अस्ताला जाताना सोनेरी किरणांची आल्हादपणाची पखरण”; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“अस्ताला जाताना सोनेरी किरणांची आल्हादपणाची पखरण”; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
पर्वताची दिसे दूर रांग,
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे,
भोवती सावळ्या चाहुली… सांज ये गोकुळी..
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे चित्र पाहिले नि मनात वरील ओळींनी ताल धरला, नि थोडं वेगळ्या अर्थाकडे मन डोकावले. अस्ताला जाताना अनेक चिंता सतावू लागतात. काजळाची रेघ.. जणू आपल्या माघारी कोणत्या अडचणी येतील हे दिसू लागते. डोहातले चांदणे सावळे… मनाच्या डोहात अनेक वेदना उमटू लागतात नि अंतरंग ढवळून चिंतित होत जाते. भोवती सावळ्या चाहुली.. अन् मग काळाची ती भितीदायक चाहूल..! मन उदास होत जाते. अर्थातच चित्रानुरूप मनात असं काहीसं आलं. अस्ताला जाताना ना बालपणातील अवखळपण असते ना तारुण्यातील तेज. एक उदासी येते नि समोर उभे राहतात ते हळवे, कातर क्षण. प्रियजनांच्या आठवणीत कासावीस होते मन. कदाचित मृत्यू समीप आल्यावर मनाची अशी अवस्था होत असावी.
पण तो सूर्य मात्र उगवतीचे तेच रंग क्षितिजावर उधळत अस्ताला जातो. उगवतीचे चैतन्य अन् माध्यान्हीचे तेज थोड्या क्षणानंतर लुप्त होणार असते. तरीही अस्ताला जाताना तो चिंता करत नाही. मी गेल्यावर हे सगळे अंधारात बुडतील. अंधार म्हणजे संकट.. त्याच्याशी ही ‘धरा’ कशी सामना करेल. उलट तो असा विचार करत असावा.. मी मावळलो तरच अंधार येईल आणि अंधार आला तरच आकाशाच्या पटलावर चांदण्या उजळतील, चांदणे पडेल, चंद्र दिसेल. काजवे सुद्धा चमकतील. वाट शोधण्यासाठी कुणीतरी दिवा लावेल, पणती पेटवेल, मशाल हाती घेईल. ‘इवल्याशा पणतीचा इवलासा जीव.. त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव..’ संकटातून मार्ग शोधेल. म्हणूनच..
मनात नसावी कसलीच हुरहूर
अस्ताला जाताना..
तेजाचे रंग उधळत जावे
सूर्यासम मावळताना..!
कधी कधी कुणी अस्ताला जाताना कुणा दुसऱ्याच्या मनात वेदना निर्माण होते. साहजिकच आहे.. सहवास, सोबत, साथ, ऊर्जा.. कितीतरी गोष्टींची सवय मनाला लागलेली असते. तो सूर्य नित्य चराचराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो.. तोच जर नसेल तर.. मन घाबरून बावरून जाणारच. त्याचंच प्रतिबिंब जणू झाडांच्या काळवंडलेल्या स्वरूपात चित्रात दिसते आहे.
सूर्य अस्ताला जाताना
कोण गेले गे बावरून
झाडावेलींनी घेतले
सावळे पांघरूण..!
पाखरे घरट्यात विसावतात. दिवसभरासाठी बाहेर पडलेली पावले घराकडे वळतात. गाई, गुरे, वासरे गोठ्यात परततात. जणू तो दिनमणी विसावल्यावर सगळ्यांनाच घराची ओढ लागते. ‘अस्ताला जातानाही तो सौम्य व सोनेरी किरणांनी सर्वांना आल्हादपणाची पखरणच करत जातो’. निसर्गक्रम कधी चुकेल का? उदय आहे तेथे अस्त आहेच. कधी हा अस्त मऊशार ऊब देणारा, तर कधी मनात हळवे कातर क्षण निर्माण करणारा. सूर्य हा त्याची नित्य प्रचिती देणारा.
आज स्पर्धेनिमित्त आलेल्या रचना अतिशय सुरेख. ‘विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही.. पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही..’ हा आशावाद प्रतिकात्मक सूर्याचा खुबीने वापर करत अनेक रचनांमधून उमटला. सूर्याशी धरेशी प्रेमाचे नातेही काही रचनांतून शब्दबद्ध झाले. मानवी मनाशी नाते जोडत जीवनसारही सांगितले. वैविध्यपूर्ण रचनांसाठी सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/ सहसंपादक/ कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



