शासकीय विद्यानिकेतनमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह; विद्यार्थ्यांनी दिला ‘स्नेह,संस्कार आणि संरक्षणाचा’ संदेश
वसुधा नाईक प्रतिनिधी

शासकीय विद्यानिकेतनमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह; विद्यार्थ्यांनी दिला ‘स्नेह,संस्कार आणि संरक्षणाचा’ संदेश
वसुधा नाईक प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
छत्रपती संभाजीनगर | दि. २७ ऑगस्ट २०२६ : शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगर येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साह,आनंद आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बी.एड. छात्रसेवाकालातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-शिक्षकांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व प्रभावी आयोजन करून या सोहळ्याला संस्मरणीय स्वरूप प्राप्त करून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.डॉ.सुनीता राठोड होत्या. प्रमुख पाहुण्या मा.प्रा.डॉ. पद्मा जाधव, तसेच मेंटोर शिक्षिका मा.सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी शाळेतील शिक्षकवृंद,छात्र-अध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छात्र उपमुख्याध्यापक अरबाज शेख यांच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले आणि वृक्षाला राखी बांधण्यात आली.. मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
विद्यार्थी मनोगत म्हणून निलेश सुरडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर आयुष गवई, आर्यन व पार्थ यांनी सुरेल गीत गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली,तर अनुज मवाळ यांनी सादर केलेल्या दुसऱ्या गीताने कार्यक्रमात सुरेल रंग भरला. छात्र-अध्यापिका दैवशाला शिंदे यांनी रक्षाबंधनाच्या परंपरेमागील स्नेह,विश्वास,नातेसंबंध आणि सामाजिक जबाबदारी यांचे सुंदर विवेचन केले. छात्र-अध्यापक गालेब पठाण यांनी सादर केलेल्या भावस्पर्शी गझलेने कार्यक्रमात सुरेल रंग भरला. यानंतर विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मनोगते,भाषणे व गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मा.श्री.चरपेलवार सर यांनी आपल्या प्रेरणादायी उद्बोधनातून विद्यार्थ्यांना नात्यांमधील जिव्हाळा,परस्पर सन्मान,आपुलकी आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुण्या मा.प्रा.डॉ.पद्मा जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषणातून रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित सण नसून प्रेम,विश्वास,सुरक्षितता आणि परस्पर जबाबदारीची जाणीव करून देणारा संस्कारपर्व असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात मा.डॉ. सुनीता राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव हे केवळ परंपरा जपणारे नसून मूल्यसंस्कारांची रुजवण करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन छात्र-अध्यापक ऋषिकेश गावंडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन छात्र मुख्याध्यापिका संध्या हिंगोले यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.
यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, सर्व प्रशिक्षणार्थींना राख्या बांधण्यात आल्या. शेवटी सर्वांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. स्नेहाच्या धाग्याने नाती अधिक दृढ करत,संस्कारांची शिदोरी देणारा हा रक्षाबंधन सोहळा शासकीय विद्यानिकेतनच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील एक आनंददायी व अविस्मरणीय पर्व ठरला.



