जय जय महाराष्ट्र माझा
मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड

जय जय महाराष्ट्र माझा
“सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गरजला
होऊनी वादळ माझा शिवशंभो राजा..’
त्याग आणि कर्तृत्वांची यशोगाथा
रक्तात जपणारा हा महाराष्ट्र माझा…”
दिनांक १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी लढ्यांनंतर महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली आणि तेव्हापासून हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि स्मरणाचा आहे. पराक्रम, स्वाभिमान, संस्कृती आणि कर्तृत्व यांची गौरवशाली परंपरा लाभलेली ही भूमी म्हणजे महाराष्ट्र. संतांची पावन शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्वितीय पराक्रम, संभाजी महाराजांचे बलिदान समाजसुधारकांचे महान कार्य आणि कष्टकरी जनतेची जिद्द यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा कणा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या अभंगांनी आणि लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने महाराष्ट्राची परंपरा अधिक समृद्ध झाली आहे.
“भारूड,अभंग अन् ओव्या
माझ्या महाराष्ट्राची शान..,
लोककलेचा बाणा जपणारी
अशी मराठी संस्कृती महान..”
महाराष्ट्र दिन आपल्याला एकता, प्रगती, कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देतो तसेच इतिहासाची,संघर्षाची,आणि मराठी संस्कृतीची आठवण करून देतो.या दिवशी आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी कटिबद्ध रहाण्याची शपथ घेतली पाहिजे.
“जपूया मराठी बाणा…या महाराष्ट्र दिना…!
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.”
मृदुला कांबळे
गोरेगाव-रायगड
=========



