Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

‘शत्रूच्या नजरेतून सुटून आत-बाहेर जाण्यासाठी, बांधलेला गुप्त दरवाजा’; स्वाती मराडे

'गुरुवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 3 2 1 8

‘शत्रूच्या नजरेतून सुटून आत-बाहेर जाण्यासाठी, बांधलेला गुप्त दरवाजा’; स्वाती मराडे

‘गुरुवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

घनघोर तमाने मन वेढलं होतं, मार्ग सुचत नव्हता, कुठे जावे कळत नव्हते. तेव्हा आला तो धावून आशेचा किरण आणि सुचला एक मार्ग, जो जात होता चोर दरवाजातून. खरे तर तो आजवर लपवून ठेवला होता, कोणालाही दिसू न दिला. अगदीच नाईलाज झाला तर असावा म्हणून… संकटात सावरायला, हात द्यायला, तमातून बाहेर काढायला. लोक त्याला पळवाट म्हणतीलही. पण नाही, ही पळवाट नाही. ही आहे एक संधी पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी. प्रसंगी एक पाऊल मागे घेऊन योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी.

‘चोर दरवाजा’ हा फक्त पळण्यासाठी नसतो. तो स्वतःला वाचवण्यासाठीही असतो. मनातलं दुःख, अपमान कोणी ऐकून घेत नाही; तेव्हा माणूस आपल्या आतल्या चोर दरवाजाने एका कोपऱ्यात जाऊन रडतो, स्वतःला सावरतो आणि पुन्हा मुख्य दरवाजाने जगासमोर हसतमुखाने येतो. म्हणून चोर दरवाजा वाईटच असतो असं नाही. प्रश्न एवढाच आहे की आपण त्याचा वापर पळून जाण्यासाठी करतोय की स्वतःला सावरण्यासाठी?

फक्त संकटातच नाही, तर प्रेमातही या चोर दरवाजाची अनुभूती येतेच. चोर दरवाजातून वाकून जावं लागतं, तसंच कुणाच्या हृदयात स्थान मिळवायचं असेल तर थोडा अहंकार वाकवावा लागतो, तेव्हाच त्या प्रेमाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळतो. महादरवाजा म्हणजे वरवरचा शाब्दिक प्रवास – काय चाललंय? कसा आहेस? पण न सांगता कळणारी काळजी, मौनातील अस्वस्थता, हसण्यामागचं दुःख ओळखणं… हेच आहेत अंतरी स्थान मिळवण्याचे चोर दरवाजे.

रोजच्या ओळखीच्या वाटेने नाही…
तू आलीस त्या चोर दरवाजाने,
जिथे शब्दांना बंदी होती.
नजरेने नजरेला हळूच विचारलेस,
आणि माझ्या आतलं सगळं कळलं तुला
जगाला दिसला महालाचा डौल,
पण तुला दिसली.. महालामागची माझी पोकळी.
प्रेमाला खरं तर महाद्वार नसतंच,
असतो एक छोटा, वाकून जावा लागणारा,
फक्त दोघांनाच माहीत असणारा – चोर दरवाजा.
तिथूनच तर येते कोणी, आयुष्यभरासाठी…!

आज ‘गुरुवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र किल्ल्यावरील चोर दरवाजाचे. वेलींनी वेढलेला, अरुंद तोंडाचा, सहजासहजी लक्षात न येणारा. प्रत्येक किल्ल्याला, प्रत्येक वाड्याला एक चोर दरवाजा असतोच. शत्रूच्या नजरेतून सुटून आत-बाहेर जाण्यासाठी, अडचणीतून निसटण्यासाठी बांधलेला एक छोटा, गुप्त दरवाजा… ज्याची कळ फक्त जवळच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींनाच माहिती असते. गडकिल्ले म्हटलं की आठवतात ते छत्रपती शिवराय नि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा मंत्र. त्यामुळेच चोर दरवाजा पाहताच गडकिल्ले व शिवराय यांना चारोळीबद्ध करत अनेक रचना साकार झाल्या. पण लाक्षणिक अर्थाने रचनांचा अभाव वाटला. चित्रसापेक्ष व चित्रातील सूचक अर्थ पहात लेखनासाठी शुभेच्छा. सहभागी सर्व रचनाकारांचे अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 2 1 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे