शासकीय अधिकारी साहित्य संमेलन पुण्यात
शेखर गायकवाड संमेलनाध्यक्ष
शासकीय अधिकारी साहित्य संमेलन पुण्यात
शेखर गायकवाड संमेलनाध्यक्ष
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे दि.18डिसे (प्रतिनिधी) मराठी भाषेतला सर्वात मोठा महोत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सर्वअश्रुत आहे. यंदा हे संमेलन दिल्ली येथे भरणार असून सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर होणा-या या संमेलनाची चर्चा सध्या माध्यमात रंगली आहे. याच दरम्यान राज्य शासनाने मराठी भाषा धोरण नुकतेच जाहिर केले आहे. याअनुषंगाने पहिल्यांदाच पुण्यात भरविण्यात येणारे ‘शासकीय अधिकारी साहित्य संमेलन’ हे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका
आणि “संवाद” ही पुण्यातली सांस्कृतिक संस्था यांनी संयुक्तपणे या पहिल्या वहिल्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. दि. 20 ते दि. 22 डिसेंबर दरम्यान होणा-या या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी “यशदा” या शासकीय प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत असलेले माजी साखर आयुक्त व अनेक पुस्तकांचे लेखक असलेले श्री शेखर गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. राजेंद्र भोसले हे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार असून
” संवाद ” संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन हे संमेलनाचे निमंत्रक आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित या भव्य समारंभात महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून वरिष्ठ शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. प्रशासनात व लोक व्यवहारात मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन व संवर्धन होण्यासाठी पुढील काळात सर्वच स्तरावर व्यापक व विस्तृत प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे शासकीय अधिकारी साहित्य संमेलन आयोजन्यात आले आहे. त्यानिमित्त प्रशासकीय अधिकारी यांनी लिहीलेले साहित्य समाजापुढे यावे, नव्या लेखनासाठी त्यांना प्रेरणा मिळावी तसेच मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन मिळावे, मराठीच्या विकासात प्रशासकीय अधिकार्यांचे योगदान वाढावे, या उद्देशाने हे राज्यस्तरीय ‘अधिकारी साहित्य संमेलन’आयोजित करण्यात आले आहे, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर याही संमेलनात विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कविसंमेलन, कथाकथन, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त कविता, कथा, इतर माहितीपर लेखन करणारे शासनातले आजी-माजी प्रशासकीय अधिकारी संमेलनातील विविध कार्यक्रमात सादरीकरण करतील.
संमेलनाचा उदघाटन समारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असून संमेलन सर्वांसाठी खुले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने वरिष्ठ व सनदी अधिकारी यांना ऐकण्याची व भेटण्याची संधी सामान्य रसिक, पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांना मिळणार असल्याने एकूण उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रात मराठी साहित्याची मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेच्या धारेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या लेखकांनी आपल्या अनुभव विश्वाचे चित्र रेखाटून साहित्यात आपल्या परिने मोलाची भर टाकली आहे. त्या सर्व साहित्यिकांना या निमित्त हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. राज्याच्या प्रशासनात जवळपास एकूण १८ लाख अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकजण आपली शासकीय जबाबदारी सांभाळून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहेत. अनेकांना राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार सुध्दा मिळालेले आहेत. त्यादृष्टीने शासकीय अधिका-यांचे हे स्वतंत्र संमेलन भरवल्याने यापुढेही अनेकांना यातून प्रेरणा मिळेल.
पुणे महानगरपालिकेकडून या साहित्य संमेलनाची पूर्व तयारी जय्यत असून तशा संबंधित विभागांच्या सूचनांनुसार बिध्दता झाली आहे. या संमेलनासाठी मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत एक संमेलन समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपायुक्त राजीव नंदकर, शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक आशा उबाळे यांचा समावेश आहे.