“विच्छा माह्यी पुरी झाली……!”; वैशाली अंड्रस्कर
'असंही घडतं कधी कधी'
“विच्छा माह्यी पुरी झाली……!”; वैशाली अंड्रस्कर
‘असंही घडतं कधी कधी’
राजे हो, तुमाले माह्यी गोस्ट आयकून खरंस हासाले येईन. पर मले मातर लय दुख होताय. काऊन का हिटलिस्टमंदी नाव येण्याची माह्यी विच्छा पुरी झाली. कोंती का म्हणूनसन्यानी का ईचारता राजेहो…तं त्याची कहानी असी हाये. काल मराठीचे शिलेदार समूहात शर्यत व्हती काव्यरतन. तं म्या बी माह्यी एक कईता लेवून तीन नंबरात धाडली. आता थे परिक्षकायले पसंत पडन हे काई मले मालूम नवतं. सकायी उठूनशानी पाह्यतो तं माह्यं नाव विजयी लोकायच्या यादीमंदी…आता एवडं ठावं हाये का यादीमंदी नाव आलं का परमाणपत्रासाठी फटू सवितातायकडं पाठवा लागते. आता म्हनलं आंदी सवूबाई आपल्या सविताताई पाटील ठाकरे हो…. मुख्य परिक्षक बाई आन् साहित्यगंधच्या कार्यकारी संपादक यायचं परिक्षन दिल ❤️ लावून वाचत बसली…त्याले अभिप्राय का कां म्हनते थो देल्ला आन् सोटादुप्पटा घेऊनशानी शायेले चाल्ली गेली. आन् फटू पाठवाचं भुलूनस गेली.
आता तुमाले तं ठावंस आहे राजेहो, आता शायेमंदी नुस्तं शिकवणं नाय. कोंत्या लिंकस भर, हा कागद लिव थो कागद लिव…एक नाय बारा भानगडी….ह्या गडबडीत तेथं बी फटू धाडनं काय झालंस नाय. मंग संध्याकायी घरच्याले आली. इकडंच तिकडंच आवराआवर केली नं फोन हाती घेतला. अवं माय मराठीचे शिलेदार समूह खोलल्याबरुबर दाणकन परमाणपत्राची पिडीएफ का कां म्हंते थे दिसली नं माह्यी दांदरली. आता म्हनलं आपलं नाव हिटलिस्टमंदी याचंच होय. मोठ्या दादाले…आपलं राहुलदादा हो…त्यायले बी, सविताबाईले बी दोनचार मेसेज धाडले…काऊन फटू नाय धाडला म्हनून. पर म्हनलं एवढूशानं नाय जमाचं. आता आभाराचं दोन शबूदच लिवाचं ( बगा झाले का दोन शबूद मोजून घेवाजो मायबापहो ).
तसं मले लय दिसापासून वाटे…लोकायचे नावं हिटलिस्टमंदी येते आपलं कवा येईन ? मले असं काईबाई वाटत राह्यते. लायनी व्हती तवापासूनस. टकल्यावर तीन बुटली केस नं मायले म्हनो, माय माह्या डोस्क्यात उवा काऊन नाय होत. काऊनकाशानी आमा बहीनभावायले सांभायाले एक आशाबाय व्हती. तिले आमी बहीनच मानो. थे कोनाच्याबी मस्त उवा पाह्ये. तुमाले तं ठावं हाय…कोनी डोस्क्यात हात फेरला का लय बेस लाग्ते. डुलक्या बी येते. पर माह्या डोस्क्यात उवास नाही तं थे आशाबाय लय तरासवरास करे. तं अशावानी माह्या दुनियाच्या भायेरच्या विच्छा राह्ये. तशावानी आज हिटलिस्टमंदी याची बी माह्यी विच्छा पुरी झाली.
आखरीस मातुर झाल्या चुकीबद्दल मोठ्या दादाची राहुलभाऊ पाटील यायची माफी मागतो. ( कराल का जी माफ ? ) ???? आनी शर्यतीत माह्यी कईता निवडल्याबदल धन्यवाद देतो.
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



