मराठी साहित्याचा मानबिंदू; अण्णाभाऊ साठे
आशाकला कोवे- गेडाम ता.वणी जि. यवतमाळ

मराठी साहित्याचा मानबिंदू; अण्णाभाऊ साठे
या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक क्रांतिकारी समाज सुधारक, साहित्यिक ,लेखक, कलावंत होऊन गेले. प्रत्येकाची एक वेगळी प्रतिभा व अलौकिक कार्य आहेत. परंतु सर्वच प्रतिभावंताच्या वाट्याला समानतेची वागणूक आलेली नाही. कारण, त्यांच्या आयुष्याची घडण ही सारखी नाही. अनेकांना सोयीसुविधा तथा बौद्धिक, वैचारीक ,शैक्षणिक वातावरणाचा वारसा लाभलेला आहे. तर अत्यंत गरीबीत औपचारिक शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या कुटूंबामधून एक प्रतिभावंत जन्मास यावा, ही तात्कालीन आर्थिक मागासवर्गीय समाजासाठी गौरवाची बाब आहे. दारिद्रयाचे चटके सोसत, आपल्या शब्दांनी जनमनावर छाप सोडणारे एक नाव म्हणजे, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ होय.
सामाजिक परिवर्तनाच्या मालिकेमध्ये १९४० ते १९६० च्या दशकातील एक नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांनी आपल्या प्रखर शाहिरी बाण्यातून सामाजिक परिवर्तनवादी लढा दिला. रुढलेल्या विषमतावादी प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये ‘वाटेगाव’ या छोट्याशा खेडेगावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते त्यांना मधुकर, शांता आणि शकुंतला ही बहिण- भावंडे होती. अण्णाभाऊ यांचे मूळ नाव तुकाराम होते. पण पुढे त्यांचे सामाजिक व साम्यवादी चळवळीतील उभरते नेतृत्व समाजापुढे प्रखरतेने पुढे आले व त्यांना अण्णाभाऊ हे नाव रूढ झाले व तेच कायम राहिले.
लेखक किंवा कवीच्या कौटुंबिक तथा सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसतात. अण्णाभाऊ हे एका अशिक्षित…दारिद्र्याचा अभिशाप लागलेल्या तात्कालीन समाजव्यवस्थेने अस्पृश्य म्हणून संबोधलेल्या मातंग समाजामध्ये जन्मले होते. 1873 मध्ये या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणून ब्रिटिश सरकारने कायदा केला होता. कुठे चोरी झाली तर, सर्वात आधी या समुदायाकडे बोट दाखविले जाई. अशा अपराधीपणा व उपरे जीवन जगत असलेल्या, पिचलेल्या, दुर्लक्षित समाजामध्ये अण्णाभाऊंची जडणघडण झाली. अण्णाभाऊ यांचे वडील मुंबईला कामगार म्हणून कामाला होते. मुंबईसारख्या ठिकाणी राहून त्यांनी जो सामाजिक विकासाचा बदल अनुभवलेला होता तो केवळ शिक्षणामुळे आहे हे त्यांनी जाणले होते. त्यांनी गावाकडे राहणा-या आपल्या पत्नीला पत्र पाठवून मुलाला शाळेत घाल असा संदेश पत्राद्वारे पाठविला. अण्णाभाऊ सहा- सात वर्षाचे असताना शाळेत गेले मात्र सवर्ण – दलित या भेदभावामुळे ते शिकू शकले नाही. अण्णाभाऊचे शाळेतील शिक्षण केवळ दीड दिवसाचे झाले. दीड दिवसांमध्ये त्यांना शाळा सोडावी लागली.
सन 1931 मध्ये अण्णाभाऊ कुटुंबासह मुंबईला स्थायिक झाले. वाटेगाव वरून मुंबईला जाताना 227 मैलांचा चार महिने पायी प्रवास केला. मिळेल ते अत्यंत कष्टाचे काम या प्रवासामध्ये त्यांनी केले.वाटेगाव ते मुंबई हा प्रवास करताना त्यांना व त्यांच्या कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागला.
अण्णाभाऊ 13 वर्षाचे असताना त्यांचे चुलत भाऊ साधू यांचे कडून त्यांना औपचारिक शिक्षण मिळू लागले व ते वाचायला शिकले. पुढे मुंबईमध्ये दुकानांच्या पाट्या लावणे, चित्रपटांचे पोस्टर चिकटविणे हे काम करताना त्यांचे वाचन सुधारू लागले. अण्णा भाऊ यांचेवर लहानपणापासून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव होता. मुंबईला आल्यानंतर श्रीपाद डांगे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला.अण्णाभाऊ मार्क्सवादाचे वहन करीत होते. मार्क्सवादाचा प्रचंड प्रभाव आण्णाभाऊ यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला होता.
त्या काळामध्ये मनोरंजनाचे साधन ‘तमाशा’ हे होते. अण्णाभाऊ तमाशाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करू लागले. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांना वाचू लागले. त्यांचे समाज कल्याणकारी विचार समजून घेऊ लागले व तमाशा या लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करू लागले. तमाशा ही लोककला प्रबोधनाची लोकचळवळ बनली. अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक पिंड हा शाहिरी होता. लोकप्रबोधनाच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंना गवसलेले शाहीर अमर शेख व शाहीर द.ना.गव्हाणकर यांच्या सोबतीने त्यांनी ‘लालबावटा’ हे कलापथक सुरू केले. या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित कामगारांचा आक्रोश शब्दात मांडला.
अण्णाभाऊ यांनी लेखनाला सुरुवात केली ती ‘गणा’ पासून कोणत्याही लोककलेची सुरूवात ही ‘गण’ कवनाने होत असे. अण्णाभाऊंनी सत्याला… श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण लिहीला व तो प्रचलित केला. तो गण…
प्रथम मायभूच्या चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोणी गातो कवना…
अशाप्रकारे वास्तववादाचा स्वीकार करायला लावणारा ‘गण’ त्यांनी लिहिला. अण्णाभाऊ लेखणी घेऊन साहित्याच्या मैदानात विशिष्ट ध्येय घेऊन उतरले होते. अण्णाभाऊंनी समाजातील अनिष्ट रूढी-पंरपरांवर प्रहार करीत विज्ञानवादी चिकित्सक विचार समाजामध्ये पेरले. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे” हे ठणकावू सांगितले. हा वास्तववाद समाजामध्ये रूजविला. अण्णाभाऊ यांच्या लेखणामध्ये संघर्ष आहे, आक्रोश आहे… प्रत्यक्ष जे जगले…भोगले त्याचे वास्तव अनुभव विवेचन आहे. पोवाड्याच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न परखडपणे समाजासमोर त्यांनी मांडले. केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णा भाऊ प्रचंड इच्छाशक्ती व प्रयत्नांच्या जोरावर शिक्षित झाले व अनेक कथा, कादंब-या , गीतं, पोवाडे, वगनाट्य व नाटकांच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले. दलित कामगारांचे शोषण रेखाटले. 40 च्या दशकात ते साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण यांचे सोबत ते सक्रिय होते. संयुक्त महाराष्ट्रामध्ये बेळगाव, कारवार,निपाणी हे मराठी भाषिक प्रान्त समाविष्ट होऊ शकले नाही, याची सल त्यांनी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केली.
” माझी मैना गावावर राहीली
माझ्या जीवाची होतीया काहिली…”
या प्रसिद्ध गाजलेल्या छक्कड लावणी गीतामध्ये ‘मैना’ म्हणजे शृंगारिक लावणी नसून, ‘महाराष्ट्र’ अशी प्रतिकात्मक होती. अण्णाभाऊ आपले ध्येय सांगताना म्हणतात, “या महाराष्ट्रात कष्टाची कृष्णामाई अखंड वाहते…देशभक्तीची कोयना नवजीवन निर्माण करते…त्यागाचे महान कुंड सदैव धगधगत असते”.. तर इथली माती शिवरायांच्या घोड्याच्या टापांनी पुनीत झालेली आहे. इथे मराठी सैनिकांची तलवार तळपलेली आहे. “मराठी साहित्याच्या प्रतिभांनी इंद्रधनुष्य निर्माण केलेला आहे. अशा या भूमीला नंदनवन हे सार्थ नाव प्राप्त झाले आहे. तेव्हा वरील सद्भावना हृदयात ठेवून माणसं घडविण्याची धडपड मी करतो आहे.”
