‘प्रेमाची स्पंदने’ विश्वबंधुत्व निर्माण करणारी प्रेरक शक्ती: वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘प्रेमाची स्पंदने’ विश्वबंधुत्व निर्माण करणारी प्रेरक शक्ती: वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
प्रेम ही ईश्वरानं दिलेली अनमोल देणगी आहे. ते अनुपमेय आहे. फुलातला सुगंध, तळपत्या उन्हात आलेली वाऱ्याची गार झुळूक, वाळवंटा तील ओॲसिस ही जणू प्रेमाचीच रूपं आहेत. मनाच्या तारा हलकेच छेडून जाणारी, हृदयाला कोमल करणारी आणि जीवनाला अर्थ देणारी भावना म्हणजे प्रेमाची स्पंदनं. ही स्पंदनं अनुभवली जातात; ती शब्दांत पूर्णपणे मांडता येत नाहीत. प्रेम मनाला शांतता देतं आणि जीवनाला एक अदृश्य आधार देतं. प्रेमाची स्पंदनं हृदयाला नवजीवन देतात. आपुलकीच्या एका हलक्या स्पर्शात, एका प्रेमळ नजरेत किंवा शब्दाविना दिलेल्या आधारातही ही स्पंदनं जाणवतात. प्रेम म्हणजे अंधारातही दिशा दाखवणारा प्रकाश—अशा या स्पंदनांनी मनातील नकारात्मकता दूर होऊन आशेचा किरण जन्माला येतो. प्रेमात शब्दांची गरज नसते; नजरेतील भावना पुरेशा ठरतात.
दोन प्रेमीजीव जेंव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेंव्हा त्यांना ही प्रेमाची स्पदनं जाणवतात. पण प्रेम करून चालत नाही, तर ते निभवावं लागतं. खऱ्या प्रेमात त्याग,समर्पण अपेक्षित असतं. कधी कधी क्षणिक वाटणाऱ्या आकर्षणाला प्रेम समजलं जातं. पण ही वासनासुध्दा असू शकते. आईची माया, प्रेम हे उदात्त असतं.ते नवजात बाळाला जाणवतं. किती निर्धास्तपणानं ते बाळ त्या निर्व्याज मिठीत पहुडतं.
एकंदरीत, प्रेमाची स्पंदनं म्हणजे जीवनाला अर्थ देणारी नाजूक, पण अढळ ऊर्जा. ती मनाला कोमल बनवतात, नात्यांना आकार देतात आणि माणसाला अधिक संवेदनशील बनवतात. जिथं प्रेमाची स्पंदनं असतात, तिथं विश्वास, उमेद आणि सौंदर्यही आपोआप नांदतं. म्हणूनच, प्रेमाच्या या सूक्ष्म स्पर्शाला जपणं, समजणं आणि अनुभवणं आवश्यक आहे.कारण हृदयाची हीच भाषा माणसाला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवते.
पण आजकाल प्रेम विकृत रुप धारण करताना दिसत आहे. प्रेमाची स्पदनं दोघांना न जाणवता एकाला जाणवतात. यातूनच एकतर्फी प्रेमाचा वेडेपणा जन्म घेतो.त्यामुळं किती तरुणी बळी गेल्या आहेत! आता काही वासनांध बाप आपल्या मुलींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकतात, हे कशाचं स्वरूप! प्रेमाची स्पदनं ओळखून दोघांनी जर नातं जोडलं तर ते टिकवलं पाहिजे. प्रेमाच्या स्पदनांची ताकद अफाट आहे. विश्वात बंधुत्व निर्माण करणारी ती दिव्य शक्ती आहे. त्यामुळं संत ज्ञानेश्वर माऊलीनं विधात्याकडं पसायदानातून मागितलेल्या विश्व कल्याणाच्या मागणीची पूर्तता होईल. आजच्या ‘सोमवारीय काव्यत्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी नेहमी प्रमाणेच वैचारिक विषय दिला आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला,त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



