Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरसांगलीसाहित्यगंध

मनात जपलेली दिवाळी..!!

वृंदा (चित्रा)करमरकर ता. जिल्हा सांगली

0 6 3 7 8 7

मनात जपलेली दिवाळी..!!

“आली दिवाळी सण हर्षाचा, स्वप्ने सोनेरी घेऊन आली,
रंगगंधात न्हाऊन येता, काया अंगांगी मोहोरली..”

माझ्या मनाच्या एका कप्प्यात अलवारपणे जपून ठेवलेली ही माझ्या लहानपणची, तरुणपणची दिवाळी. तिच्या आठवणी मनात आजही किती ताज्या आहेत! साधारणपणे अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेपासूनच लहानथोर सर्वांनाच दिवाळीचे वेध लागायचे. मग माझी आई , आजी, आत्या यांची घराची झाडलोट सुरू व्हायची. मग पितळी डबे, तांब्याची भांडी, स्टीलचे डबे (अगदी थोडेच असायचे), मोठी पितळी पातेली चिंच, मीठ आणि राख लावून लकलकीत करायची. आम्हा बहिणींची त्यांना मदत करण्याची कोण गडबड चालायची! मग घरातली चांदीची पूजेची चांदीची भांडी रिठे, शिकेकाई लावून स्वच्छ घासायची आणि मग वाळवून एका मलमलच्या कपड्यात बांधून आई ती कपाटात ठेवायची. त्यानंतर चकली कडबोळीची भाजणी भाजणे, त्याचवेळी हातासरशी (आईचे शब्द) आई मेतकूट भाजायची. अनारशाचे पीठ तयार करण्याची पण धांदल सुरू व्हायची.

चकलीची भाजणी आणि मेतकूट माझी आई घरच्या जात्यावर दळायची. तिला मी लहानग्या- हातांनीही जात्यावर दळताना मदत करायची. अर्थात माझी मदत कमी आणि बडबड जास्त असायची. पण त्या गप्पांमध्ये आईची भाजणी आणि मेतकूट मस्तपैकी दळून व्हायचं. दिवाळीला साधारणपणे आठ दिवस राहिले की आई फराळाचे पदार्थ करायला सुरुवात करायची. सुरुवातीला करंजी आणि मोदक, मग चकली चिवडा, शेव करत असे. आई करंजी, चकली तळत असताना आम्हा बहिणींची ते खाण्यासाठी लगबग चालू असायची. आई ताटलीमध्ये दोन करंज्या आणि मोदक ठेवून सांगायची ,”घ्या, आधी देवापुढे ठेवा आणि मग खा “. त्यानंतर मग रव्याचे, बेसनाचे लाडू आणि चिरोटे, शंकरपाळे असे अनेकविध पदार्थ होत असत. भाजक्या पोह्यांचा, तळीव पोह्यांचा असे चिवडे, या चिवड्यांमध्ये काजू, बेदाणे घालायची आई. शेवही आई करत असे. आता
असे वाटते आई एवढा उत्साह कोठून आणत असे?

आमची ‘वाडा संस्कृती’ होती. त्यामुळे वाड्यात सगळ्या बायका एकमेकींकडे मदतीला जायच्या. वाड्यामध्ये फराळाच्या पदार्थांच्या तळणीचा वास घमघमत असायचा. दिवाळीला दहा-बारा दिवस असताना माझे आजोबा किंवा माझे वडील आम्हा बहिणींना घेऊन दुकानांमध्ये कापड आणायला जायचे. त्यावेळी तयार कपडे घेण्याची सवयही नव्हती,आणि परवडायचे ही नाही. मग आमच्या पसंतीने कापड घ्यायचे आणि एक नेहमीचे शिंपी होते. त्यांच्याकडं फ्रॉक किंवा परकर पोलके शिवायला टाकायचे. एकदा तर माझ्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना एकसारखे ड्रेसचे कापड आणले. तरीसुद्धा आम्हाला त्यात काही वावगं वाटलं नाही. एकसारखे ड्रेस म्हणून मज्जा वाटली.

