मराठी अस्मिता जपणारा अष्टपैलू ‘रामोजी राव’
मराठी चित्रपटसृष्टीत रामोजीचे भरीव योगदान: तारका रूखमोडे
मराठी अस्मिता जपणारा अष्टपैलू ‘रामोजी राव’
मराठी चित्रपटसृष्टीत भरीव योगदान: तारका रूखमोडे
मनोरंजन तथा समाजप्रबोधनाचं व समाजमन परिवर्तनाचं मोठं माध्यम म्हणजे चित्रपटसृष्टी.या सृष्टीत जगातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती सुविधा करून देणारे रुपेरी चंदेरी दुनियेचे मोठे दालन म्हणजे ‘रामोजी फिल्म सिटी’ व ही कलात्मक निर्मिती करणारे प्रति विश्वामित्र म्हणजे दक्षिणात्याच्या तथा संपूर्ण भारतीयांच्या हृदयी विराजमान असलेले रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट चेरुकुरी रामोजी राव म्हणजे चित्रपटसृष्टीला लाभलेले एक अलौकिक ‘रत्न’ व समाज माध्यमाचं ‘त्रिनेत्र’च.
दक्षिणेत फिल्म इंडस्ट्रीचं जाळं उभे करण्यात त्यांचं जेवढं मोठं योगदान आहे, तेवढंच ते मराठी भाषिक नसूनही मराठी सिनेसृष्टीतही त्यांचं योगदान कमालीचं आहे हे विशेष..
होय, कमालच. कारण एकेकाळी वैभव पाहिलेल्या मराठी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी मध्यंतरी हळूहळू पाठ फिरवली होती,तेच तेच उथळ कॉमेडी चित्रपट पाहून प्रेक्षक कंटाळले होते,तामसपट व घरगुती सासू सुनेचे अत्याचार यामध्ये अडकलेला मराठी सिनेमा मध्यंतरी हरवतो की काय असे वाटू लागले होते.नव्वदच्या दशकात तर मराठी चित्रपट व्यवसाय सृष्टीला ग्रहणच लागलं होतं.चित्रपटसृष्टीची ताकद असते ती म्हणजे प्रेक्षक वर्ग.पण प्रेक्षकांची कमतरता, कमी बजेट,जातिवंत कलाकारांची कमतरता,विषयातील एकसुरीपणा अशा विविध कारणांमुळे मराठी प्रेक्षकवर्ग बॉलीवूडच्या आहारी गेलेला.एकाच पठडीतल्या मराठी चित्रपटाला या साच्यातून बाहेर आणण्याचे काम खऱ्या अर्थाने केलय ते रामोजी यांनीच.त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला त्यांचं फार मोठं योगदान मानलं जातं.
प्रतिभावान कलाकार शोधून त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन सजग निर्मिती करणे हा त्यांचा दृष्टिकोन होता. कमी बजेटमध्ये दिग्दर्शकाला मराठी चित्रपटासाठी लागणारे सर्व खरे खरे सेट्स, साहित्य फिल्मसिटीत एकाच ठिकाणी उभारून मराठी चित्रपट निर्मितीचा मार्ग सुकर करून दिला.अनेक नव्या कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटातून पहिल्यांदा संधी देऊन करिअर उभं करून दिलं. सुधाचंद्रन,रितेश देशमुख,भरत जाधव अशा दिग्गज कलाकारांना मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनीच लॉन्च केलं. २००३ मध्ये ‘चालू नवरा भोळी बायको’ या चित्रपटात अभिनेता भरत जाधव यांना पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली.आज चित्रपटसृष्टीत सुपरस्टार म्हणून त्यांना ओळखलं जातं.भरत जाधव यांच्या यशाचा मार्ग रामोजी यांनीच निर्माण केला. रितेश देशमुख व सुधाचंद्रन यांनीही आपली कारकीर्द बहारदार बनवली ती त्यांच्याच आशीर्वादानेच. सूर जुळता जुळता,बिन पैशाचा तमाशा, गुरुदक्षिणा असे कित्येक टेलिफिल्म बनवले.तसेच ई टीव्ही मराठी वाहिनी सुरू करून मराठी कलाकारांना मोठी संधी निर्माण करून दिली,त्यामुळे आपली प्रतिभा अनेक कलाकार सिद्ध करू शकले.
असा हा शूर मनाचा शूर माणूस, रत्नपारखी असलेला,कलेची जाण असणारा,कलाकार ओळखण्याची प्रतिभा असणारा,बहुआयामी व्यक्तिमत्व. सातत्याने नवी प्रतिभा शोधून त्यांना पैलू पाडण्याचे काम त्यांच्या हातून घडले. त्यांच्या कुठल्याही मराठी चित्रपटात हिंसा, बीभत्सभाव,चावट विनोद यांना थारा नव्हता.नफ्याचा हेतू तर मुळीच नव्हता. प्रतिभावान लेखकाचे कथाबीज घेऊन कुटुंबासमवेत पाहता येण्याजोगी चित्रपट त्यांनी मराठी सृष्टीला दिले. मिडिया, चित्रपट, मनोरंजन उद्योगावर त्यांनी स्वताची अमिट छाप सोडली.माध्यमातून क्रांती घडवणारे ते खरे द्रष्टे होते. कितीतरी मराठी माणसास त्यांच्यामुळे उपजिविकेचे साधन मिळाले व स्व ओळख निर्माण करता आली. मराठी मनोरंजनांच्या जगातही त्यांनी नवीन मानक स्थापन केले. त्यांच्याच नव दृष्टीकोनामुळे मराठी सिनेमाची उतरती कळा जावून नवा बहर आला.
कितीतरी वादविवादांना त्यांनी धैर्याने व समर्पणाने लढा दिला, म्हणूनच मराठी नवप्रतिभेसाठी ते महान आदर्श ठरले. तेलंगूच नव्हे तर मराठी माणसाच्या हृदयातही ते आजन्म प्रेरणास्फुर्ती रुपात अमर राहतील. अशा या महानायकास विनम्र आदरांजली.
प्रा.तारका रुखमोडे
अर्जुनी मोरगाव,जि. गोंदिया
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



