“आयुर्वेदाशी नाते सांगणारे…माकडाचे दुकान”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण

“आयुर्वेदाशी नाते सांगणारे…माकडाचे दुकान”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण
“एका माकडाने काढलेय दुकान
आली गिऱ्हाईके छान छान
एका माकडाने….काढलेय दुकान..”
“जिंगल टून्स “…! कोणाकोणाला आठवतेय. पुन्हा पुन्हा पाहतच राहावीत अशी ही गाणी. कितीही वय झाले तरी, पुन्हा पुन्हा बालपण जगायला लावणारी जिवंत अशी ‘जिंगल टून्स’ची ही गाणी आजही मनाला पुन्हा पुन्हा भुरळ पाडण्याचे काम करतात. आता तर ते सहज मोबाईलवर पण उपलब्ध आहेत. सुंदर असे कार्टून्सचे ॲनिमेशन आणि छान छान गाण्यांचे कॉम्बिनेशन मला तर नेहमीच बालपणात घेऊन जाण्यास भाग पाडत आले आहे.
तसेच अभ्यासक्रम मंडळाच्या अभ्यासक्रमात असलेली इ. सातवीतील ‘बंदर का धंदा’ नरेंद्र गोयल लिखित माकडाच्या दुकानावरील कविता. ज्यामध्ये आयुर्वेदाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. कोणत्या जडीबुटीचा वापर केल्यानंतर काय होईल हे खूप सुंदररित्या कवितेतून विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला आहे. माकडाला एक आल्याचा तुकडा सापडतो आणि तो लाकडाचेच मेज बनवून स्वतःचे दुकान उघडतो. या कवितेत अस्वलाला सर्दी झालेली आहे. माकड त्याला आले व पिंपळाची मुळी सकाळी संध्याकाळी उकळून प्यायला सांगतो. मांजरीला शिकारीवर जायचे असते आणि तिला 104 ताप असतो. माकड तिला गीलोय अर्थातच गुळवेलचा काढा तीन वेळा प्यायला सांगतो. कोल्ह्याला सुंदर दिसायचे असते, म्हणून त्वचेसाठी तूप आणि कोरफड दिवसातून दोन वेळा माकड लावावयास सांगते. भारतीय प्राचीन परंपरेनुसार आयुर्वेदाचे महत्त्व पूर्वीपासूनच ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे तेच सांगण्याचा प्रयत्न नरेंद्र गोयल यांनी आपल्या या कवितेतून केला आहे.
खरं पाहता प्राणी कधीतरी आजारी पडताना दिसतात का? जे प्राणी आजारी पडत असतील ते मात्र माणसांनीच पाळलेले आणि माणसांच्या नियमावर चालणारे असतात. बाकी रानटी प्राणी कधीही आजारी पडताना आढळून येत नाहीत. याचा विचार माणसाने करायला हवा.माकडांपासून माणसाची निर्मिती झाली म्हणतात. माकडाला फक्त बोलता येत नाही, बुद्धीने तो श्रेष्ठच आहे. म्हणूनच की काय दुकान हे माकडाचेच असते.
आज राहुल दादांनी ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धे’साठी माकडाचे दुकान हा विषय दिला आणि निसर्ग पूजक असणारे प्राणी डोळ्यासमोर तळून गेले. आज समूहामध्ये सर्वांनी माकडाच्या दुकानाचा विविध प्राण्यांसोबत खाऊचा, फळाचा आस्वाद भरपूर घेतला. कोणी लबाडी केली तर कोणी पैसे देऊन खरेदी केली. समूह मात्र फळे, खाऊ या नैसर्गिक पद्धतीमध्ये रममान झाल्याचे आढळून आले. आज जणू माकडांच्या दुकानांची जत्राच भरली होती. निसर्गपूजा व निसर्ग संवर्धन करा हाच संदेश कदाचित दादांना या विषयातून आपणापर्यंत पोहोचवायचा असेल.
‘ताजी ताजी फळे खा, आणि आरोग्यदायी राहा.’ हा मोलाचा संदेश माकडाच्या दुकानामार्फत सर्व शिलेदारांपर्यंत नक्कीच पोहोचला आहे. सर्वांना पुढील लेखनासाठी भरभरून शुभेच्छा. मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल शतशः ऋण. चला तर मग जाऊया माकडाच्या दुकानात, ताजी ताजी फळे खरेदीसाठी… धन्यवाद!!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्य परीक्षक/ कवयित्री/संकलक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



