Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

‘थकलेले बाबाची’ हळवा कोप-यातील मनस्पर्शी कहानी; स्वाती मराडे

गुरूवारीय 'चित्र चारोळी स्पर्धेचे' काव्यपरीक्षण

0 5 9 4 1 4

‘थकलेले बाबाची’ हळवा कोप-यातील मनस्पर्शी कहानी; स्वाती मराडे

गुरूवारीय ‘चित्र चारोळी स्पर्धेचे’ काव्यपरीक्षण

चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र एका ट्रेनच्या सीटवर काळ्या बॅगेवर विसावलेली एक छोटासा लोकरीचा बाहुला. पिकलेल्या केसांचा, अर्धवट मिटलेल्या डोळ्यांचा, पिवळ्या कपड्यातील तो बाहुला पाहिला की वाटतं; जणू आयुष्यभर धावून-धावून थकलेले आपलेच बाबा तिथे विसावले आहेत. ट्रेन म्हणजे जणू आयुष्याचा सतत पुढे पुढे होणारा प्रवास व या प्रवासात सगळ्यांच्या इच्छांची बॅगरूपी झोळी बाळगणारे बाबा. या चित्रातली काळी बॅग म्हणजे बाबांनी पेललेला संसाराचा भार. नोकरी, मुलांचं शिक्षण, घराची स्वप्नं, आजारपणं.. सगळं काही त्या एका बॅगेत बंद करून ते आयुष्यभर एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनवर प्रवास करत राहतात.

‘बाबा’ हे पात्र अनेकदा दुर्लक्षित राहतं. कारण तिथे माया आत लपलेली असते. आपल्याला दिसतो तो वरवरचा बाबांचा धाक. नदीकिनारची वाळू वरून कोरडी दिसते पण आत तिला ओल असते. बाबासुद्धा अगदी असाच असतो ना.. वरवर कोरडा, आतून मात्र मायेची ओल पाझरणारा. पत्रा तडतडतो तेव्हा आपल्याला नकोसं वाटतं पण तोच पत्रा छत होऊन सावलीही देतो याचा विसर मात्र पडतो. अगदी तसंच बाबांचे कडक बोल सगळ्यांना आठवतात पण जिवाचं रान करून गरजा भागवणारा बाबा मात्र विसरला जातो. बाबांचं प्रेम या चित्रातील काळ्या ऑफिस बॅगेसारखं.. बाहेरून कडक, आतून सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांनी भरलेलं.

बघता बघता आयुष्य सरत येतं. ज्या हातांनी आपल्याला सायकल शिकवली, तेच हात थरथरू लागतात. जे पाय खंबीरपणे संकटाचा सामना करतात तेच लटपटू लागतात. ज्या खांद्यावर बसून आपण जग पाहिलेलं असतं, ते खांदे थकून आधार शोधू लागतात.. किती वाटा तुडवल्या, किती उन्हातान्हात उभं राहिलं, तरी तक्रार न करणारा तो बाबा.. केव्हा थकून जातो हे लक्षातही येत नाही. याचंच प्रतिनिधित्व करणारं चित्र ‘थकलेले बाबा.’

चित्रातील ट्रेनची खिडकी उघडी आहे. जसा काळ मागे पडतो तसे बाहेर रूळ वेगाने मागे पडत आहेत. बाबा खिडकीबाहेर पाहत नाहीत, कारण त्यांना आता बाहेरच्या जगात रस नाही, त्यांना फक्त थोडा विसावा हवा आहे. तो विसावा जो त्यांनी कधी स्वतःसाठी मागितलाच नाही. आपण कधी बाबांच्या थकव्याचा विचार केला आहे का? त्यांना विचारलं आहे का, “बाबा, तुम्ही दमलात का?” पण थकलेले बाबा तक्रार करत नाहीत, ते फक्त डोकं टेकवून थोडा वेळ डोळे मिटतात आणि पुन्हा पुढच्या स्टेशनसाठी सज्ज होतात.

आपण मुलं मोठी होतो. पण बाबांची बॅग.. ज्यात कागदपत्रांपेक्षा जास्त आठवणी आणि काळज्या असतात. त्यांची ती काळी बॅग हलकी करूया, निदान भावनेच्या ओझ्यापासून तरी. त्यांच्या थकलेल्या पावलांना आपल्या प्रेमाचा आधार देऊया. कारण बाबा थकले तरी, त्यांचं प्रेम कधीच थकत नाही. आज या हृदयस्पर्शी विषयावर चित्र चारोळी स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त होण्याची संधी मिळाली नि अनेकविध रचनांनी लक्ष वेधून घेतले. आईवर जसे आपण भरभरून लिहितो अगदी तसेच सर्वांनी मन भरून लिहिले. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे,इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे