“दिखाऊपणा नव्हे तर.. शिक्षणाचे महत्त्व समजू या”; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्रचारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“दिखाऊपणा नव्हे तर.. शिक्षणाचे महत्त्व समजू या”; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
चित्रात एका बाजूला पेटलेली चूल. सभोवताली मातीचे माठ आणि खाटेवर बसलेले आजोबा. जणू काहीअंशी का होईना ज्ञानाचा घडा रिकामा राहिला, त्यामुळे आयुष्यभर कुठली ना कुठली धग सोसावी लागली हेच सांगत आहे. शिक्षणाविना आयुष्याचा एक कोपरा रिता राहिला याची खंत चेहऱ्यावर उमटलेली दिसते. आजोबा खाटेवर बसून शाळेतील मुलांकडे पाहत आहेत. त्यांच्या डोळ्यात दोन भावना आहेत – एक कौतुकाची आणि दुसरी थोडीशी खंताची. कदाचित त्यांच्या काळात त्यांना शाळेचं महत्व कळलं नाही. शेत, गुरं, आणि गरिबीमुळे शिक्षण राहून गेलं असेल. आज चूल पेटवायला, माठात पाणी भरायला जरी अंगात त्राण असले तरी आयुष्यभर अडाणीपणामुळे जे सोसावं लागलं, ते त्यांनाच माहीत. सहीऐवजी अंगठा, सरकारी कागद वाचता न येणं, पोरांना शिकवता न येणं… ही सल मनात आहे.
दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद शाळेकडे पावले टाकणारी चिमुकली पोरं अन् जुनी झालेली शाळेची पडकी इमारत खूप काही सांगत आहे. इमारत कच्ची आहे पण याच इमारतीत शिक्षणामुळे आयुष्याचा पाया पक्का होत आहे. इमारतीचा रंग उडाला आहे पण सप्तरंगी स्वप्ने साकार करण्याची हिंमत याच इमारतीतील शिक्षणातून मिळते. ज्ञानाचं दालन खुलं करून गगनभरारी घ्यायला लावणाऱ्या या इमारतीस दार तरी कुठे आहे. तिने स्वतः कधीच डामडौल केला नाही. पण तिच्यातील शिक्षणामुळे कित्येकांच्या आयुष्यात डौल आला. या शाळेने पालकांवर कधीच खर्चाचं ओझं टाकलं नाही. साधेपणातून समृद्ध जगणं ती शिकवते. केवळ तालावर चालणारे रोबो नव्हे तर अष्टावधानी विकास घडवते. हीच ती जिल्हा परिषद शाळा, जिथे मोफत शिक्षण आहे, दुपारचं जेवण आहे.
शिक्षक जीव लावून शिकवतात, घोकंपट्टी नव्हे तर व्यवहारज्ञान देतात. इथे दिखाऊपणा नव्हे तर शिक्षण महत्वाचे. इथं आहे शिक्षणाचं अस्सल खणखणीत नाणं.. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे शंभर नंबरी सोनं. या शाळांचे महत्व समजून घेऊन या. हल्ली या शाळादेखील आधुनिक होत आहेत. गोरगरिबांची व कष्टकऱ्यांची मुले इथे शिक्षण घेत आहेत. आज जे प्रतिष्ठित म्हणून वावरत आहेत तेदेखील याच जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहचले आहेत.
हा फोटो फक्त चित्र नाही, तर आपल्या गावची काल, आज आणि उद्याची गोष्ट आहे. म्हणूनच आजोबा पोरांना शाळेत जाताना पाहून सुखावतात व डोळ्यात या मुलांचे उज्वल भविष्य पाहतात. म्हणूनच, चला… वेळ निघून जाण्याआधी महत्व समजू या..!! शिकू या आणि शिकवू या. आज चित्रचारोळी स्पर्धेसाठीचे चित्र पाहून अनेकांना आपली बालपणातील शाळा आठवली असेल. मनाला संस्कार, बुद्धीला चालना व शरीराला कसरतीचे धडे देत सर्वांगीण विकास घडवणारी ही शाळा तिचे ‘महत्त्व समजू या’ शिक्षणाचे ‘महत्त्व समजू या.’ या आशयावर आलेल्या सर्वांच्याच रचना आशयघन अशाच. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



