‘टॅटू’मुळे वाढतेय समाजातील विकृती
तृप्ती पाटील (लेखिका) मालाड, मुंबई
‘टॅटू’मुळे वाढतेय समाजातील विकृती
आजच्या काळात तरूण, तरूणींनी शरीरावर टॅटू काढणे ही फॅशन झाली आहे. टॅटू काढण्यात स्वतः काहीही चुकीचे नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण या स्वातंत्र्याचा वापर करताना समाजाची, संस्कृतीची आणि सभ्यतेची जाणीव ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. आज अनेक तरुणी व महिला केवळ प्रसिद्धीसाठी शरीराच्या अतिशय खाजगी भागांवर टॅटू काढतात. छातीवर, पोटावर, मांड्यांवर आणि तेच फोटो सोशल मीडियावर उघडपणे शेअर करतांना दिसतात. इथेच खरी विकृती निर्माण होते हेच यांना कळत नाही.
माझं स्पष्ट मत आहे की, टॅटू काढा, कुठेही काढा, पण त्याचं प्रदर्शन करून समाजात विकृती पसरवू नका. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अंगप्रदर्शन केल्याने त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. आज एक जण करतो, उद्या दुसरा त्याचं अनुकरण करतो आणि हळूहळू हीच गोष्ट “सामान्य” मानली जाऊ लागते. यातूनच विकृती वाढते, संस्कृती ढासळते आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो. यास कोण कारणीभूत आहे? खरा सवाल हा आहे.
संस्कृती जेव्हा बिघडते, तेव्हा माणूस वाममार्गाकडे वळतो. आज सोशल मीडियावर दिसणाऱ्या या तथाकथित फॅशनचा परिणाम उद्या संपूर्ण समाजाला भोगावा लागू शकतो आणि दुर्दैवाने त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच होईल हे विसरू नका. हातावर टॅटू काढा ना चालेल. पण छातीच्या मधोमध, नाभीच्या खाली, मांड्यांवर टॅटू काढून त्याचं सार्वजनिक प्रदर्शन करणं हे चुकीचे आहे. अश्लाघ्य व घृणास्पद आहे.
तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्यापुरतं ठेवा. गुप्तपणे ठेवा. पण समाजासमोर विकृतीचं प्रदर्शन करू नका. आज जर आपण याकडे दुर्लक्ष केलं, तर उद्या हीच विकृती आपल्या घरात शिरलेली दिसेल. ह्या विकृतीमध्ये तुमच्या घरातील एखादी व्यक्ती अडकली जाईल. मग बोलू नका, आमचे घर बरबाद झाले आणि तेव्हा पश्चात्ताप करूनही उपयोग होणार नाही. समाज एकदा वाम मार्गावर गेल्यानंतर तुम्ही त्याला बदलवू शकता का? नाही ना..! मग जरा सुधारा आणि हे उद्योग जे चालू आहेत अंग प्रदर्शनाचे त्याला वेळीच आवर घाला. म्हणूनच वेळीच शहाणपण दाखवा. स्वातंत्र्यचा वापर नक्की करा. पण मर्यादेत राहून करा ही विंनती. समाजाला घाणेरडे विचारांचे करू नका बस… बायांनो…!!
तृप्ती पाटील (लेखिका)
मालाड, मुंबई



