक करणाऱ्याच होत्या. तेव्हा तुम्हा सर्वांना माझी नम्र निवेदन की, आपल्या विचारांचा वारू दाही दिशांना उधळू द्या निश्चितच दर्जेदार रचना तुमच्या लेखणीतून बाहेर येतील. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह





