
0
5
9
4
1
4
निर्झरा
निर्झरा अचानक काय घडले
अणूरेणूत चैतन्य चेतले
मनाला चाहूल कसली
आठवांनी पंख ल्यायले
रंगबावरे चित्त रंगले
नादभरे होऊनी गेले
अंगांगी ओढ अनामिक
असे कसे हे पिसे लागले
निसर्गही रंगात येऊनी
ताल धरला तरुलतिकांनी
पक्षीही घेत आलापी
आळविती या राग-रागिणी
दऱ्याखोऱ्यातूनी घुमले
गीत प्रीतीचे भावभरले
निर्झराचे सुरेल गाणे
सरितांनी ही गुणगुणले
अणूरेणूतून ,कणाकणांतून
सप्तस्वरांचे अमृत सिंचन
पर्वत शिखरे न्हाऊन गेली
अलवारशा या स्वरगंगेतून
वृंदा (चित्रा) करमरकर
जि.सांगली
0
5
9
4
1
4



