ढगाआडून बघतोय ‘तो’ निसर्गाची शिकवण: वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यवेणी त्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
ढगाआडून बघतोय ‘तो’ निसर्गाची शिकवण: वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यवेणी त्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
लहानपणीचे ‘चांदोबा चांदोबा भागलास का’? हे गीत आठवत असेल. यात चंद्रच आपल्याशी लपाछपी खेळतो ही पक्की समजूत होती. ढगाआड आतासुध्दा सूर्य, चंद्र लपतात.पण हा लपंडाव आपल्याला खूप काही शिकवतो. जीवन म्हणजे सतत चालणारा एक संघर्ष असतो. प्रत्येक वळणावर नवी परीक्षा आपली वाट पाहत असते. कधी अपयश समोर उभे राहते, तर कधी निराशा मनात दाटते. अशा वेळी जीवनरूपी आकाशात ढगांप्रमाणे संकटे आच्छादिल्या सारखे वाटते. पण त्या ढगांआडूनही कुठे तरी आशेचा प्रकाश डोकावत असतो.तो प्रकाश म्हणजेच माणसाची जिद्द. जीवनात येणारी संकटे पाहून न घाबरता धैर्याने, संयमाने त्यांचा सामना करावा.
वाट कितीही खडतर असली तरी चालता येते.संघर्ष शिकवतो हार न मानायला. प्रेम शिकवते माणूस म्हणून टिकून रहायला.ढग कितीही गडद असले तरी ते कायम राहत नाहीत.एक दिवस ते बाजूला सरकतातच आणि तेव्हा यशाचा सूर्य उजळून निघतो.संघर्ष आणि प्रेम मिळूनच आयुष्य पूर्ण होते. या अंतर्गत असाही अर्थ होतो. माणूस पैशाने,मानाने कितीही मोठा असला तरी त्यालाही विपरित काळ त्रस्त करतो.सूर्यासारख्या तेज: पुंज,प्रखर ताऱ्याला झाकून टाकण्याची ताकद ढगात असते.तसेच माणसाने ऐश्वर्याच्या शिखरावर असताना गर्व केला तर त्याच्या गर्वाचे हरण होतेच.
मध्यंतरी झालेल्या निवडणुकीत असेच भले भले तारे अस्तंगत झाले.म्हणून माणसाने कधीच गर्व करू नये.एवढ्या बलशाली चंद्र सूर्याला ढग झाकाळू शकतात. तिथे माणसाची काय वाट?खरेच निसर्ग आपला गुरु असतो असे म्हणतात ते खरे आहे. ढग क्षणभर येतात आणि जातात, पण ते सूर्यालाही झाकू शकतात—ही त्या ढगांची ताकद नाही, तर काळाचाधडाआहे. ‘ढगाआडून बघतोय’ यात मोठी शिकवण दडली आहे. गर्व करू नये,नम्रता सोडू नये, संयमाची कास धरावी.अडचणीची परिस्थिती बदलण्याची वाट पाहणे गरजेचे आहे. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘ढगाआडून बघतोय’ हा विषय वैचारिक आहे. शिलेदारांच्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



