काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी ‘मोरोपंत’
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर पुणे

काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी ‘मोरोपंत’
‘मोरेश्वर रामचंद्र पराडकर’ तथा कवी मोरोपंत, मयूर पंडित हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे होय. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. पुढे मोरोपंत वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली.
पुण्यातील पेशवेकालीन सावकार ‘श्रीमंत बाबुजी नाईक’ यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंत आपली काव्ये सजवत असत. मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून, तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. विविध वृत्तांमध्ये रचिलेले ‘कुशलवोपाख्यान’ हे त्यांचे पहिले काव्य. आर्या वृत्तातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. ‘ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची !!’
मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असतां, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले. ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्या मनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले…’
“भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे ।
ऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे ॥
ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला. मोरोपंतांच्या लहानपणी त्यांना रेवडीकरबुवांच्या कीर्तनाला जायला एकदा मना केले होते, त्यावेळी बाल-मोरोपंतांनी आर्येतच आपली तक्रार मांडली.
नित्य तुम्ही प्रभुपाशी पेढे बर्फी नवा खवा खावा ।
परि म्यां एके दिवशी रेवडीचा स्वाद कां न चाखावा ।।
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना ‘आर्याभारती’ असे म्हणले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्या वृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. ‘झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा’ आणि ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.
मोरोपंतांनी गझल (त्यांचा शब्द- गज्जल) हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा हाताळला असे मानले जाते.
मोरोपंतांची गज्जल…
रसने न राघवाच्या | थोडी यशांत गोडी ||
निंदा स्तुती जनांच्या | वार्ता वधू-धनाच्या ।
खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी ||
या गझलेतल्या पहिल्या शब्दावरून या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले. कवी मोरोपंत यांच्या नावाने बारामतीत विविध बांधकामे आढळतात. कवी मोरोपंत शिक्षण संस्था, कवी मोरोपंत पतसंस्था, मोरोपंत गृहरचना सोसायटी, मोरोपंत नाट्यगृह, बारामती नगरपरिषदेचे मोरोपंत सार्वजनिक वाचनालय इत्यादी व बारामतीमधील कऱ्हा नदीच्या काठावरील मोरोपंतांच्या जुन्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
मुख्य सहसंपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध



