सौंदर्यवती मस्तानीचे पुणे शहरी आगमन
या घटनेला झाली २९५ वर्ष
सौंदर्यवती मस्तानीचे पुणे शहरी आगमन
या घटनेला झाली २९५ वर्ष
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे.दि.18(प्रतिनिधी) जिच्या अद्भूत सौंदर्याची वर्णनं ऐकून आजही ऐकणारा मुग्ध होतो, जिच्या प्रेमाची कहाणी ऐकून आजही डोळ्यात पाणी येतं, आणि जिच्या युध्दकलेची कथा ऐकून आजही मन अचंबित होतं,अशी राजकन्या मस्तानी ही बाजीराव पेशव्यांसोबत पुण्यात दाखल झाली, त्या घटनेला आता २९५ वर्ष झाली आहेत.
दि.१६ जुलै, बुधवार सन १७२९ मध्ये मस्तानी पुण्यात प्रवेशली, त्याची ईतिहासात नोंदवलेली थोडक्यात हकीगत अशी, सन १७२८ च्या डिसेंबर मध्ये जयपूर जवळ झालेल्या युध्दात बुंदेखंडाचा राजा छत्रसाल याचा मुहम्मदशहा बंगश याने पराभव केला. त्या अटीतटीच्या क्षणी मराठे व राजपूत यांच्यात झालेल्या एका कराराची आठवण करून देऊन राजा छत्रसालांने बाजीराव पेशव्यांकडे लष्करी मदत मागितली. मागणीचा तो खलिता घेऊन दुर्गादास राठोड नावाच्या दूताला छत्रसाल राजाने पेशव्यांकडे पाठवले. या खलित्यामधला “गजेंद्रमोक्षाची विनंती” या शीर्षकाने प्रसिध्द असलेला एक दोहा आजही पेशवे दप्तरात उपलब्ध आहे.
जो गत ग्राह गजेंद्रकी। सो गत भई है आज ।।
बाजि जात बुंदेल । राखो बाजी लाज।।
अशात-हेने पेशव्यांना “लाज राखण्याची ” विनंती करणारा खलिता मिळाल्यावर बाजीराव पेशवे त्वरेने जैतपूरच्या रोखाने सैन्य घेऊन निघाले. मराठी फौज जैतपूर पासून २२ मैल अंतरावर असताना मुहम्मद शहा बंगश याला पेशव्यांची फौज चालून येत असल्याची खबर मिळाली. तेव्हा बंगश सावध झाला आणि मार्च अखेर जैतपूर किल्ल्याच्या परिसरात मुहम्मदशहा बंगश याच्या फौजेशी मराठी सेनेचे घनघोर युद्ध झाले. त्यात मुहम्मदशहा बंगश सपशेल पराभूत झाला. या यशस्वी मोहिमेच्या निमित्ताने मराठ्यांचा पाय भक्कमपणे उत्तर हिंदुस्थानात कायमचा रोवला गेला. बुंदेलखंडाच्या या स्वारीत मिळालेल्या यशाबद्दल एका मराठी सरदाराने लिहिलेल्या पत्रातला “रावांचा पुण्यप्रताप ऐसा जाला” असे नमूद केले असून या युध्दाच्या विजयाचे वर्णन केले आहे, अशी माहिती ईतिहास अभ्यासक श्री. जगन्नाथ लडकत यांनी दिली.
बुंदेलखंड स्वारी फत्ते केल्यानंतर छत्रसाल राजाने महाक्रमी अजिंक्य योद्धा बाजीराव याला अनेक वस्तू, जडजवाहिर भेट देऊन कन्या मस्तानीसह पुणे शहरी रवाना केले. सा-या लव्याजम्यासह बुधवार दि.१६ जुलै १७२९ रोजी बाजीराव पेशवे मस्तानीसह पुण्यात दाखल झाले. त्यानंतरचा ईतिहास सर्वश्रुत आहे. मस्तानीला पेशवेंच्या घरात आणि दरबारात खूप विरोध झाला. त्यावेळी शनिवारवाड्यात तिला स्थान मिळाले नाही. बाजीरावांनी शहराबाहेर तिची निवास व्यवस्था केली. अर्थात कालांतराने शनिवारवाड्यात स्वतंत्र मस्तानी महाल बांधण्यात आला. जो आजही जतन केलेला असून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे.
बाजीराव-मस्तानी यांच्या नात्याची कहाणी ईतिहासात अमर असून या नाट्यमय कहाणीवर अनेक कथा-कादंब-या लिहील्या गेल्या.त्यापैकी ना. सं ईनामदार लिखित “राऊ” या कादंबरीवर आधारीत संजय लीला भन्साळी यांनी निर्मित केलेला “बाजीराव-मस्तानी” सिनेमा विशेष गाजला.





