‘शब्दव्यूहा’त कधी कोणी हसते, तर कुणी फसते’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
‘शब्दव्यूहा’त कधी कोणी हसते, तर कुणी फसते’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
तसा तो हुशार…नेहमीच तत्पर….कधीच कुणाकडून फसला जाण्याची शक्यता नसलेला. पण, ‘आज मात्र त्याचा अति आत्मविश्वास त्याला नडला’. नकळत त्या फोन कॉलच्या शब्दव्यूहात तो अडकत गेला आणि खात्यातील २५ हजार रुपये गमावून बसला. नयना….खूप हुशार, कमी बोलणारी, ध्येयवादी…मनोज..बोल घेवडा, हुशार आणि कुणावरही सहज छाप पाडणारा. आधी तिने पूर्ण दुर्लक्ष केले होते त्याच्याकडे. पण हळूहळू त्याच्या शब्द व्यूहात अडकत गेली आधी मैत्री नंतर प्रेम…प्रेमाच्या आणाभाका, सारे काही मनासारखे झाले दोघांच्या.
स्वाती मराडे म्हणते त्याप्रमाणे…
होईल तुझा अभिमन्यू
ना परतीस मिळेल जाग..
वाजता धोक्याची घंटा
मनमस्तिष्क झाले जागे
व्यूह आला ध्यानी
पाऊल वळले मागे..!
खूपच भावल्यात या ओळी..शब्दव्यूहात फसून काहीही होऊ शकते. जरा इतिहासात नेते… चक्रव्यूह भेदण्याचे अर्धवट ज्ञान असलेला ‘अर्जुन पुत्र’ अभिमन्यू चक्रव्यूहात कपटाने जयद्रथाकडून मारला गेला. व्यूह कोणतंही असो… ते भेदणे ज्याला जमतं तो शब्द सामर्थ्याच्या जोरावर कशावरही, कुणावरही मात करू शकतो हेच सत्य. भाषेतही या शब्द व्यूहाला अनन्य साधारण महत्त्व आहे.याच शब्दव्यूहाच्या मदतीने अनेक रचना साकारल्या जातात. अनेक लेख लिहिले जातात. वकृत्वातही या शब्दव्यूहात अनेकांकडून शब्द काढून घेतले जातात, बोलण्याच्या ओघात कधी कोणी हसते तर कुणी फसते.
असो..आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी शब्दव्यूह हा विषय दिला. आज अनेकांनी हा शब्दव्यूह भेदतांना आपल्यातील प्रतिभा शक्तीच्या जोरावर पुन्हा एकदा ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हे सत्यात उतरवले.तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा..
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक,लेखिका कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह



