Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

एक तारा निखळला…!!

प्रशांत दत्तात्रय ठाकरे मु.पो.खाकुर्डी तालुका.मालेगाव,जिल्हा नाशिक.

0 4 8 2 8 2

एक तारा निखळला…!!

दिनांक २१ऑक्टोबर २०२५…. लक्ष्मीपूजनाचा दिवस. माझ्या ५१ वर्षाच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस. त्या दिवशी परमेश्वराने माझा श्वास माझ्याकडून हिरावून नेला. आमच्या परिवाराचं काळीज आम्हांपासून कायमचं, अगदी कायमचं दूर नेलं. माझे दाजी आदरणीय रावसाहेबसो तुषार बेहेरे यांचे अपघाती दुःखद निधन झाले. आम्हावर दुःखाचा डोंगर कोसळला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या लक्ष्मीरुपी ताईचं सौभाग्य कायमचं पोरके झालं. आयुष्याने इतकं निर्दयी वळण घेतलं की, श्वास चालू राहिला पण मन मात्र कायमचे थांबलं. एका त्रयस्थाच्या चुकीने आमच्या रावसाहेबांचे जीवन कायमचे उद्ध्वस्त केले. आदरणीय रावसाहेब प्रतिष्ठित, उच्च कुटुंबात जन्मलेले. जखाणे, तालुका शिंदखेडा येथील प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबात राजाराम बापूजींचा, शामराव दादांचा, नर्मदाताईंचा आणि सिंधुमाईंचा वारसा ते समृद्धपणे जपत होते.आठ बहिण भावाचे मोठे कुटुंब त्यात हे सर्वात लहान होते,सर्वांचे लाडके आणि जबाबदारी सांभाळणारे होते.मातीचे मूल्य काय असतं हे शिकायचं असेल तर ते रावसाहेबांकडून. गेली अनेक वर्ष काळ्या आईची सेवा करताना धुळे ते जखाणे हा शेतीसाठीचा येऊन जाऊन ७० किलोमीटरचा प्रवास लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवटचा ठरला.

रावसाहेब उच्च विद्या विभूषित होते नोकरी तर सहज त्यांना मिळू शकली असती. परंतु वडिलोपार्जित शेती व्यवसायाशी आधीपासून त्यांची नाळ जुळली होती. काही माणसं आयुष्य जगत नाहीत, ती आयुष्य अर्थाने भरून काढतात. रावसाहेब हे असेच होते… ज्यांच्यासाठी शेती ही उपजीविका नव्हे, तर आईसारखी पूजनीय होती. त्यांनी मातीला हात लावताना कधी नफ्याची घाई केली नाही, तर संयम, कष्ट आणि स्वीकार या तीन तत्त्वांवर आपलं जीवन उभारलं. बी पेरताना ते भविष्य पेरत, पिक उगवताना आशा जपत आणि नुकसान झालं तरी निसर्गाशी भांडत नव्हते. कारण आईशी भांडून कोणालाही समाधान मिळत नाही. आजच्या काळात “हेच चालत आलंय” या चौकटीत अडकलेल्या शेतीला रावसाहेबांनी प्रश्न विचारायला शिकवलं. त्यांचे प्रयोग केवळ तांत्रिक नव्हते, ते वैचारिक धाडसाचे प्रतीक होते. कारण प्रयोग करण्यासाठी आधी अपयश स्वीकारण्याचं सामर्थ्य लागतं आणि ते सामर्थ्य त्यांच्या शांत स्वभावात खोलवर रुजलेलं होतं.

शेती त्यांच्या अंतःकरणातली श्रद्धा होती.घाम गळाला की माती पवित्र होते, आणि माणूस नम्र होतो हा बोध त्यांनी आयुष्यभर जपला. पण नियतीने अचानक आपला कठोर प्रयोग केला. अपघाताने देह हरपला, आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. आज शेत शांत आहे… कारण विचार करणारे हात थांबले आहेत. आज माती ओलसर आहे… कारण पावसाहून जड आपली वेदना तिच्यात मिसळली आहे. मृत्यू हा शेवट आहे. हे मान्य करणं सोपं आहे, पण ज्या माणसाने जीवनाला अर्थ दिला, त्याचं जाणं हा अर्थ हरवण्याचा क्षण आहे. एक क्षण…. एक अपघात….. आणि सगळं संपलं. हसत,खेळत अपूर्वाच्या साखरपुडाच्या अतीव आनंदात ते क्षणार्धात आम्हास पोरकं करून गेले. अगदी आकाशातून निखळलेल्या ताऱ्यासारखे.त्याचा तो तेजस्वी चेहरा कायमचा दूर झाला.

माझ्यासाठी तर ते सर्व काही होते. त्यांचा माझ्या पाठीवरचा तो हात, तो विश्वास,ते प्रेम साऱ्यांनाच मी मुकलो. सारं विश्व एका बाजूला आणि रावसाहेबांचे प्रेम एका बाजूला. तसा मी आधीपासून कमनशिबीच….वडील लवकर गेलेत,तरुण भाऊ गेला. कुणाचीच कमी मला भासू दिली नाही.माझ्याकडे आज सारं काही आहे पण त्यांच्याविना सारं सुने आहे. रावसाहेबांच्या आकस्मित जाण्याने अनेक जबाबदारीचे ओझं,जे ते स्वतः लीलया पेलत होते,ते सर्वांवर आले. ते स्वतः उन्हात होते परंतु उन्हाचे साधे किरण ही त्यांनी आमच्या परिवारास कधी लागू दिले नाही. स्वतः दिव्यासारखे जळत राहिले आणि त्यांच्या प्रकाशात आम्ही सर्व उजळत राहिलो.आज माझ्या ताईच्या घरात शांतता आहे ती शांतता त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव करून देते. जिथे त्यांचा आवाज घुमायचा आज तिथे शब्दही घाबरून उभे आहेत. जिथे त्यांचं हसू फूलायचं तिथे आज अश्रूंची सावली आहे.प्रत्येकाच्या तोंडी हेच आहे की… असं कसं होऊ शकतं??

हे खरं नाही.. असं होऊ शकत नाही. रावसाहेब खूप कणखर होते, कित्येक संकटांना आव्हान देऊन ते सामोरे जात होते.शेतीत अनेक अडचणी येत होत्या, त्यावरही ते मात करीत होते व पुढे जात कुटुंबाच्या स्वप्न पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.त्यांचे असे आकस्मित जाणं खूप वेदनादायी आहे.प्रत्येक पावलावर त्याची आठवण आणि प्रत्येक श्वासात त्यांची उणीव कधीच भरून निघणारी नाही.त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण ते व्यक्ती नाही तर भावना होते.आधार ही होते,धीर देणारे हात होते व आपुलकीने मिठी मारणारी सावली ही तेच होते .त्याचे असे अकस्मित जाणं विशेष करून माई,अपूर्वा,अनुराग, कुणाली आणि साऱ्या कुटुंबीयांना पोरक करणारे ठरलं. माझ्या ताईसाठी…!

ते फक्त संसाराचा आधार नव्हते तर, तिच्या आयुष्याचा विश्वास होते.३३ वर्षाच्या सुखी संसारात एक क्षणाचाही विरह नव्हता.तिचे मन हा कायमचा विरह कसे स्वीकारेल अपूर्वा…तिच्या जीवनातील पप्पांचे स्थान फार अमूल्य होते ,आज तिच्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाच्या प्रारंभात त्यांचे असे जाणे खूप वेदनादायी आहे. आज आयुष्य मोठं आहे, पण ती सावली अचानक नाहीशी झाली आहे. प्रत्येक निर्णयापूर्वी “पप्पा असते तर…” हा अपूर्ण विचार तिच्या मनात खोलवर रुतून बसला आहे. अनुरागसाठी… ते मार्गदर्शक होते, त्याच्या हातात हात देऊन जग समजून घ्यायचं होतं, पण आता त्या हाताची उब फक्त आठवणीत उरली आहे. वडिलांच्या पावलांवर चालायचं स्वप्न आज जबाबदारीत रूपांतरित झालं आहे.

कुणाली….अवघा सहाच महिन्याचा सहवास तिच्या नशिबात होता. पण या अल्प काळात पण तिला वडिलांचे प्रेम देणारे रावसाहेब असे सोडून जातील हा विचारपण केला नव्हता. मृत्यूने जरी रावसाहेबांना आमच्यापासून दूर नेलं तरी आम्हा प्रत्येकाच्या श्वासात ते आहेत,आमच्या डोळ्यात ते आहेत आणि प्रत्येक न बोललेल्या अश्रुतही तेच आहेत….

विद्विग्न मन आज प्रश्न विचारतं…
इतकं लवकर का?
इतकं अचानक का?
आपल्याला अजून खूप जगायचं होतं ना?
पण या प्रश्नांना उत्तर नाही…
फक्त न संपणारी हूरहूर आहे.

आपलं जाणं आम्हाला शिकवून गेलं… आयुष्य किती क्षणभंगूर आहे, आणि आपली माणसं किती अमूल्य आहेत. कदाचित देवाला आपली जास्त गरज असावी, म्हणूनच त्याने आपणास इतक्या लवकर त्याच्या जवळ बोलावलं असावं. ‘एक तारा निखळला’ आहे… आमचं आकाश आज काळवंडलं आहे. पण त्या तारकाचा प्रकाश आमच्या आठवणींमधून, आमच्या प्रेमातून, आणि आमच्या अश्रूंमधून सदैव झळकत राहील.

“आपण गेलात, पण विसरता येणार नाही,
आपली उणीव आयुष्यभर बोचत राहील..,”

रावसाहेब गेले… इतक्या सहजपणे हे वाक्य लिहिताना हात थरथरतो, कारण या दोन शब्दांत माझे अख्खे जग कोसळले आहे. कालपर्यंत ज्यांच्या अस्तित्वाने आयुष्य उजळले होते, ते आज काळाच्या अंधारात विलीन झाले आहेत. एक तारा निखळला आकाशात शांतता आहे, पण मनात असह्य कोलाहल. रावसाहेब हे केवळ नात्यातील एक स्थान नव्हते. ते न बोलता समजून घेणारी आपुलकी होते, अडचणींच्या उन्हात सावलीसारखे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या उपस्थितीने घराला घरपण येत होते. आज घर आहे, पण त्यातला जीव हरवला आहे. भिंती तशाच आहेत, वस्तू तशाच आहेत, पण त्या सगळ्यांवर एक निर्वात पसरले आहे.

त्यांचे बोलणे कधी मोठ्याने नव्हते, पण शब्द खोलवर रुतत. त्यांचे हसणे कधी दणदणीत नव्हते, पण ते मन शांत करत असे. त्यांनी आयुष्य मोठ्या घोषणांनी नाही, तर लहान लहान माणुसकीच्या कृतींनी जगले. आज त्यांच्या जाण्याने हेच जाणवते की, खरे मोठेपण आवाजात नसते, तर अस्तित्वात असते. आपण गेल्यानंतर मी अनुभवलं… आज तीन महिने होत आलेत तरीही सांत्वनासाठी भेट देणाऱ्यांची संख्या कमी होत नाही,यातूनच आपल्या कार्यकर्तृत्वाची ओळख होते. अपघात हा एक क्षण असतो, पण तो मागे सोडून जातो एक अखंड दुःख. त्या एका क्षणाने कितीतरी आयुष्यांची दिशा बदलली. काही स्वप्ने अर्धवट राहिली, काही नाती मुक झाली, आणि काही मने कायमची पोरकी झाली. नियती इतकी निर्दयी का असावी, हा प्रश्न मनात घुमतो,पण उत्तर मात्र मिळत नाही.फक्त शांतता मिळते, आणि त्या शांततेत अधिक वेदना.

आज त्यांच्या आठवणींनी मन गच्च भरून येते. प्रत्येक आठवण जणू हळूच विचारते“मी इथे आहे, पण आपण नाही.” वेळ जाईल, दिवस पुढे सरकतील, पण ही उणीव कुठेतरी कायमची थांबून राहील. कारण काही माणसे आयुष्यात येतात आणि जात नाहीत तर ती आपल्या श्वासात मिसळून जातात. रावसाहेब, तुम्ही आमच्यातून निघून गेलात, पण आमच्यापासून नाही. तुमची माणुसकी, तुमची शांत उपस्थिती, आणि तुमचे निर्मळ अस्तित्व काळालाही झुगारून उरले आहे. तुम्ही दिलेल्या आठवणींच्या प्रकाशातच आता आम्ही हे अंधारलेले दिवस पार करू. आपण गेल्यानंतरही शांततेचा ठसा राहिला, घरभर पसरलेली आपली आपुलकी आजही बोलकी आहे. शब्द थकले तरी आठवणी थकत नाहीत, मन नतमस्तक होऊन आपल्या स्मृतींना आदराने वंदन करतो. ‘ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो. आणि आम्हाला तुमच्या नसण्याशी जगण्याचे बळ देवो.’

प्रशांत दत्तात्रय ठाकरे
मु.पो.खाकुर्डी
तालुका.मालेगाव,जिल्हा नाशिक.
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे