विदर्भाचे नंदनवन ‘चिखलदरा’
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
विदर्भाचे नंदनवन ‘चिखलदरा’
विदर्भाचे नंदनवन असलेले ‘चिखलदरा’ अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे वनविभागाचे वनपाल प्रशिक्षण केन्द्र आहे.सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. व्याघ्रप्रकल्पाच्या सुरवातीला सेमाडोह येथे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे गेस्ट हाऊस व माहिती केंद्र आहे. तसेच वनविभागाचे कार्यालही आहे. जंगलात जाण्याआधी येथून परवानगी घ्यावी लागते. ऑक्टोबरपासून जूनपर्यंतचा कालावधी येथे भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो.
चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे.
येथे पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. विराटनगरीतील जुलमी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंड येथे पाहायला मिळते.
हिरवळीचा गालिचा, विविध प्राणी, जैविक वनस्पती व वनांनी हा प्रदेश समृद्ध आहे. त्याचवेळी दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, खोल दऱ्या श्वास रोखून धरायला लावतात. उंचावरून कोसळणारे धबधबे रौद्रभीषण सौंदर्याची अनुभूती देतात. विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी, आल्हाददायक वातावरणामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत करतात. खाली उतरलेल्या ढगांमुळे तर प्रत्यक्ष स्वर्गाचाच अनुभव येतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांसोबतच जंगली अस्वल, बिबटे, सांबर आणि जंगली कुत्रेही पहायला मिळतात.
याशिवाय भटकंतीसाठी देवी पॉईंट, पंचबोल पॉईट, वॉटर बोटींग, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथील कॉफीचे मळेही पहाण्यासारखे आहेत. चिखलदरा, नागपूर, अकोला व अमरावती येथून बस, रेल्वे व हवाई मार्गाने जोडलेले आहे. अकोला येथून दीडशे, अमरावती येथून शंभर किलोमीटर व मध्य रेल्वेवरील बडनेरा रेल्वे स्थानकापासून ११५ किलोमीटरवर चिखलदरा आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
========



