Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

असाही किस्सा गाडीचा..!!

सौ. स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 3 0 3

असाही किस्सा गाडीचा..!!

गाडीचे किस्से’ सुरू असतानाच एकास आलेला हा एक वेगळाच गाडी शिकण्याचा अनुभव. तो त्यांच्याच शब्दांत. चार चाकी गाडी, ही सुद्धा आता जणू काळाची गरज झाली आहे. कामानिमित्त, नोकरीनिमित्त वेगळ्या गावी रहात असेल, तर कुटुंबासह गावाकडे जाताना होणारी तारांबळ टाळण्यासाठी व वेळ वाचवण्यासाठी चारचाकी गाडी खूपच उपयोगी पडते. त्यातच खेडेगावात रहात असाल तर ही गरज प्राधान्याने जाणवते. घरातील कुणाचे आजारपण असो अथवा प्रवासात ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण असो. गाडी उपयोगी पडणारच होती. याच विचाराने चारचाकी गाडी घेतली. पण रहायला खेडेगावात. गाडी चालवायला कुठे‌ शिकायचे हा प्रश्न होताच. ड्रायव्हिंग स्कूलचे फॅड तेव्हा जास्त प्रमाणात नव्हते आणि जिथे होते तिथे दररोज जाऊन गाडी शिकणे शक्यही होणार नव्हते‌. ज्याला कुणाला गाडी चालवायला जमते त्याच्याकडून धडे घ्यायचे व गाडी चालवायचे धाडस करायचे हाच जणू नियम होता‌.

असाच एक मित्र जो नेहमी गाडीविषयी माहिती सांगायचा‌ त्याला माझी अडचण सांगितली. तो म्हणाला, त्यात काय एवढं? उद्यापासूनच गाडी कशी चालवायची हे सांगतो. त्यासाठी दररोज सकाळची वेळ ठरली. तशी मला थोडीफार माहिती होती. पण गाडी कधी चालवली नव्हती. आता प्रत्यक्ष चालवायची होती. पहिल्यांदाच ड्रायव्हर सीटवर बसलेलो, मनातल्या मनात देवाचे नाव घेतले. शेजारी तो मित्र बसलेला. त्याच्या सूचनेनुसार गाडी सुरू केली. क्लच, गिअर, ब्रेक याची माहिती होतीच. शेजारी बसलेला मित्रही सांगत होता. सूचना मिळतील तसे मी गाडी हळूहळू पुढे घेत होतो. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी गाडी जमली. हळूहळू चालवत सराव करून गाडी जागेवर आणून लावली.

दुसऱ्या दिवशी आणखी जास्त लांबवर गाडी नेली व माघारी आणून लावली. अर्थात शेजारी बसलेला मित्र सूचना द्यायला होता, म्हणून काही अडचण वाटत नव्हती. तिसऱ्या दिवशी थोडा वेग वाढवून सराव केला. चौथा दिवसही असाच सरावात गेला. मात्र अजून हे सगळे मोकळ्या रस्त्यावर सुरू होते. त्यामुळे उद्या आता थोड्याफार गाड्या असतात, त्या रस्त्यावर जाऊन सराव करायचे ठरले. मित्र सोबत येणार होताच त्यामुळे भिती नव्हती. पाचव्या दिवशी आम्ही त्याप्रमाणे नवीन रस्त्यावर गेलो. वाहने येत जात होती. मी गाडी चालवत होतो. एके ठिकाणी चढ आला. समोरून एक गाडी आली आणि मला थोडे बिचकल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे माझ्याकडून गाडी बंद पडली. आता काय करायचे असे मित्राला विचारताच तो म्हणाला हॅण्डब्रेक लाव.

त्याप्रमाणे मी केले आणि गाडीतून खाली उतरलो. मित्राला म्हणालो, ‘आता तू गाडी चालवतोस का? इतर वाहने पाहून माझी थोडी तारांबळ उडतेय’. त्यावर मित्राचे उत्तर ऐकून मी चांगलाच उडालो. ‘मला कुठं गाडी चालवायला येतेय? तूच चालव. मी आहे ना सांगायला.’ ‘क्काय??… तुला गाडी चालवता येत नाही? मग मला शिकवत कसे होतास?’ ‘माहिती आहे मला गाडी कशी चालवतात ते, तू बरोबर शिकलास ना..!’ ते ऐकून मी कपाळालाच हात लावला. हा किस्सा सांगताना आता एवढं हसायला येतंय. पण तेव्हा खरेच माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे