स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज
शिवछत्रपती शिवाजी महाराज गरुड प्रतापी
लोळविले दुश्मनाना त्यांनी संघटित सामर्थ्यावरती
राज्य हिंदवी स्वराज्य केले स्थापन
भगवा पावित्र्याचा उभारून
19 फेब्रुवारी ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’. कारण आजचा हा दिवस सर्व रयतेच्या, शिवप्रेमींच्या आनंदाचा दिवस. ज्यांच्या नावातच शिव आहे. असे ‘छत्रपती शिवाजी राजे’ शिव शंभूचा ‘हर हर महादेव’ असा भक्तीमय, श्रद्धामय गजर करत हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.
“घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला” 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोनियाचा दिनु आला. स्वराज्य इतिहासाचं भूषण असलेल्या शिवनेरीवर नगारखान्यात सनई-चौघडे वाजू लागले. जिजाऊच्या पोटी नवरत्न जन्मले. किल्ल्यावर सगळीकडे जणू आनंदाची हर्षोल्लासाची जत्राच भरली. मग काय थाटामाटात बाळाचं बारसं झालं. नाव काय ठेवायचं शिवनेरीच्या किल्ल्यावर ‘शिवाई देवी’ तिचा वरदहस्त कायम राहील असं नाव ठेवलं गेलं “शिवाजी” अशी असावी माताजी जिचा वाटावा अभिमान पुत्र घडविला समर्थ ऐसा जो राष्ट्राची शान देशप्रेमाचे धडे गिरविले तिच्यापाशी बसून धन्य ती जिजाऊ नमन तिला लवून
असंच ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, त्या जिजाऊंच्या संस्कारातून तयार झालेलं शिवरायांचा मन म्हणजे अवघ्या मराठी मनाची शान. खरं तर शिवरायांचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या चौकटीत मावणार नाही. त्यात जिजाऊंनी दिलेली शिकवण, त्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच, ‘पुत्र व्हावा ऐसा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा’. हे सगळं करण्यासाठी लहानपणापासूनच कर्तुत्वाच बीज त्यांच्यात रोवलं गेलं. रोज संध्याकाळी देवापुढे सांजवात लावून छोट्या शिवबाला रामाच्या, कृष्णाच्या, भीमा, अर्जुनाच्या गोष्टी त्या सांगत. अभंग म्हणून दाखवत. यातून शिवरायांना संतांचे चरित्र समजले.
खेळामुळे व्यक्तिमत्व घडते जणू हे त्यावेळी जिजाऊंना माहीत होतं, म्हणून उच्च-नीच भेदभाव न करता मावळ्यांच्या मुलांबरोबर ते खेळत. त्यांच्या चटणी भाकरीत त्यांच्या बरोबर ते जेवले. त्यावेळी मावळ्यांची मुलं म्हणजे जणू मोकळ्या रानातील रानपाखरं. विविध पक्षांचा आवाज काढणारे मातीत किल्ले तयार करणे या बालसंस्कारातूनच या मावळ्यांच्या मदतीने त्यांनी नंतर किल्ले उभे केले. ते त्यांना स्वराज्य स्थापनेत मदतीला आले. आणि शिकार करणे, लुटूपुटूची लढाई करणे त्यातून उभे केलेले किल्ले मिळवणे आणि मग तिथे राज्य करणे.
मी पाचवीच्या वर्गात असतानाची एक कविता आठवते. ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या.’ या कवितेत कवीने केलेलं वर्णन, प्रसंग अगदी छोटा पण आमच्या इतिहासाच्या सरांना स्पष्टीकरणातून सांगितलं होतं… अजूनही आठवतात ते बोल…. धामधुमीचा काळ आहे सैनिक, शिपाई, मावळे तर सोडाच पण शेतात नांगर धरणारा साधा शेतकरीसुद्धा कोणाचे सैनिक कुठे जातात, इकडे लक्ष द्यायचे. स्वराज्य कार्यात कोणी दगाफटका करणारा आढळला तर त्याला हटकायचे असेच एका गावाच्या सीमेवरून जाणाऱ्या चार घोडेस्वारांना एक दहा-बारा वर्षाचा मुलगा खबरदार…. म्हणून अडवतो, त्यांना दम देतो..!
शिवबांना पाहिलं नव्हतं त्याने. तोच मुलगा त्यांच्या कार्यात त्यांना मनसुबे रचत होता. तानाजी मालुसरे ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ म्हणत मुलाच्या लग्नाआधी स्वराज्य कार्य करीत अमर झाले. अशा सर्वसामान्य रयतेचा असामान्य राजा म्हणजे शिवसूर्य हा चमकून गेला पावन महाराष्ट्रावरती सद्भावाने या सूर्य गुणांची करू या पंचारती. शिवजयंती निमित्ताने ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा’.
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
=========



