Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेरायगडविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून, ते एक यज्ञकर्म आहे’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रचारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 5 3 4 0 0

‘अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून, ते एक यज्ञकर्म आहे’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ,
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म..”

भारतीय परंपरेत अन्नाला ‘पूर्णब्रह्म’ मानले जाते. कारण अन्नाशिवाय जीवन शक्य नाही. ‘अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून, ते एक यज्ञकर्म आहे’. संत रामदास स्वामींनी या श्लोकात अन्नाला पवित्र मानून त्याचा आदर करण्याचा संदेश दिला आहे. खरोखरच मन शांत करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करत एकमेकांच्या सोबतीने भोजनाचा आस्वाद घेणे यासारखी क्षुधातृप्ती वाट्याला येणे म्हणजे भाग्यच. त्यात ती पंगत असेल तर.. अंगत पंगत अन् काहीतरी विशेष प्रसंग दोन्हीमुळे जेवणाची लज्जत आणखी वाढते. रसनेसोबत मनही खुश होऊन जाते.

पूर्वीच्या काळी लग्न असो, घरगुती विशेष कार्यक्रम असो अथवा मंदिरात भंडारा असो. मांडी घालून एका ओळीत बसायचे. मांडी घातली की अर्धपद्मासन स्थिती व्हायची. जेवताना पुढे वाकले जायचे; जणू आतड्यांची हालचाल घडवून आणली जायची‌. केळीचे पान, पत्रावळी किंवा ताट देऊन नियोजनानुसार वाढपी वाढत जायचे. सर्वांना वाढ पोचली का हे विचारून ‘वदनि कवळ घेता..’ म्हटल्याशिवाय कुणीही जेवणाला सुरूवात करत नसायचे. ताटात पुढे असूनही सर्वांना मिळेपर्यंत वाट पाहणे.. हा मनावर होणारा एक संयमाचा संस्कारच. याशिवाय एकट्याने नव्हे तर सर्वांसोबत.. हा दुसरा संस्कार. पंगतीत जेवताना अन्नावर व मनावरही एक सकारात्मक संस्कार घडायचा. भूक असेल तेवढंच पानात घेतलं जायचं. ताटातील सर्व अन्न संपवूनच ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणत लोक उठायचे. एक कृतज्ञ भाव मनात जागायचा.

सगळे मिळून बसले की, जेवणाची लज्जत काही औरच वाटते. काही ठिकाणी पुरुषांची पंगत आधी. त्यासोबत लहान मुले. काही गावात या पंगती आधी महिलांसाठी होतात कारण महिला म्हणजे अन्नपूर्णेचं रूप. आधी तिची तृप्ती. तर काही ठिकाणी स्त्री व पुरुष दोन्ही एकत्र. अशी पंगत छोट्या स्वरूपात घराघरात सुद्धा असायची. कालानुरूप पंगतीचे स्वरूप बदलले. इंग्रज भारतात आले; ते जेवणासाठी टेबल खुर्ची व खाण्यासाठी काटे चमचे घेऊन. बऱ्याच घरात जेवणासाठी मांडी घालणं बंद झालं. टेबल खुर्चीवर मोबाईल हातात घेऊन जेवण सुरू झालं. ना सुखदुःखाच्या गप्पा, ना जेवणाचा आस्वाद.. आभासी जगात वावरत जेवण सुरू झालं. तर बऱ्याच मोठ्या कार्यक्रमात बुफे पद्धत आली. या पद्धतीत तर कमी पडले तर पुन्हा घ्यायला जायचा त्रास नको म्हणून अनेकजण ताट भरभरून वाढून घेतात व बरेच पदार्थ ताटात शिल्लक ठेवतात. हा अन्नदेवतेचा अपमानच नव्हे काय? भाकरीची गोष्ट यावेळी सोयिस्करपणे विसरली जाते.

आहारात वाढलेला चमचमीतपणा व जेवणाच्या चुकीच्या पद्धती यामुळे वाढणारे वजन व त्यायोगे येणारे आजार. हे सगळं पाहिल्यावर नक्कीच म्हणावंसं वाटेल पंगतीत जेवताना जी मजा, संस्कार व निरामयता आहे तशी आधुनिक पध्दतीच्या जेवणास अमृतमयी चव आहे का? त्यामुळेच हे मनोहारी वास्तव आहे की पंगतीत जेवताना मिळते आनंदाची मेजवानी. पण ही आनंदाची मेजवानी दुर्लभ होत आहे. खेडोपाडी ही पंगत आता केवळ कीर्तन सप्ताहाच्या ठिकाणी आढळते. शहरांनी तर पंगतीला केव्हाचाच रामराम ठोकलाय.

आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी ‘पंगतीत जेवताना’ हे चित्र आले. वास्तव जगात दुर्मिळ होत चाललेले हे चित्र पाहून खरेतर बालपणातील अनेक आठवणी जाग्या झाल्या… अन् त्यावेळच्या तृप्ततेचीही अनुभूती आली. स्पर्धा विषयानिमित्त अनेकांच्या मनात या आठवणी जागल्या असतील. अनेक बदल व सद्य वास्तव यांचा विचार करत आशयघन व भावस्पर्शी रचना साकार झाल्या. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे