Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्र

नवरंग स्त्री मनातले’: भाग : १

लेखिका: सौ अनिता अनिल व्यवहारे

0 4 0 9 0 3

नवरंग स्त्री मनातले’: भाग : १

लेखिका: सौ अनिता अनिल व्यवहारे

नवरंगांची करित उधळण, उत्सव नवरात्रींचा सजला
आदिशक्त्तीच्या भक्तीत, अवघा आसमंत नटला
तिच्या नऊ रुपात असे, एक वेगळीच शक्ती
नवदुर्गा मातेचीच, असे मनामनात भक्ती”

आदिशक्ती तुळजा भवानी मातेच्या कृपेने या विजयादशमीच्या उत्सवात आदिशक्तीची पूजा करून आपण ‘नवरात्रीचा उत्सव’ साजरा करतो. आम्हा स्त्रियांसाठी हा उत्सव पूजा, पाठ, व्रतवैकल्य याबरोबरच स्वतःचा आनंद शोधण्याचा, तो मिळवण्याचा आणि सजण्याचा देखील असतो. याची सुरुवात होते ती जिथे आमची सत्ता चालते, जिथे गृह मंत्रीपद आमच्या हाती असते त्या आमच्या स्वयंपाक घरापासून. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते हा आमचा समज. आणि म्हणून या नवरात्र उत्सवापूर्वी घराची जळमट काढीत स्वच्छता केली जाते. घर स्वच्छ होतं तसं आमचं मन ही स्वच्छ होतं. आणि मग सुरू होते नवरात्र..!

व्रतवैकल्य, उपवास, पूजा, अर्चा करून देवीचे घट बसवून अन्नपूर्णेला खुश ठेवून स्वयंपाकातही अगदीच नवनवीन पदार्थ आम्ही करत असतो. हे करत असताना स्वतःच्या बाबतीत कधी नव्हे ते आम्ही सतर्क असतो. नवरात्रोत्सवातला गरबा दांडिया, टिपऱ्या, हादगा भोंडला वगैरे कार्यक्रम उत्साहात पार पाडतो. गेल्या काही वर्षात मात्र या नवरात्रोत्सवात नवरंगांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यात अशा प्रथा पडून गेल्या की नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या, वस्त्र परिधान करायचे. देवीचे आवडते रंग….!

मग त्या रंगांची महती विषद होऊ लागते. अर्थात इथे पुन्हा आमच्या भावनांचा खेळ, बुद्धीचे मापन आणि आमची मस्करी, टीका हे ठरलेलं. आम्ही आता शिकलोय सवरलोय, सगळं काही समजतं. पण सहजगत्या त्यातून आनंद मिळत असेल तर तो मिळवायला काय हरकत? म्हणून हे करत असतो. आज पिवळा, उद्या लाल, परवा गुलाबी….हे सर्व करण्यात आनंद मिळतो.

या नवरंगा विषयी आपण बरीच माहिती ऐकली, वाचली असेल; पण आज मी आमच्या स्त्री मनातल्या नवरंगांविषयी आपल्याला सांगणार आहे….! नवरात्रोत्सवातला रंग पिवळा पहिला धार्मिकतेचा आनंद देऊन जातो भक्तांच्या मनाला, मी अनुभवलेला स्त्री रंगातला पहिला रंग ‘ममत्वाचा रंग’. माझ्या घरी येणाऱ्या कामवाल्या लता मावशींची नात अधून मधून त्यांच्याबरोबर माझ्या घरी येत असे. एखाद्या परीसारखी सावळी पण तरतरीत.. मला खूप आवडते.. ती अशीच आज नवरात्रीच्या पाहिल्याचं दिवशी माझ्या कडे आली. होती.. आजीची काम होईपर्यंत काय करायचं? असा प्रश्न तिच्या पुढे असायचा, म्हणून ती आल्यावर मी नेहमीच तिला टीव्ही लावून द्यायची. कारण त्यावेळी घरी कोणी छोटी मुलं नसायची. जे होते ते कामात असायचे.. मी तिला टीव्ही लावून दिला..की ती जमिनीवर बसायची. पण एक दोनदा रागावल्या पासून ती सोफ्यावर बसू लागली.

आज ती जिथे बसली तिथे मी मला नेसण्यासाठी साडी ठेवलेली होती..ती आज टीव्ही कमी आणि त्या साडीकडेच जास्त पाहत होती… मी तिला विचारले, काय ग? आवडली का….साडी…? हो काकू खूप छान आहे. मग देऊ का तुझ्या आजीला नेसायला? मी मुद्दामच हसत हसत विचारले. नको…नको..! ती तुम्हालाच छान दिसेल! आणि मला ती तुमच्या अंगावरच पहायची आहे. मी.. ‘बरं’ म्हणून पुन्हा माझं काम करू लागले. थोड्याच वेळात आवरून साडी नेसून हॉलमध्ये आले. तर काय आश्यर्य! ती माझ्याकडे पाहतच राहिली…आणि चक्क मला मिठी मारली.. आनंदाने चेकाळली… आ ..s.s..ई…s..!

मी मनातून चरकले. कारण तिला आई नव्हती. आणि क्षणात तिने मला घट्ट मिठी मारली होती. मी पुरती शहरून गेले.. आणि क्षणात मी ही तिला मिठीत घेऊन घट्ट पकडले आणि तिचे पापे घेतले. दोघींच्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपातून वाहणारा नवरात्रोत्सवातला हा पहिला रंग… तो होता ममत्वाचा रंग. नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा..!

“नवरात्रीच्या नवरंगातला पिवळा रंग तपस्येचा, लेऊनी आली शैलपुत्री शौर्य अन् पराक्रमाचा, सुख समृद्धी देईल माता अन आशीर्वाद ही सौख्याचा चला करू या जागर आज नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा..” (क्रमशः)

सौ अनिता अनिल व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे