“मनाला रिझवणाऱ्या शीतलहरीचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“मनाला रिझवणाऱ्या शीतलहरीचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
प्रीतीचा वृक्ष जेव्हा बहरला….
किती वेचली फुले ओंजळभरून…
आताच का लागली पानगळ….
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून …
आपला भारत देश ऋतूंच्या बाबतीत इतरांपेक्षा भिन्न आहे. सर्व ऋतू आपली वैविध्यता जपतात अन् या ऋतूचक्रावर आपले दैनिक चक्रही अवलंबून असते. मानवी मनासह आपण साहित्यात सुध्दा या ऋतूंना भरपूर स्थान दिले आहे. अगदी कालिदासांच्या ऋतूसंहार पासून दुर्गाताई भागवतांच्या नितांत सुंदर ऋतुचक्र पर्यंत. तसे पाहता वैज्ञानिक नजरेतून जेव्हा या ऋतुचक्राकडे पाहतो; तेव्हा पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्याने हे ऋतू तयार होतात. जेव्हा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो, तेव्हा आपल्या सर्वांचा आवडता ऋतू अर्थात हिवाळा येतो.
‘हिवाळा’ अर्थात थंडी आणि या थंडीतल्या ‘शीतलहरी’ सर्वांनाच आवडणाऱ्या, खुणवणाऱ्या, मनाला रिझवणाऱ्या असतात. हल्ली तर आपण सध्या थंडीत त्या शीतलहरी रोजच अनुभवत आहोत. उत्तर गोलार्धात कधीकधी खूप कमी किंवा शून्य रविकिरण असतात. तेव्हा थंड हवेचे प्रमाण वाढतं, आणि त्या बाहेर पडतात. खास करून उत्तरेकडून येणाऱ्या या शीतलहरी अतिशय तीव्र असतात.
यांचा अभ्यास हवामान शास्त्रज्ञ,वैज्ञानिक तर नेहमीच करतात. पण आज त्या शीतलहरींना आपल्याला शब्दात बांधण्याचे आवाहन केलं होतं ‘मराठीचे शिलेदार’ समुहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी. अर्थातच निमित्त होतं ते ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेचे. अनुभूतीला जेव्हा आपण शब्दात बांधतो, तेव्हा निर्माण होणारे साहित्य हे वास्तववादी असते. पण काल असाच अनुभव जवळपास सर्व रचनांमधून प्रकट झाला.
शीतलहरी या प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेल्या आहेतच. त्यात काही आनंद तर दु:खी भावनांचे कवडसे सुद्धा आहेत. मनातील भावनांना वाट करून देण्यासाठी या ‘शीतलहरी’चा अनुभव प्रत्येक साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून मांडावा जेणेकरून ऋतूचे महत्व पुढील पीढीसाठी कायमस्वरूपी मनावर कोरता येईल. एका पेक्षा एक सुंदर रचनांनी सर्वच कविता समूह सजलेत अन् त्या शीतलहरी तमाम मराठी सारस्वत रसिकांच्या लेखणीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ठरल्यात. खूप छान सर्वजण व्यक्त झाले. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा धन्यवाद.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह