Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

‘त्याची’ वंदावी पाऊले…!!!

अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर

0 4 8 2 5 1

‘त्याची’ वंदावी पाऊले…!!!

“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” संत तुकाराम यांच्या या ओळी केवळ अभंगातील शब्द नाहीत, तर जीवनाचे अढळ तत्त्व आहेत. बालपणापासून हे वचन ऐकत आले. लहानपणी बढाया मारताना आई प्रेमाने सांगायची., “बाळा, जे बोलशील ते करून दाखव.” त्या वेळी या वाक्याचा खोल अर्थ कळत नव्हता; पण जसजसं वय वाढलं, अनुभवांची शिदोरी वाढली, तसतसं या वचनामागचं सत्य प्रकर्षाने जाणवलं. बोलणं सहज असतं. स्वप्न रंगवणं, आश्वासनं देणं, मोठमोठे संकल्प करणं, हे क्षणात घडतं. पण तेच शब्द कृतीत उतरवताना मात्र धैर्य, सातत्य आणि निष्ठा लागते. शब्दांना पंख असतात; कृतीला कणा लागतो. प्रत्येक व्यक्ती मनाशी अनेक संकल्प करत असते.. हे साध्य करीन, ते पूर्ण करीन. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की मन मागे सरकतं. कारण बोलणं क्षणभंगुर असतं, तर कृतीसाठी चिकाटी आणि त्याग आवश्यक असतो. ही सर्वसामान्यांची कथा आहे.

परंतु काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, त्यांच्या शब्दांत आणि कृतीत तफावत नसते. त्यांनी दिलेलं वचन म्हणजेच त्यांचा धर्म असतो. संत, महंत, राजे-महाराजे यांनी उच्चारलेला शब्द हा जीवनमूल्यांनी परिपूर्ण असायचा. त्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी ते मागे हटले नाहीत. ‘कर्ण आठवतोय ना…’! दानासाठी दिलेलं वचन पाळण्यासाठी त्याने स्वतःचं कवच-कुंडल दिलं. वचनपालनासाठी केलेला त्याग आजही आदर्श ठरतो.
याच संदर्भात संस्कृत सुभाषित म्हण….

यथा चित्तं तथा वाचः,
यथा वाचं तथा क्रिया।
चित्ते वाचि क्रियायां च,
साधूनाम् एकरूपता॥

जसं मन, तशी वाणी; आणि जशी वाणी, तशी कृती…. मन, वाणी आणि कृती यांचं एकरूपत्व हेच सज्जनांचं लक्षण आहे. आजच्या काळात मात्र शब्दांचा बाजार भरलेला दिसतो. कोणाचा पैसा बोलतो, कोणाचं पद बोलतं, कोणाची सत्ता बोलते; परंतु काळाच्या न्यायालयात आणि देवासमोर केवळ कर्मच साक्ष देतं. “गरजेल तो पडेल काय” ही म्हण खोटी ठरवायची असेल, तर उगीचच शब्दांची उधळण न करता, बोलणं मोजून मापून करायला हवं. कारण शब्द प्रतिष्ठा देतात, पण कृती विश्वास निर्माण करते. आणि विश्वास हीच माणसाची खरी कमाई असते.

आज “बोले तैसा चाले” हा गुण दुर्मिळ भासत असला, तरी तोच खऱ्या उत्तम पुरुषाचा अलंकार आहे. ज्या व्यक्तीच्या शब्दात प्रामाणिकपणा आणि कृतीत सातत्य असतं, त्याच्या पावलांना वंदन केल्याशिवाय राहवत नाही. खरं तर हा संदेश इतरांसाठी नव्हे, तर प्रत्येकाने स्वतःसाठी स्वीकारण्याचा आहे. आपण जसं बोलू, तसं जगण्याचा प्रयत्न करूया. कारण बोलणाऱ्यांची गर्दी होते; पण कृती करणारेच इतिहास घडवतात. ‘गुरूंना वंदन केल्याशिवाय आभाळाची उंची लाभत नाही’ हेच खरे.

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे