अविवाहित तरुणांना हेरून बनावटी लग्न लावून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद.!
जिल्हा प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
अविवाहित तरुणांना हेरून बनावटी लग्न लावून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद.!
दोन महिला, दोन पुरूष व अल्पवयीन मुलीला अटक
जिल्हा प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
धुळे: शहरातील अविवाहित तरुणांना हेरुन लाखो रुपये घेऊन लग्नाचा बनाव रचणाऱ्या टोळीला धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने नुकताच शहरातील एका तरुणाला लग्नाचा बनाव रचून ३ लाखांचा गंडा घातला होता. तक्रार प्राप्त होताच धडक कामगिरी करत शिताफिने टोळीला शोधून काढत यातील दोन महिला दोन पुरूष व अल्पवयीन मुलीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अशी झाली होती फसवणूक.!
धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात राहणारा तरुण ज्ञानेश्वर रोहीदास चौधरी (३२) हा आपल्या लग्नासाठी मुलगी शोधात असताना एजंट मोरे याने सुंदर अशा बनावट नवरी मुलीचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठविला. सदर मुलगी पसंत आल्याने दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी तरुणासह त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल (मध्यप्रदेश) येथे गेले. तेथे त्यांना फोटोमधील बनावट नवरी मुलगी दाखविण्यात आली.
तेथे नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते. त्यानंतर दि. २२ ऑगस्ट रोजी एजंट मोरे हा तरुणाच्या घरी गेला व सांगितले की, सदर मुलीला दुसरे स्थळ आले असुन, तुम्हाला सदर मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब ३ लाख रूपये द्या.
त्यानुसार तरुणासह त्याच्या वडीलांनी लग्नासाठी ३ लाख रुपये गोळा करून दिले. त्यानंतर दि. २३ ऑगस्ट रोजी तरुण व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल, मध्यप्रदेश येथे गेले. तेथेन बिजासनी माता मंदिर, मध्यप्रदेश येथे हिंदू रितीरिवाजानुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले.
लग्न करून वऱ्हाड बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांच्यासह घरी परत येत असताना सोनगीर येथे हॉटेल स्वागतमध्ये जेवणासाठी थांबले. याच संधीचा फायदा घेवून बनावट नवरी व तिची आई हे बाथरूमला जाण्याचे कारण सांगून हॉटेलच्या बाहेर पडले व अज्ञात इसमाचे मोटार सायकलवर बसून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाच्या फिर्यादीवरुन २५ ऑगस्ट रोजी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात अशा पद्धतीने बनावट लग्न लावून अनेकांची फसवणूक झाल्या असल्याने पोलिसांनी ही प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ तपासचक्र फिरवली व या पूर्ण टोळीचा शोध घेऊन त्यांना बेडा ठोकल्या यातील आठ आरोपींपैकी तीन आरोपी फरार असून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोकड हस्तगत करण्यात आले आहे.



