“आभारीय मनोगत”… वरातीमागून घोडे….!; वैशाली अंड्रस्कर
“आभारीय मनोगत”… वरातीमागून घोडे….!; वैशाली अंड्रस्कर
खरेतर आजचे हे ‘आभारीय मनोगत’ म्हणजे माझे वरातीमागून घोडेच…पण करणार काय ? खूप आंतरिक इच्छा होती. आपली चित्र चारोळी सर्वोत्कृष्ट ठरली. आपल्या शब्दांना झळाळी मिळाली. मग आभाराचे दोन शब्द ठरतातच ना…! पण संपूर्ण आठवडा या ना त्या कामांनी व्यस्त. शेजारी, नातेवाईक यांचे लग्न, वास्तूशांत आणि त्यात शाळा, घर यात लिहायचे राहूनच गेले. पण आज ठरवले, उशिरा का होईना आभार मानायचेच…!
बुधवार दिनांक ११ डिसेंबरला चित्र चारोळी समूहात विषय होता ‘तडजोडीचा झुला’, खरेतर त्या चित्रामध्ये एकाच झुल्यावर तडजोड करून बसलेल्या स्त्री-पुरुषाचे चित्र होते. खरेतर ते तडजोडीचे फार सुखावह उदाहरण होते. पण प्रत्येक तडजोड ही सुखावहच असेल असेही नसते. बहुतेकदा तडजोड म्हणजे मन मारून मुटकून जगणे. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती दिसतात. अन् तोच आशय घेऊन नकळत मी चित्रचारोळी साकारली….
घड्याळाच्या लंबकागत
तडजोडीचा झुला हलतो
काळ वेळेच्या टोल्याऐवजी
ह्रदय तुटल्याचा ध्वनी येतो
आता ह्या टोल्याचा आवाज मराठीचे शिलेदार समूहाच्या मुख्य प्रशासकांपर्यंत जाईल याची काही खात्री नव्हती. पण शेवटी तो आवाज पोहचलाच आणि निरोप आला…तुमचा फोटो पाठवा….???? दिला बाई फोटो पाठवून. सकाळी बरोब्बर साडेनऊच्या टोल्याला पोस्टर आले. सर्वोत्कृष्ट चित्रचारोळीकार सौ. वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर… म्हटलं चला टोला लागला आपला…!
तर अशा सन्मानाप्रित्यर्थ मी मराठीचे शिलेदार समूह प्रशासन समिती माननीय राहुल दादा पाटील, सौ. सविता पाटील ठाकरे, पल्लवी ताई पाटील यांचे मनापासून आभार मानते… तसेच माझ्या सर्वोत्कृष्ट रचनेवर अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या समूहातील सर्व शिलेदारांचे सुद्धा आभार मानते… आणि आपली टोलेबाजी थांबवते…!
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