आता लग्नानंतर चित्र थोडंसं बदललं.आई ऐवजी सासुबाई. त्याही सुगरण होत्या. आमचं एकत्र कुटुंब होतं. दीर, नणंदा, सासुबाई, सासरे अशी आम्ही सर्व एकत्रित रहात होतो. तिथेही भरपूर फराळाचे पदार्थ आई करायच्या. मी आणि नणंदा त्यांना मदत करायचो. माझ्या मिस्टरांना दिवाळीचा बोनस मिळायचा. मग मला आणि सासूबाईंना साडी, दोन्ही नणंदाना कपडे , सासऱ्यांना धोतरजोडी अशी खरेदी हे करीत. मला तरी वर्षाला दोन साड्या मिळायच्या, दिवाळीला आणि एक माझ्या वाढदिवसाला. पण या दोन साड्या लाख मोलाच्या आजही वाटतात. त्या साड्या निगुतीने सांभाळून जपून वापरायच्या. वसुबारसे पासूनच दिवाळीला सुरुवात व्हायची. वसुबारसेचा उपास लग्नानंतर मला करायला सासूबाईनी सांगितलं. मला उपास करायला आवडत नसे. पण काय करणार, सासुरवाशीण होते ना! मग सासूबाईंच्या बरोबर संध्याकाळी गाई वासराची पूजा करायची आणि मग उपास सोडायचा. तेव्हा माझा जीव भांड्यात पडायचा. आकाशदिवा माझे मिस्टर घरी तयार करायचे. त्यांना मी , माझ्या नंणंदा मदत करायचो. बांबूच्या काटक्यांचा सांगाडा तयार करायचा आणि त्याला जिलेटिनचा कागद, झिरमिळ्या लावायच्या. वसुबारसेलाच तो लागायचा.

मातीचे अंगण शेणानं सारवून मी आणि माझ्या नणंदा अंगणामध्ये सुंदर, सुंदर रांगोळ्या काढायचो. तुळशी समोर पणती, दारासमोर दोन पणत्या लावायच्या. मातीच्या पणत्या लावण्यापूर्वी पाण्यात भिजवून वाळवायच्या. आई म्हणायच्या, असं केल्यानंतर त्या जास्त तेल पीत नाहीत. मग धनत्रयोदशीला धन्वंतरी लक्ष्मीची संध्याकाळी पूजा करायची. त्या दिवसापासून मात्र दारात पणत्या, तुळशीसमोर पणती लावली जायची. आकाशदिवा, त्याचे निरनिराळे रंग, रंगीत रांगोळ्या आणि पणत्यांचा मंद पण तेजोमय प्रकाश. मनाला हे सर्व खूप आनंददायी वाटायचं.

नरक चतुर्दशीला सासूबाई मला पहाटे चारला उठवायच्या.. “तू मोठी सून आहेस ना.? मग सर्वात आधी उठलंच पाहिजेस.(मी लग्नात अठरा वर्षांची होते) स्वच्छता गृहात पणती लावायची. पाटासमोर रांगोळी काढायची आणि मग एका वाटीमध्ये दुधात कालवलेलं सुगंधी उटणं (कचूर सुगंधी, नागरमोथा, चंदन सहित) ठेवायचे. त्यादिवशी वासाचं तेल आई सर्वांना (माझ्या सकट) लावायच्या. तांब्याचा बंब दारात पेटलेला असायचा आणि त्यातून कढत पाणी घ्यायचं. हवेत खूप गारवा असायचा. त्यामुळे गरम पाण्याने, उटणे आणि खास दिवाळीसाठीचा ‘मोती साबण’ लावून अंघोळ केल्यावर खूप मस्त वाटायचं. मग घरातील मोठ्याना, देवाला नमस्कार करायचा. एकत्रित फराळ करायचा.अतीव आनंद होता त्यात. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे दिवसही गोडधोड पदार्थ करून अगदी आनंदाने साजरे करायचो.

त्यावेळी आमच्याकडे फार पैसे नव्हते किंवा एकंदरीतच आसपास सगळेजण मध्यमवर्गीय होते. पण चार पैसे बाजूला ठेवून दिवाळी आनंदात साजरी करायची असं होतं. नवे कपडे , रांगोळ्या, आकाश दिवे, पणत्यांचा प्रकाश असा खऱ्या अर्थानं दीपोत्सव असायचा. फटाक्यांचे प्रमाणही मध्यम असायचे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जास्तीत जास्त फटाके उडवायचे. त्यावेळी पैसा कमी पण समाधान जास्त होतं. प्रत्येकामध्ये आपलेपणाचा ओलावा, मायेची ऊब असायची. नात्यांची वीण अगदी घट्ट होती. शेजार पाजारी फराळाची ताटे दिली जायची. विजेच्या दिव्यांचा लखलखाट नसला, तरी पणत्यांच्या मंद प्रकाशामध्ये एक प्रकारचा आपलेपणा, उबदारपणा जाणवायचा. परस्परात आपुलकी जास्त होती. चैनीच्या वस्तू खूप कमी असायच्या. पण सण मात्र अगदी उत्साहानं साजरे करायचे अशी त्यावेळी परंपरा होती. त्यामुळे दिवाळी यायची ती सुखाची बरसात करतच आणि ही अशी दिवाळी माझ्या मनामध्ये अगदी अलवारपणे मी आजही जपून ठेवलेली आहे.

वृंदा (चित्रा)करमरकर
ता. जिल्हा सांगली
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे