Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

लोककलांचा ऱ्हास

अनिता अनिल व्यवहारे ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

0 4 8 2 9 0

लोककलांचा ऱ्हास

लोककला’ म्हणजे केवळ करमणूक नव्हे; ती लोकांनी घडवलेली, लोकांसाठी सादर झालेली आणि लोकभावनांतून जन्मलेली कला आहे. म्हणूनच ती कोण्या एका व्यक्तीची नसून ती समूहाची, समूहभावनेची सामूहिक अभिव्यक्ती असते. ती रंगमंचावर नव्हे, तर गावाच्या चावडीवर, देवळाच्या ओसरीत, मळ्यात, यात्रेत लोकांतूनच साकारते. लोककला लोकांच्या दैनंदिन जीवनातून, त्यांच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा आणि संघर्षांतून जन्माला येते. ही कला शाळा महाविद्यालयांत शिकवली जात नाही; ती पिढ्यान्‌पिढ्या पाहत, ऐकत, जगत शिकली जाते.

ग्रामीण व आदिवासी जीवनात लोककला ही दैनंदिन जीवनाचाच भाग होती. कष्टमय, खडतर जीवनातून थोडीशी रंगत, थोडासा विरंगुळा, आणि थोडीशी आशा देण्यासाठी या कला निर्माण झाल्या. धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सव, निसर्गप्रेम आणि श्रद्धाळू मन या साऱ्यांशी लोककलेचा अतूट संबंध होता. अलीकडे ‘विठ्ठल उमाप’ यांसारख्या कलावंतांनी लोकसंगीताच्या आत्म्याला जपत, तो जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, ही बाब लोककलेच्या सामर्थ्याची साक्ष देणारी आहे.

दशावतार, लावणी, लेझीम, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारुड अशा असंख्य लोककला आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत.मात्र आज त्यांपैकी मोजक्याच कला टिकून आहेत; उरलेल्या हळूहळू इतिहासजमा होत आहेत. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून घडलेली ही कला, आज जणू खाटेच्या दावणीला बांधली जात आहे. जी कला जीवनमूल्यांचे गणित मांडायची, ती आता बाजारमूल्यांच्या हिशोबात अडकली आहे.

“कलेच्या हातात होते जीवनाचे भान,
आज कलेलाच विचारावे तुझं काय स्थान?”

लोककला ही भारतीय संस्कृतीची आराध्य देवता होती. तिने समाजाला दिशा दिली, प्रबोधन केले, जनजागृती घडवली. परंतु विसाव्या शतकात विज्ञानाच्या प्रचंड वेगात ही कला हळूहळू गिळंकृत होत गेली. डोक्यावर मोरपीस, हातात टाळ “हरिनाम बोला” म्हणत गावोगावी फिरणारा वासुदेव, चालतं बोलतं घड्याळच जणू! दान घेताना केवळ पैसा नव्हे, तर माणुसकीचा सन्मान स्वीकारायचा; आशीर्वाद देताना घराण्याचा उद्धार करायचा. आज तो वासुदेव इतिहासातच नव्हे, तर संस्कृतीतूनही दूर चालला आहे.

देशभक्ती, शौर्य, वीरगाथा आणि नीतीमूल्ये सांगणारा पोवाडा हरवत चालला आहे. डोंबाऱ्याचा खेळ पाहताना दोरीवर चालणारी स्त्री ती जमिनीवर नसते, पण प्रेक्षकांच्या हृदयावर मात्र चालत असते! तो खेळ केवळ कसरतीचा नसून, स्त्रीच्या आयुष्याची रूपककथा सांगणारा होता, तारावरची कसरत आणि खाली उभे असलेले बघे. गोपाळ, गारुडी, बाहुल्यांचे खेळ, एकपात्री प्रयोग हे सारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी माध्यम होते. जादू नाही, भुताटकी नाही हे सगळं थोतांड आहे, हे लोककलाच लोकांना शिकवत होत्या. पूर्वी गारुडी अंधश्रद्धा घालवायचा, आज मोबाईल ती वाढवतो!

भारतात असंख्य जाती, १८ पगड समाज, बलुतेदार–अलुतेदार प्रत्येकांकडे स्वतंत्र लोककला होती. आज काही तग धरून आहेत, तर काही पूर्णपणे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. विज्ञानयुगात लोककलेचे महत्त्व कमी झाले. चांभाराची हस्तकला मशीनने गिळली, कुंभाराची मडकी फ्रिजने पुरली, तमाशात गीतांऐवजी चित्रपट घुसले. ‘मातीच्या मडक्यांत होती थंड पाण्याची गोडी, फ्रिज आला… आणि मातीच मेली थोडी”.म्हणूनच आज एवढेच म्हणावेसे वाटते, ‘लोककला अजून जिवंत आहे, पण ती फक्त चित्रात, आठवणीत आणि भाषणांत. जर आपण तिला जगवलं नाही, तर उद्या आपल्या संस्कृतीचे दर्शन फक्त संग्रहालयातच घ्यावे लागेल.

अनिता अनिल व्यवहारे
ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
========

2/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे