0
4
8
2
9
0
गुलमोहर
निसर्गाच्या सान्निध्यात
फांदोफांदी बहरला
मंत्रमुग्ध होऊनिया
मनामध्ये मोहरला
तप्त होता रविराज
होई जीवाची काहीली
आर्त जिवाला रिझवी
गुलमोहर सावली
उभा ठाकला डौलात
गुलमोहर स्वागता
त्याचे सौंदर्य पाहून
झाला अहंकार रिता
लाल केशरी पिवळ्या
नाना रंगी उधळण
मन प्रसन्न करीत
जाई जीवनाचा क्षण
साज चढवित अंगी
आला वैशाख वणवा
मन चक्षूं सुखविण्या
गुलमोहर जाणावा
प्रा. दिनकर झाडे
गडचांदूर जि. चंद्रपूर
========
0
4
8
2
9
0



