दिवा विझण्याआधी..!!
राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

दिवा विझण्याआधी..!!
दिवाळीच्या आदल्या रात्री मी मुद्दाम सगळे दिवे बंद केले. घरात काळोख होता आणि त्या काळोखात मला माझंच घर नवं वाटू लागलं. किती वर्षांनी मी अंधाराला डोळे भरून पाहिलं होतं? आम्ही लहानपणी अंधाराला घाबरायचो. आज आम्ही प्रकाशाला घाबरतो. कारण प्रकाशात सगळं उघडं पडतं. अंधारात तरी मुखवटे चालतात. आई म्हणायची, दिवा लावणं ही प्रार्थना आहे. वात वळणं ही साधना आहे. तेल घालणं हे समर्पण आहे. एका पणतीमागे किती तत्वज्ञान दडलेलं असतं. वात स्वतः जळते, पण दुसऱ्याला प्रकाश देते. जळणं आणि जगवणं यातला फरक पणतीच शिकवते.
माझ्या पणजीनं लावलेली पणती कोणती? तिच्याकडे तेलही नव्हतं, फक्त श्रद्धा होती. तिची पणती मातीची होती, पण तिचा प्रकाश पिढ्यांपर्यंत पोहोचला. आमच्याकडे आज सगळं आहे. क्रिस्टलचे दिवे आहेत, पण त्या दिव्याखाली बसून आम्ही एकमेकांशी बोलतही नाही. आमचा प्रकाश डोळे दिपवतो, मन उजळवत नाही. दिवाळीच्या बाजारात मी पाहिलं. लोक दिवे विकत घेत होते. किंमतीवर घासाघीस करत होते. “दहा रुपयाला पणती महाग आहे” म्हणणारा माणूस पाचशे रुपयाची ‘एलईडी’ माळ हसत घेत होता. आम्हाला सोयीचा प्रकाश हवा आहे, संस्काराचा नको.
पण त्या गर्दीत एक म्हातारी भेटली. तिच्या टोपलीत वीस पणत्या होत्या. हात थरथरत होते. मी म्हटलं, “आजी, संपल्या का पणत्या?” ती हसली, “संपायच्याच आहेत पोरी. लोकं आता दिवा लावत नाहीत, दिवा टांगतात. लावणं आणि टांगणं यात फरक आहे.” तिचं वाक्य काळजात रुतलं. लावणं म्हणजे जपणं. टांगणं म्हणजे दाखवणं.आपण दिवाळी टांगतोय, लावत नाहीये. फोटो टांगतोय, भावना नाही. शुभेच्छा टांगतोय, माणसं नाही.
त्या रात्री मी एकच पणती लावली. मातीची, तेलाची आणि तिच्यासमोर बसून राहिले. तिची ज्योत स्थिर होती. न हालणारी. जणू म्हणत होती – “इतकी वर्षं झाली, जग बदललं, तू बदललीस, पण मी अजूनही तशीच आहे. कारण मी जळते आहे, चमकत नाही.” त्या क्षणी कळलं. दिवाळीचा सण नाही, दिवाळीचा क्षण महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतः जळायला तयार होता, दुसऱ्यासाठी. जेव्हा तुमचा अहंकार तेलासारखा जळून जातो आणि वातीसारखं मन उरतं, शुद्ध, पांढरं, प्रकाश देणारं. उद्या दिवाळी आहे. घरं झगमगतील. पण एकदा सगळे दिवे बंद करून बसा आणि विचारा स्वतःला – माझ्या आतला दिवा लागला आहे का? जर लागला असेल, तरच बाहेरची दिवाळी खरी… नाहीतर ही फक्त लाईटिंग आहे…दिवाळी नाही… शुभं भवतु…!
दिवाळीच्या सर्व शिलेदार परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
=======



