किल्ले चंदन व वंदनगड
सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या मुख्य कड्यावरून पसरलेल्या महादेव डोंगररांगेवर वसलेला हे किल्ले आहेत. किल्ल्याला ट्रेकर्स आणि यात्रेकरू वारंवार भेट देतात. किल्ला परिसरात समृद्ध शेती परिसर आहे. ‘चंदन आणि वंदन’ हे लगतचे किल्ले आहेत. अगदी जुळे भाऊ असावेत तसे दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. दोन्ही गडाचा ट्रेक एका दिवसात सहज पूर्ण करता येतो.
चंदनगड तीन टप्प्यात आढळतो. गडावर प्रवेश करतानाच राजा भोजाने उभारलेल्या दोन दगडी मिनारी आपले स्वागत करताना दिसतात. चंदनगडावर पंचलिंगी दोन शिवलिंग असलेले महादेव मंदिर आहे. असे मानले जाते की, शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले. चंदनगडाच्या मध्यभागी एक पायापर्यंत बांधलेला चौथरा आहे. गडाच्या नैर्ऋत्य बाजूस दारूगोळा कोठार आहे. गडाच्या वायव्येस एक बुरूज असून शेजारी एक शिवलिंग असलेली समाधी आढळते. तिच्यावर एका बाजूला मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे.
वंदनगड पाच टप्प्यात आढळतो. वंदनगडावर मराठा स्थापत्य शैलीतील एक प्रवेशद्वार आहे. त्यावर कीर्तिचक्र आणि गणेश प्रतिमा कोरलेली आढळते. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते. सध्या ते मातीत बुजले आहे. भोजकालीन प्रवेशद्वार पन्हाळ्यावरील प्रवेशदाराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. याच्या उत्तरेला पुरातन तुरुंग आहे. गडाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला तटबंदीलगत खंदक आहे. महाराणी ताराबाईंनी हा बनवून घेऊन तब्बल दोन वर्ष शाहूशी लढाई केली होती. वंदनगडावर पायऱ्या असलेली पाच तळी होती. यापैकी एक बुजले असून चार तळी सुस्थितीत आहेत.
बालेकिल्ल्याच्या पायथ्याला छप्परी मंदिर व वायव्येस काळूबाई मंदिर आहे. गडावर तीन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत. तीन दालने असलेले हे दारुगोळा कोठार गडाच्या मध्यभागी आहे. गडावर पुरातन राजवाडा आणि त्याचे अवशेष पहावयास मिळतात. गडावर एक टेकडी असून, तिला बालेकिल्ला म्हणतात. यावर एका बुरुजाचे तसेच इमारतीचे अवशेष आहेत. पूर्वेस तसेच वायव्य दिशेस शेकडो पडक्या घरांचे अवशेष आढळतात. दक्षिणेस एक चोरवाट आढळते. वंदनगडावर पूर्वेस एक आणि दक्षिणेस एक या प्रमाणे चाके नसलेल्या चुन्याची घाणी आहेत. पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच ‘चंदन वंदन’ हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध



