Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

आत्मविश्वासाचे कोंदण; जगणे सुकर करते ‘प्रेमबंधन’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 9 0

आत्मविश्वासाचे कोंदण; जगणे सुकर करते ‘प्रेमबंधन’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

का लागली पानगळ
का सुरू झाला कहर,
काय बदलले अचानक
का ओसरला बहर..!”

हृदयाने भरलेला रूकार, पण ओठांवर होता नकार’. संकोचाने मन बावरून गेले. संकोचपडदा मध्ये आला नुसताच तर हो-नाही च्या हिंदोळ्यावर मन झुलत राहिले नसते. सांगता आलेच नाही मनातले प्रेम. पण… हाच नकार.. जरी मीच दिलेला.. हृदयात कळ उठवून गेला‌. मनात एक वावटळ गिरकी घेऊ लागली. प्रितीचा स्वप्नाळू रंग की वास्तवाची झालर.. द्वंद्वात मन अडकले. भवताल उदास झाला.. जणू शिशिराची पानगळच झाली नि प्रितीने फुललेले मन ओसाड भासू लागले. रितेपणही जणू ओसंडून वाहू लागले.

‘का वाटे, उदास वाणे,
कुणी लपवले, माझे चांदणे..!’

मनात कल्लोळ, नजरेत आवेग. बंद पापणी आडही तोच चेहरा, भवताली भिरभिरणारी तीच आठवांची फुलपाखरे.. अन् उलगडू लागतात मग प्रीतपदर.. कुणाच्या तरी प्रेमात असणं किंवा कुणीतरी आपल्या प्रेमात असणं या जाणिवेनेच सर्वांगावर मोरपीस फिरू लागतं. एवढ्या गर्दीत तोच चेहरा का आठवांत यावा? त्याचीच का ओढ वाटावी.. ? मनात खोल खोल का झिरपत रहावा? हेच का ते प्रेमबंधन असावे?

“का लाजली धरती गं
प्रेमाला आली भरती गं,
मेघझरेतून असा झरला
चिंब प्यायली पिरती गं..!”

प्रेमविरही मनाची तगमगही मग प्रीत चांदणे शिंपडते नि आठवते मग युगानुयुगे रविभोवती फिरणारी धरा.. जणू प्रितयाचना करणारी. आठवते ती किना-यावर जीव ओवाळून टाकणारी लाट.. ‘प्रेम बंधनात मी’ असे म्हणत विरघळणारी..! मी कशी तुला रे भुलले, मन वेडे तुजवर जडले’ असे गोड गुणगुणत वेडावणारी.

धावत आली लाट
किना-यास बिलगली,
गोड प्रेमबंधनात
सहजपणे विरघळली..!’

हे प्रेमबंधन हवेहवेसे वाटू लागते अगदी त्या किना-यास बिलगणा-या लाटेसारखे. नकाराचाही होकार करणारे, पानगळीच्या जागी अंकुर फुटून पल्लवित होणारे व वसंतासम बहरून येणारे. हे तेच प्रेमबंधन.. मनातला कल्लोळ शांतवत.. सोबत करणारे, सहवासाचा गंध देणारे. शब्दावीण सारं काही सांगणारे. स्पर्शावीण अद्वैत घडवणारे.. केवढं सामर्थ्य आहे या प्रेमात. जेव्हा त्यास मीरेच्या उत्कट प्रीत भक्तीचा स्पर्श होतो; तेव्हा त्या संतहृदयाच्या अथांगतेमुळे प्रेमास आणखी व्यापक अर्थ प्राप्त होतो.

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर आज गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेसाठी ‘प्रेमबंधनात मी’ हे शीर्षक घेऊन आलेले चित्र.. मावळतीकडे निघालेला सूर्य जणू नकाराचा अंधार येण्याआधी मनात प्रीतचांदणे फुलवतो व आकाशात सोनेरी रंगाची उधळण करतो. प्रेम असेल तर, मग त्यासाठी मनास ओढ लावणारे गोड बंधनही हवेहवेसेच वाटते. हातात घेतलेला हा हात आयुष्याच्या अस्तापर्यंत असाच साथ देत राहील याचीच जाणीव करून देणारे हे चित्र पाहून अनेक आशयघन रचना समूहात आल्या व प्रेमसरींची जणू शब्दरूपात बरसात झाली. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे,इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक,लेखिका,कवयित्री सहप्रशासक
©मराठीचे शिलेदार समूह

4/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे