किल्ले जेजुरी गड
स्वाती मराडे-आटोळे
किल्ले जेजुरी गड
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील जेजुरी गड. गडाचे उत्तर दिशेला पायथ्यालाच जेजुरी गाव वसलेले असून गावापासून गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून पायरी मार्ग आहे. गडास सुमारे ३८५ पायरी असून या पायरी साठी ९ लाख दगडी वापरल्याचा उल्लेख ९ लाख पायरी म्हणून केला जातो. उत्तरेकडून मार्गास महाद्वार मार्ग म्हणतात. येथून पहिली वेस ओलांडली की आपण नंदीचौकात पोहचतो. येथे एका दगडी मेघडंबरीत नंदी प्रतिमा आहे येथूनच पायरीला प्रारंभ होतो. वेस ओलांडून पुढे आले की समोर एक उत्तरभिमुख देवडी दिसते ती विरभद्राची. खंडोबाचे मणिमल्लासुराबरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व दैत्यशेल यांनी केलेली चक्रव्युह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणा-या विरभद्राची यथे स्थापना केलेली आहे. येथील चढण चढून गेल्यावर आपण एका वेशीत पोहचतो. पुढे गेले की येथून दोन रस्ते फुटतात, या दोन्ही रस्त्यांमध्ये थोड्या अंतरावर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे.
डाव्या बाजूची वेस ओलांडून पुढे आल्यावर वेशीला खेटूनच शहाजीराजे व छत्रपती शिवाजीमहाराज या पितापुत्राची भेट झाली असे मानले जाते. शिल्परूपात ही भेट येथे उभारली आहे .उमाजी पुतळ्याजवळील उजव्या बाजूची वेस ओलांडून पुढे गेले की समोर उजव्या बाजूला बाणाईचे मंदिर दिसते. मंदिराची रचना सदर आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराचे समोर अनेक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात. बाणाई मंदिराजवळील डाव्या बाजूच्या पायरीने चढले की हेगडी प्रधानाचे मंदिर लागते. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडीप्रधानाची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
मुख्य मंदिरासभोवतालचा कोट अष्टकोनी असून पूर्व, उत्तर, पश्चिम दिशांनी प्रवेशद्वार आहेत. कोटास पूर्व व उत्तर दिशांना बारद्वारी आहे. संपूर्ण कोटावर सज्जा आहे. कोटाचे आतील बाजूंनी ६३ ओवरी आहेत. इस १६३७ चे दरम्यान राघो मंबाजी यांनी कोटाचे जिर्णोद्धाराचे काम केले होते. इस १७३५ नंतर सरदार मल्हारराव होळकरांनी या कोटाचे पुनर्निर्माणाचे काम सुरु केले व सरदार तुकोजी होळकरांनी इस १७७० मध्ये पूर्ण केले. भव्य असे उत्तराभिमुख महाद्वार होळकरांनी कोटाचा जिर्णोद्धार करताना उभे केले. या महाद्वारातून प्रवेश केल्यावर आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेत. या देवड्याचे पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते ते जुने महाद्वार, याच्यापुढेही दोन्ही बाजूस देवड्या आहेत. पुढील पायरी चढून गेले कि आपण देऊळवाड्यात प्रवेश करतो. प्राकारात पोहचल्यावर कोटाचे पूर्व बाजूने कोटाला टेकून उभी केलेली शेंदूर चर्चित मल्ल प्रतिमा दिसते. जवळच अष्टकोनी बगाडस्थान आहे. बगाडाचे पश्चिमबाजूस मागे दिपमाळाचे मध्ये मुख्यमंदिराचे समोर एका मेघडंबरीत नंदी प्रतिमा आहे या नंदी मागून थेट गर्भगृहातील मार्तंडाचे मुखदर्शन होते. मुख्यमंदिर व नंदी यांचे मध्ये पितळी पत्र्याने मढवलेले सुमारे २० फुट व्यासाचे कासव आहे याचा उपयोग देवाचे रंगभोगासाठी केला जातो.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