अण्णाभाऊंनी प्रचंड वाचन केले. डोटो व्हस्की, वार्की, खलिल जिब्रान, मायको व्हस्की हे जगप्रसिद्ध साहित्यिक त्यांच्या लेखनाचे प्रेरणास्थान होते. गार्की यांच्या भाषांतरीत झालेल्या कथा वाचून समजून घेतल्या व निळू मांग, उपकाराची फेड, यांसारख्या गाजलेल्या परिवर्तनवादी कथा त्यांनी लिहिल्या. अण्णाभाऊंनी 35 कादंब-या, 13 कथासंग्रह, 8 पटकथा, 1 प्रवासवर्णन, 3 नाटके, 10 पोवाडे, 14 लोकनाट्य, 12 उपहासात्मक लेख किंबहूना यापेक्षा जास्त लेखन केले. यामध्ये ‘फकिरा’ ही अजरामर कादंबरी लिहिली. दुष्काळामध्ये आपल्या समुदायाला भुखमरीपासून वाचविण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली व ब्रिटिश सरकारविरुद्ध विद्रोह करणारा नायक फकिरा ला चित्रित केले आहे. अण्णाभाऊंनी काही कालखंडानंतर आंबेडकरवाद स्वीकारला. ” जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव.” अशाप्रकारे बाबासाहेब अण्णाभाऊंची प्रेरणा बनले. त्यांनी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला ‘फकिरा’ ही अजरामर कादंबरी अर्पण केली. फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. फकिरा ही कादंबरी अनेक भारतीय व विदेशी भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे.
अण्णाभाऊ रशियाला गेले तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला व शिवरायांचे चरित्र सातासमुद्रापार नेले. रशियन अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रशियाच्या प्रवासावर ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन त्यांनी लिहिले. ते रशियन भाषेत अनुवादित आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून दारिद्र्य, भूक, पिळवणूक, शोषण, आक्रोश , संघर्ष, झुंज… उद्विपित होतात. यातून अन्यायाविरुद्ध लढणारा – तात्या मांग , गावगाड्याविरूद्ध लढणारा- हरबा महार, भुकेसाठी चोरी करणारा- रामू ,स्मशानात कोल्ह्यांबरोबर झुंजणारा भिमा, अमरावतीच्या तुरूंगात दिवस काढणारा- भोमक्या, स्वत:चे डोळे फोडून घेणारी गीता, दरोडेखोर नव-याला दगडाने मारणारी आबी, जात पंचायतीच्या विरोधात जाणारी हिली, समाज व्यवस्थेविरुद्ध उभी ठाकलेली चित्रा, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ इत्यादी पात्र जिवंत रेखाटले.अण्णाभाऊ यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून 43 जातींचे नायक आपल्या लेखनातून चित्रित केलेले आहेत. मराठी साहित्याला वास्तवाची जोड देणारे अण्णाभाऊ हे पहिले लेखक होते.
अण्णा भाऊ यांचे जिवंत साहित्य हे जगातील 27 भाषांमध्ये व भारतातील 14 भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहेत. त्यांच्या कथा- कादंब-यांवर 8 चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. त्यापैकी 3 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार मिळालेला आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नावर प्रखर भाष्य करणारे परिवर्तनवादी लोकशाहीर, लेखक, कवी त्यांच्या दर्जेदार साहित्याची व्याप्ती दीर्घ आहे. “हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.” असे सत्य विचार मांडणा-या या महान समाजधुरीणाचा मृत्यू 18 जुलै 1969 मध्ये वयाच्या 49 व्या वर्षी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये झाला. मात्र त्यांचे साहित्य आजही जिवंत आहे व मूर्छितावस्थेत गेलेल्या मराठी अनंत काळ अजरामर राहील. मराठी साहित्याचे उर्ज्वस्थल असलेले अण्णाभाऊंचे लेखन अनेकांना दिशा देणारे आहे. वंचित, शोषितांचा आक्रोश शब्दांतून मांडणारे साहित्यरत्न… लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ख-या अर्थाने मराठी साहित्याचा मानबिंदू आहेत. त्यांचे अजरामर साहित्य वाचून त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया. अण्णाभाऊंनी बदल घडविण्यासाठी, घाव घालण्याचा जो मंत्र आपल्या लेखणीतून दिलेला आहे त्याचे अनुकरण करूया. “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन”..!!
आशाकला कोवे- गेडाम
ता.वणी जि. यवतमाळ
(लेखिका या प्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका आहेत)



