एक दिवस महिलांचा
सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर (गुजरात)

एक दिवस महिलांचा
वर्षभरातून ८ मार्च रोजी
एक दिवस महिलांचा येतो..
तिलाच तिच्या विसरलेल्या
अस्तित्वाची जाणीव करून देतो..
जिकडे तिकडे,सोशल मीडियावर
तिचे गुणगौरव गायले जातात..
हे सारे कौतुक ऐकतानाही
लाटणेच असते तिच्या हातात…
ऊर्जादायी शब्दांनी तिला
अजूनच स्फूर्ती चढत असते..
कांदा चिरताना मात्र कधी
ती हुंदका दाबत रडत असते…
ती घराची अन्नपूर्णा घोषित..
तिच्याच हाताला चव भारी..
कशाला हवी तीला कामाला बाई,
तीचं शरीरच बचतीचा व्यायाम करी..
घरकामाला ती नाही मानत चाकरी..
जरी,ती असते बिनपगारी नोकरी..
नोकरी करूनही तीच मन सांगत..
नको बाहेरचं,बरी घरचीच भाकरी..
युगानुयुगे गायली जातेय अशीच
तिच्या समर्पणाची गोंडस गाथा…
भोळ्याभाबड्या कोमल मनाची
न मांडलेली दुर्लक्षित व्यथा..
एक एक स्नायू तिचा ओरडतो
थकून स्वतःचा तो गळा मुरडतो..
अशा एक ना अनेक हसऱ्या वेदनांनी
एक दिवस महिलांचा शेवटचा ठरतो..
एक दिवस महिलांचा शेवटचा ठरतो..!!
सौ.संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर (गुजरात)
=========



