
0
6
5
0
7
2
झोपडी
चंद्रमौळी झोपडी माझी
जणू रिमझिम श्रावण
कुठे गळते टिपटिप
कुठे पडते हो ऊन..
लपंडाव करीतसे
ऊन सावलीचा खेळ
सुख आणि दुःखाचा
तिचा अनोखा हा मेळ..
घन बरसता दुःखाचे
होई गहिवरून ओली
पडे आशेचा कवडसा
देई सुखाची सावली..
कष्टाची भाजी भाकरी
भासते पुरण पोळी
झोप लागते निवांत
जागे करते भूपाळी..
ऊन पावसाचा खेळ
माझ्या कुटीची ती शान
सप्तरंग उधळे तेव्हा
इंद्रधनूची कमान..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे
0
6
5
0
7
2



