“पिंड ते ब्रम्हांड निर्मितीची मूळ माया आदिशक्ती म्हणजे स्त्री”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“पिंड ते ब्रम्हांड निर्मितीची मूळ माया आदिशक्ती म्हणजे स्त्री”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
निसर्ग म्हणा किंवा ईश्वर, या सृष्टीचा निर्माताच खरा शास्त्रज्ञ आहे. इथे जितकी जीवसृष्टी अस्तित्वात आहे, तिच्या नवनिर्मितीचे सूत्र पाहता, सजीवांच्या खर्या जाती दोनच नर व मादी. अर्थात आज मला जैवशास्त्रात जास्त खोलवर जायचे नाही. मात्र हा संदर्भ आवश्यक वाटला. आजचा संबंध प्रजननाशी आहे. म्हणूनच सुरूवातीलाच बोललो की, निर्माताच खरा शास्त्रज्ञ. कारण आज विज्ञानाने ही सर्व कोडी सोडवली असली तरी, ती आधी कुणीतरी पूर्ण विचारांती रचली आहेत, हे नाकारता येत नाही.
सजीवसृष्टीत अस्तित्वरूपात येण्यासाठी अनेक जीव उतावीळ असतात पण त्यातील कित्येकांपैकी एखाद्यालाच मातेच्या कुशीत अस्तित्व लाभते. हे अस्तित्व लाभत असताना जन्म घेणारा व जन्म देणारा जीव सोसत असतो असह्य कळा. तद्नंतरच अनुभवतो सृष्टी सोहळा. स्त्री हे एक अजब रसायन आहे. ती म्हणजे, पिंड ते ब्रम्हांड निर्मितीची मूळमाया आदिशक्ती. सृजनाची स्फूर्ती, वात्सल्याची दैवी मूर्ती, आणि गर्भधारणेपासून ते अंतीम श्वासापर्यंत ममत्व जपणारी महन्मंगल आई. असे म्हटले जाते की अनेक विराट पराक्रमाचे मातृत्व पुरूषाकडे असले तरी “मातृत्वाचा” पराक्रम फक्त स्त्रीच करू शकते आणि हे करत असताना ती स्वतःला पणाला लावत असते.
मरणप्राय प्रसववेदनेतही मातृत्वाचा आगळा आनंद लपलेला असतो. ती अनुभुती स्त्री पुन्हा पुन्हा अगदी निर्भयपणे घेत असते. ही हिम्मत हे धारिष्ट्य फक्त स्त्रीच करू शकते. म्हणून तर शेवटच्या क्षणाला याला बाळंत “पण” असे म्हटले असावे. कारण प्रत्येक वेळी मृत्युला पराजित करत हा पण ती जिंकत असते. वरून त्या जीवाचे पालनपोषण, उदरभरण. अजून एक गोष्ट एक ‘नर’ बाप होऊ शकतो, मात्र आई कदापी नाही.. पण एक ‘मादी’ बापसुद्धा होऊ शकते हे सिद्ध झालेले आहे.
कोमल गात्री
नारी वज्रनिर्धारी
जीवनदात्री
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरीता आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र म्हणूनच खूप बोलके आहे. यातली स्त्री गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात आहे. ती मातृत्वाचे प्रतिक आहे. तर मागे दिसणारी मुले त्या जीवघेण्या संघर्षपथाचे प्रतिक आहेत. तिच्या चेहर्यावरील भाव या अवस्थेच्या वेदना, शारिरीक मानसिक तणाव स्पष्ट दर्शवणाऱ्या आहेत.पण ती हे आव्हान मात्र लिलया पेलत असते. आज या चित्राच्या अनुषंगाने अनेकांनी खूप छान हायकू निर्मिती केली आहे. परिणामकारकता साधण्याचा छान प्रयत्न झाला आहे.. सर्वांच्या लेखणीला खूप सार्या शुभेच्छा आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुलदादा व समूह प्रशासनाचा मी आभारी आहे..
आजचे परिक्षण समूहातील स्री शक्तीला समर्पित.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह