महापुरुषांची जयंती:काल व आज
बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड
महापुरुषांची जयंती:काल व आज
‘महाराष्ट्र’ ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, असंख्य क्रांतिकारकांच्या रक्ताने न्हालेली, अनेक थोर समाजसुधारकांनी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवून तयार केलेली अशी पवित्र भूमी आहे. याच भूमीत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत नामदेव, संत भगवानबाबा, महात्मा बसवेश्वर, मुक्ताबाई,बहिणाबाई अशी अनेक संत होऊन गेले. ‘ज्यांनी आपल्या आचार, विचार व विचारातून सामाजिक क्रांतीची बीज रोवण्याचे काम केलं’. त्याचबरोबर याच भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यासारखे महान व्यक्तिमत्व याच मातीतून उदयास आले. त्यांची शिकवण घेऊन देश असो किंवा आपला महाराष्ट्र असो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
आज महापुरुषांच्या जयंतीचे रुप पाहून भूतकाळातील जयंतीचे सिंहलोकन करावेसे वाटते.पूर्वीच्या काळातील महामानवांच्या महापुरुषांच्या जयंत्या वैचारिक पद्धतीने साजऱ्या केल्या जायच्या. जयंती का साजरी करावी या मागची कारणमीमांसा आपण पाहिली तर त्या काळामध्ये या महामानवाने देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी कोणते पवित्र कार्य केलेले आहे याचा मागोवा पुढच्या पिढीला समजावा म्हणून ह्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात.
महापुरुषांची जयंती साजरी करताना पूर्वीचे स्वरूप आणि आताचे स्वरूप यातील फरक जर आपण बघितला; तर त्याचे ताळतंत्र निश्चितच लागत नाही. पूर्वीच्या जयंत्या विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून साजऱ्या केल्या जायच्या. विविध देखावे, व्याख्याने, विविध प्रकारच्या स्पर्धा यातून मुलांमध्ये शैक्षणिक क्रांतीचे बीज यातून रोवले जायचे. महामानवांची चरित्रे या व्याख्यानाच्या माध्यमातून मुलांच्या समोर मांडले जायचे,आणि त्यातून महापुरुषांनी केलेल्या कार्याची ओळख आजच्या पिढीला अनुभवायला मिळायची.
भारत हा २१ शतकाकडे वाटचाल करत असताना, महासत्तेची स्वप्न ज्यांच्या उमेदीवर आणि जीवावर बघत आहे अशी आजची तरुणाई कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे याचा सर्वांनी विचार करायला हवा.आज महापुरुषांची जयंती कशा पद्धतीने साजरी होते याचे वर्णन न केलेले बरे..! स्वतःला महापुरुषांचे मावळे, अनुयायी म्हणवून घेणारी ही आजची तरुण पिढी जयंतीच्या नावावर पैसा गोळा करणे व त्याच पैशावर बॅनरबाजी करून डीजे लावून डीजेवर अशोभनीय प्रकारचे गाणे लावून त्यावर नृत्य करणे मद्यपान करणे अशा गोष्टीत मशगूल आहेत. ही महाराष्ट्राला न शोभणारी निंदनीय अशी बाब आहे.
‘महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण जयंती साजरी केली पाहिजे.’ ज्या तरुणांच्या खांद्यावर उद्याच्या देशाची धुरा अवलंबून आहे, तीच तरुणाई जर अशा प्रकारे बेधुंदपणे वागायला लागली तर, या देशाला अधोगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास वेळ लागणार नाही. वेळीच सर्वांनी सावध झालं पाहिजे. “महापुरुषांची जयंती नाचून साजरी न करता ती वाचून साजरी करावी असं माझं ठाम मत आहे.” ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले त्याच शिवाजी महाराजांच्या जयंती पुढे आज सोळा वर्षाचा तरुण मद्यपान करून, धूम्रपान करून डीजेच्या तालावर हिडीस गाण्यावर नृत्य करत असताना, त्यांच्या मनाला काय वाटत असेल याचा साधा विचारही आमच्या मनाला शिवत नाही ही गंभीर बाब आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८-१८ तास अभ्यास करून आपले शैक्षणिक ध्येय साध्य केलं आणि खितपत पडलेल्या समाजाला, मुक्या असलेल्या समाजाला वाणी देण्याचे काम त्यांनी केलं. त्याच महामानवांच्या जयंतीला आपण कशा पद्धतीने वर्तन करतो याचा विचार बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणाऱ्यांनी करायला हवा. आज महामानव जाती-जातीमध्ये विभागले गेलेले आहेत. जाती-जातीमध्ये समाजा समाजामध्ये महामानवांची जयंती साजरी करताना जी ओढ समाजासाठी पाहिजे, समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक क्रांती निर्माण झाली पाहिजे या दृष्टीने विचार न करता, ही तरुणाई परस्परांमध्ये वेगळीच स्पर्धा लावून जयंती साजरी करत आहेत.खेदाने म्हणावे वाटते की, ‘ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगावर दगड, माती,शेण यांचा मारा सहन करून मुलींच्या शिक्षणांना संधी निर्माण करून दिली त्यांचा आदर्श डोळ्यापुढे न ठेवता आजची सावित्रीची लेक म्हणणारी तरुणी सुद्धा या महामानवांच्या जयंतीमध्ये डीजेच्या तालावर ठेका धरत आहे ही प्रगत महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे’. आजचे राजकारणी लोक या तरुणाईचा वापर अतिशय वाईट पद्धतीने करतात आणि त्यांना जाती-जातीमध्ये गुंतवून ठेवतात व आपली पोळी भाजून घेतात हे आमच्या तरुणाईला कळायला अजून किती दिवस लागतील याचे संशोधन करावे लागेल.
माझी सर्वांना एक नंम्र विनंती आहे की ज्या महामानवानी, संतांनी, क्रांतिकारकानी या देशाला, या राज्याला योग्य दिशा देऊन सन्मार्गावर नेण्याचं काम केलं त्यांचा जर आपणास उदो उदो करायचा असेल व जयंती साजरी करायची असेल, तर ती शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवून साजरी करावी अन्यथा ती न केलेली बरी असं माझं वैयक्तिक मत आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर तुम्हाला करता नाही आला तरी चालेल; पण त्यांच्या विचारांना तिलांजली मात्र देऊ नका अशी आशा आपणाकडून बाळगतो.
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड



