Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

तू आधुनिक राहत नाही

गौरी संतोष नेर्लेकर श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

0 4 8 2 9 4

तू आधुनिक राहत नाही

मी अगदी चौथीत असल्यापासून केस वाढवलेत. केसांना खालून थोडाफार शेप देण्या व्यतिरिक्त मी कधीच केस कापले नाहीत. त्यामुळे आता चाळीशीतही केसांची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे माझे केस बऱ्यापैकी लांब आहेत. आणि मला लांब केसच आवडतात. केसांची वेणी घालणं, मला जास्त सोयीस्कर वाटतं. तसंच पेशानं शिक्षक असल्याकारणाने केस मोकळे सोडणं जरी आवडलं तरी, मला पटत नाही. केस छोटे असतील तर ते चांगलं वाटतं, पण लांब केस जर रोज मोकळे सोडायचे म्हणलं तर, मला मुलांना शिकवण्याऐवजी केसच आवरत बसावं लागेल. गमतीचा भाग सोडला, तर राहणीमानाची अशी कोणती व्याख्या नाही असं मला तरी वाटतं. ज्याला ज्या पोशाखात, केशरचनेत आरामदायी, सुटसुटीत, आत्मविश्वासपूर्वक वाटेल ते राहणीमान त्याच्यासाठी योग्य असं मला वाटतं. हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. त्यावरून कोणी कोणाला नावं ठेवणं अजिबातच योग्य नाही. हा शेवटी वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आला. शेवटी आपली चांगली विचारसरणी जास्त महत्त्वाची. दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधणं, दुसऱ्याच्या दुःखात सामील होणं,आपल्या विचारांवर ठाम असणं आत्मविश्वसपूर्वक वागणं, साध राहणं या गोष्टी फार मोलाच्या आहेत. नैसर्गिक राहणं केव्हाही चांगलं.

माझ्या मुलाचा मला खूप आग्रह असतो. आई, ‘तू फॅशन करत नाहीस, पार्लरमध्ये जात नाहीस, जास्त काही मेकअप करत नाही, केस मोकळे सोडत नाहीस’. असं बरंच काही. थोडक्यात त्याच्या भाषेत सांगायचं तर मॉडर्न राहत नाही. तू मॉडर्न राहत जा. आधुनिकता म्हणजे तरी काय? राहण्याची आधुनिकता, विचारांची आधुनिकता, वागण्याची आधुनिकता, बोलण्याची आधुनिकता कोणती आधुनिकता? असा प्रश्न पडतो. मुलाचं आपल्यावर असणार प्रेम, लक्ष पाहून सुखद वाटलं. त्याच्या आग्रहास्तव केस मोकळे सोडून फोटोही काढले, एकदाची त्याची हौस पूर्ण केली आणि अर्थातच माझीही. पण ते तेवढ्यापुरतं नेहमीसाठी माझ्यासाठी ते जुळणारे म्हणण्यापेक्षा सोयीस्कर नव्हतं. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. प्रत्येक गोष्टीला वेगळं महत्त्व आहे. प्रत्येकाचे वेगळे असं स्थान आहे. हा छोटा तो मोठा असं काही नसतं.

शेवटी सौंदर्य ही आपल्या नजरेत असतं. कुणाला ते सावळ्या विठ्ठलात दिसतं, तर कुणाला ते चंद्रात दिसतं. ‘काजळ काळं असतं म्हणूनच ते डोळ्यांचं सौंदर्य वाढवतं.’ अंधार आहे म्हणून प्रकाशाला महत्त्व आहे आणि नेहमीच उजेडच असेल तर काळोख्या रात्री काजव्यांचा सौंदर्य पाहता येईल का? दिवस संपल्यानंतर रात्रीची ओढ लागते तर रात्र संपताना दिवसाची ओढ लागते. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण. शेवटी व्यक्ती परत्वे सौंदर्याच्या, राहणीमानाच्या व्याख्या बदलतात. आई आपल्याला रुचकर जेवण बनवते तिच्या हाताला काही वेगळं सौंदर्य असतं. शिक्षक विद्यार्थ्यांना मन लावून शिकवतात, त्यांच्या शिकवण्यात एक वेगळं सौंदर्य असतं.

शेतकरी राबराब शेतामध्ये राबतो त्याच्या कष्टाला एक अमूल्य सौंदर्य आहे. पावसाळ्यात गरम गरम भजी करणारा छोट्याशा हॉटेलमधला कामगाराच्या हाताला वेगळं सौंदर्य आहे. स्वतःला राहण्यास घर नसेल परंतु इतरांच्या इमारती बांधून देणाऱ्या कामगाराच्या हाताला किती मोठे सौंदर्य आहे. सुंदर गाणं म्हणणाऱ्या गायक गायिकेच्या गळ्यात सौंदर्य,कष्ट करणाऱ्या बापाच्या घामात सौंदर्य, कामवाल्या मावशी लक्ख कपडे धुतात तेव्हा त्यांच्या हाताचा सौंदर्य, साफसफाई करणाऱ्या कामगाराच्या कामाचं सौंदर्य, कवीचं सौंदर्य त्याच्या कवितेतून दिसून येतं.अशा विविध गोष्टी, पूर्ण सृष्टी सौंदर्याने नटलेली आहे यात मात्र शंका नाही.

फक्त आपल्याजवळ तशी नजर हवी आणि आपल्याला तो आस्वाद घेता आला पाहिजे. त्या प्रत्येक गोष्टीचे महत्त्व जाणलं पाहिजे. कोणतीही गोष्ट कमी महत्त्वाची नाही. प्रत्येक गोष्टीला, वस्तूला महत्त्व आणि त्याची वेगळी सुंदरता असते. हे जास्त चांगलं किंवा ते जास्त चांगलं नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट वेळेनुसार, परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार तिला ते महत्त्व येतं. जगामधील प्रत्येक व्यक्ती गोष्ट वेगळी आहे, परमेश्वराने सुद्धा ते वेगळेपण जाणलय, दाखवलंय आणि रुजवलयं. आपणही त्या त्या वेगळेपणाविषयी आदर , सन्मान, प्रेम मनामध्ये राखलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा त्याच्या सुंदरतेचा, वेगळेपणाचा मान ठेवला पाहिजे. हे मात्र खरं.

गौरी संतोष नेर्लेकर
श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे