महाराष्ट्र माझा… आणि त्या आठवणींचा सुगंध..!
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

महाराष्ट्र माझा… आणि त्या आठवणींचा सुगंध..!
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…!” ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक मराठी मनाचा स्वाभिमान आहे. संतांची ज्ञानपरंपरा, छत्रपती शिवरायांचा पराक्रम, फुलें-आंबेडकरांनी दिलेली समतेची शिकवण आणि कष्टकऱ्यांच्या घामाने नटलेली ही भूमी माझा महाराष्ट्र!
‘१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन…’ इतिहास, कर्तृत्व आणि कृतज्ञतेचा संगम असलेला हा दिवस. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या मातीतल्या असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानाने हा दिवस पावन झाला आहे. याच दिवशी जगभर कामगार दिन साजरा करून श्रमिकांच्या कष्टांना मानाचा मुजरा दिला जातो. शेतकरी, कामगार, कारागीर, शिक्षक या सगळ्यांच्या श्रमातूनच महाराष्ट्र उभा आहे, वाढत आहे, आणि तेजाने झळकत आहे. म्हणूनच ‘हा दिवस केवळ उत्सव नाही… तो आहे कृतज्ञतेचा, अभिमानाचा आणि आपल्या ओळखीचा दिवस!’
मात्र, “माझ्यासारख्या शिक्षकांसाठी या दिवसाचं एक वेगळंच स्थान होतं… हा दिवस म्हणजे शाळेचा निकाल दिवस!” सकाळपासूनच शाळेच्या प्रांगणात एक वेगळीच लगबग असायची, प्रसन्न वातावरण, ध्वजाला दिलेली मानवंदना, आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेले ते उत्सुक चेहरे… त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत स्वप्नं असायची, आणि त्या स्वप्नांना आज पंख फुटणार असायचे.
‘निकाल मिळताच आनंदाने उजळलेले ते चेहरे…’
‘हातात प्रगतीपुस्तक घेऊन बागडणारी ती मुलं…!
“शिक्षकाच्या आयुष्यातील खरी कमाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान…” आणि त्या सगळ्यातला सर्वात हळवा, गोड क्षण म्हणजे, “मॅडम… सर… पेढा घ्या ना!” पेढ्यांच्या गोडीत दडलेलं प्रेम… आणि आजही दरवळणाऱ्या शाळेच्या आठवणी… त्या छोट्याशा पेढ्यात केवळ साखरेचा गोडवा नव्हता, तर प्रेम, आदर आणि आपुलकीचा सुगंध होता. त्या एका क्षणात शिक्षक म्हणून वर्षभराचा थकवा नाहीसा व्हायचा… आणि नकळत ओठांवर आशीर्वाद यायचे, “विजयी भव… सुखी भव…”
आजही त्या आठवणी मनात दरवळतात… पण २०२४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर हे सगळं आता केवळ आठवणीत उरलं आहे आता १ मे आला की मन पुन्हा त्या शाळेकडे धाव घेतं… त्या किलबिलाटाची, त्या आनंदाची, त्या पेढ्यांच्या गोडीची आठवण येते… आणि मनात एक हळवी पोकळी उमटते… तरीही एक समाधान आहे. या महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या यशात माझाही एक छोटासा वाटा आहे… हीच माझी खरी संपत्ती, हीच माझी कमाई!
हा महाराष्ट्र केवळ भूमी नाही, तर संस्कारांचा वारसा आहे…
ज्ञान, कष्ट आणि स्वाभिमान यांची अखंड परंपरा आहे…
इथे शब्दांना अर्थ आहे, श्रमांना मान आहे आणि माणुसकीला स्थान आहे. “जन्मोजन्मी पोटी यावे या मराठी मातीच्या, गंध जीवनात दरवळो या महाराष्ट्र भूमीचा…” आज त्या सगळ्या क्षणांना मनापासून वंदन…! आणि अभिमानाने उच्चार ‘जय महाराष्ट्र…! जय हिंद…!’
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
=======



