संत ज्ञानेश्वर : ज्ञानज्योतीचा अखंड प्रकाश
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

संत ज्ञानेश्वर : ज्ञानज्योतीचा अखंड प्रकाश
‘ज्योत से ज्योत जलाते चलो,
प्रेम की गंगा बहाते चलो…!!!
या ओळी कानावर पडल्या की, मन नकळत एका अशा ‘तेजस्वी संताच्या चरणी’ जाऊन थांबतं, ज्यांनी अवघ्या अल्पायुष्यात ‘ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली, ‘अज्ञानाचा अंध:कार दूर केला आणि प्रेमाची गंगा अखंड वाहती केली.’ ज्यांच्या ओठांतून निघालेली प्रत्येक ओवी सामान्य माणसाच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली आणि ज्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी “पसायदान” मागितले. ते म्हणजे संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊली! ज्ञान, भक्ती, समता आणि विश्वबंधुत्व यांचा अद्भुत संगम म्हणजे माऊलींचे जीवन. समाजाने दिलेली उपेक्षा, बहिष्कार आणि दुःख सहन करूनही त्यांच्या अंतःकरणात समाजाबद्दल कटुता निर्माण झाली नाही. उलट, ‘भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे’ अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांच्या मुखातून उमटली. अवघ्या काही वर्षांचे आयुष्य… पण कार्य मात्र युगानुयुगे पुरून उरणारे!
आपेगावच्या पवित्र भूमीत विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेला हा बालक पुढे महाराष्ट्राच्या अध्यात्मविश्वाला प्रकाश देणारा ज्ञानसूर्य होईल, याची कल्पना त्या वेळी कोणाला होती? मात्र या ज्ञानसूर्याच्या जीवनप्रवासाची सुरुवात सुखाच्या सावलीत झाली नव्हती. जन्मापासूनच नियतीने त्यांच्या वाट्याला संघर्ष लिहिला होता. श्रावण वद्य अष्टमीच्या पवित्र दिवशी आपेगाव येथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी ज्ञानदेवांचा जन्म झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई हे दयाळू, क्षमाशील आणि सोशिक दांपत्य. त्यांच्या पोटी जन्मलेली निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंडे पुढे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील अद्वितीय व्यक्तिमत्त्वे ठरली.
विठ्ठलपंतांनी प्रथम संन्यासाश्रम स्वीकारला; मात्र नंतर त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्या काळातील कर्मठ सनातनी समाजाला हे मान्य झाले नाही. त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना समाजाचा त्रास आणि बहिष्कार सहन करावा लागला. त्यांच्या मुलांची मुंज करण्यासही समाजाने नकार दिला. मुलांचे शुद्धीकरण करण्याचा प्रश्न निर्माण झाला. अखेर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले. आई-वडिलांचे छत्र हरपले, समाजाने वाळीत टाकले, भावंडांच्या वाट्याला दुःख आले; पण या सगळ्या यातनांनंतरही त्यांच्या मनात समाजाबद्दल कटुता निर्माण झाली नाही. उलट त्यांच्या वाणीने समाजाला सत्कर्माची आणि आत्मशुद्धीची शिकवण दिली.
“राग तम सोडून द्यावा,
लोभ दंभ गुंडाळावा;
सदा सर्वकाळ
करावा काळ सार्थक आपला.”
ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू ‘संत निवृत्तीनाथ’ हे त्यांचे गुरु होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अध्यात्माची दिशा दिली. आपल्या भावंडांना घेऊन ते पैठण येथे गेले. त्या काळी दक्षिणेची काशी म्हणून पैठण प्रसिद्ध होते. तेथील ब्रह्मवृंदाकडे त्यांनी आपल्या भावंडांच्या मुंजीचा प्रश्न मांडला; परंतु त्यांना नकार मिळाला. उलट, ‘परमार्थाचा मार्ग धरा’, असा संदेश त्यांना मिळाला. याच प्रसंगी ज्ञानेश्वरांनी “सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे” हा विचार मांडला. एका धर्मपंडिताने प्रश्न केला, “या रेड्यातही तोच आत्मा आहे का?” तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याकडे बोट दाखवत त्याच्यात आणि आपल्यात एकच आत्मतत्त्व असल्याचे सांगितले. त्यानंतर रेड्याच्या पाठीवरून हात फिरवताच त्याच्या मुखातून वेदांचे उच्चारण झाले, अशी कथा संतपरंपरेत प्रसिद्ध आहे.
हा प्रसंग पाहून उपस्थित धर्मपंडित अवाक् झाले; तरीही त्यांचा कर्मठपणा काही दूर झाला नाही. तेव्हा ज्ञानेश्वरांनी समाजातील अज्ञानापेक्षा आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला. पवित्र संगती धरावी, अपवित्रतेचा त्याग करावा आणि रात्रंदिवस भगवंताचा ध्यास धरावा, या विचाराने त्यांनी विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारला. पुढे संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितले की, भगवद्गीता हा ज्ञानाचा महान ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला त्यातील ज्ञान सहज समजत नाही. म्हणून, “हे ज्ञाना, तू हे ज्ञान मराठी भाषेत ओवीरूपाने सांग, जेणेकरून सर्वसामान्य माणसालाही अध्यात्माची वाट सोपी होईल.”
गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे गीतेचा अर्थ ओवीरूपाने सांगण्यास सुरुवात केली. सच्चिदानंद बाबा यांनी तो लिहून घेतला. या ग्रंथाला ‘भावार्थदीपिका’ असे नाव देण्यात आले आणि पुढे तोच ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ या नावाने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. ज्ञानेश्वरीतील शब्दांचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की परमार्थ आणि प्रपंच यांची सुंदर सांगड त्यात घातली आहे. गुरुच्या थोरवीबरोबरच ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेचेही कौतुक केले. “माझा मराठीचि बोलू कौतुके,अमृतातेही पैजा जिंके.”
मराठी भाषेला अध्यात्माचे सामर्थ्य देणारा हा अमूल्य ठेवा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे. या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले
“जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो;
भूतां परस्परे पडो,
मैत्र जीवांचे.”
जगातील दुष्कृत्यांचा नाश व्हावा, सत्कर्माची आवड वाढावी आणि सर्व जीवांमध्ये प्रेम व मैत्री निर्माण व्हावी, हीच त्यांची अपेक्षा होती. कित्येक शतकांपूर्वी उच्चारलेली ही प्रार्थना आजच्या अस्थिर जगासाठीही तितकीच मोलाची आहे. पुढे सर्व भावंडे पंढरपूरला गेली. तेथे संत नामदेव ज्ञानेश्वरांचे भक्त झाले. गोरा कुंभार, चोखामेळा, नरहरी सोनार अशा अनेक संतांची मंडळी ज्ञानेश्वरांच्या भोवती गोळा झाली. या संतसमुदायासोबत त्यांनी तीर्थयात्रा केली आणि पुन्हा पंढरपूरला परतले. त्यानंतर आपल्या भावंडांसमवेत ते आळंदीला आले.
याच काळात तापी नदीच्या काठी राहणारे चांगदेव महाराज आपल्या योगसामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना चौदा विद्या आणि चौसष्ट कला अवगत असल्याचे सांगितले जाते. निसर्गावर सिद्धीने नियंत्रण मिळवलेल्या या योगीच्या कानावर ज्ञानेश्वरांचे नाव गेले. ज्ञानेश्वरांना भेटावे म्हणून त्यांनी पत्र लिहिले; मात्र मायना काय लिहावा, हेच त्यांना सुचेना. अखेर त्यांनी कोरे पत्र पाठवले. मुक्ताबाईने ते कोरे पत्र पाहिले आणि सहज म्हटले “पासष्ट वर्षांचा योगी शेवटी कोराच राहिला!” संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितले, “अहंकारामुळे या योग्याला ब्रह्मज्ञान झालेले नाही. त्याला निजबोध होईल असे पत्र लिही.” गुरूंच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना पासष्ट ओव्यांचे पत्र लिहिले. या ओव्यांमधून चांगदेवांना आत्मज्ञानाचा मार्ग मिळाला. हाच ग्रंथ पुढे ‘चांगदेव पासष्टी’ म्हणून प्रसिद्ध झाला.
असाच काही काळ लोटला. ज्ञानेश्वरांना आपले जीवनकार्य पूर्णत्वाला आले आहे, अशी जाणीव होऊ लागली. त्यांनी विठ्ठलाला आईच्या मायेने साद घातली
“अगा वैकुंठाच्या राया,
निवारी माझी संसारी माया;
दर्शन देई गा विठ्ठला,
मी या नाथा तू अनाथनाथा…”
विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेल्या ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. ही बातमी संत मंडळींना समजताच सर्वांच्या मनात दुःख दाटून आले. आजूबाजूचे संत, भक्त आणि वारकरी त्यांच्या दर्शनासाठी आळंदीत जमले. अखेर तो दिवस उजाडला वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक, अलौकिक आणि अभूतपूर्व असा दिवस! कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८.अलंकापुरीत जणू तीर्थ उतरले होते. सर्वत्र नामस्मरण, कीर्तन आणि भक्तीच्या लहरी पसरल्या होत्या. अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी घेण्यासाठी सिद्ध झाले. त्या दिवशी संतांच्या डोळ्यांत अश्रू होते. आपल्या लाडक्या ज्ञानोबाला समाधीच्या विवरात उतरताना पाहून उपस्थित प्रत्येकाचे अंतःकरण हेलावून गेले. निवृत्तीनाथांनी जड अंतःकरणाने समाधीच्या विवरावर शिळा ठेवली. नामदेव महाराजांनी या प्रसंगाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांच्या जाण्याने झालेली पोकळी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केली आहे. “जणू योगेश्वररूपी सूर्य मावळला आणि सर्वत्र अंधार पसरला!”
पण खरे तर तो सूर्य मावळला नव्हता… ‘तो ज्ञानज्योतीच्या रूपाने महाराष्ट्राच्या अंतःकरणात कायमचा प्रज्वलित झाला होता.’ आज कित्येक शतके उलटून गेली, तरी ज्ञानेश्वर माऊलींची वाणी तितकीच जिवंत आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आजही मनाला आधार देतात, पसायदान आजही विश्वबंधुत्वाची शिकवण देते आणि माऊलींचा समतेचा विचार आजही समाजाला दिशा दाखवतो. माऊलींची समाधी आळंदीत आहे; पण त्यांचे विचार समाधिस्त झालेले नाहीत. ते आजही प्रत्येक मराठी मनात, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातील “ज्ञानोबा-तुकाराम” या जयघोषात जिवंत आहेत.
म्हणूनच माऊलींच्या जीवनातून आपण एकच शिकावे, ज्ञानाची ज्योत स्वतःपुरती न ठेवता ती दुसऱ्याच्या जीवनातही प्रज्वलित करूया; मनात कटुता न ठेवता प्रेमाची गंगा वाहू देऊया आणि स्वतःच्या सुखापेक्षा विश्वाच्या कल्याणाचा विचार करूया. माऊलींच्या पसायदानातील हीच विश्वकल्याणाची प्रार्थना आजच्या जगाला नव्या प्रकाशाची वाट दाखवणारी आहे
“दुरितांचे तिमिर जावो,
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो;
जो जे वांछील तो ते लाहो,
प्राणिजात.”
ज्ञानदेवांची समाधी आळंदीत असली, तरी त्यांची ज्ञानज्योत आजही अखंड तेवत आहे…
ज्ञानाची ही ज्योत अशीच तेवत राहो,
प्रेमाची ही गंगा अशीच वाहत राहो,
आणि माऊलींच्या पसायदानातील विश्वकल्याणाचे स्वप्न
आपल्या आचरणातून साकार होत राहो
हीच ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी विनम्र वंदना!
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी!
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज की जय..!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
=========



