संस्कृतीला समृध्द करणारा पंचमीत्सोव; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

संस्कृतीला समृध्द करणारा पंचमीत्सोव; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘श्रावण’ महिना म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा आणि नवचैतन्याचा मनोहारी सोहळाच जणू! आषाढातील पावसाने तृप्त झालेली धरती श्रावणात हिरवाईचा शालू नेसून अधिकच खुलून दिसते. काळेशार मेघ आकाशात दाटून येतात आणि त्यांच्या आगमनाने वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. रिमझिम पावसाच्या सरी अंगावर घेताना झाडांची पाने अधिक तजेलदार दिसतात. पानांवर साचलेले पावसाचे थेंब मोत्यांसारखे चमकतात. डोंगर दऱ्यांवर पसरलेली हिरवीगार चादर, कोसळणारे शुभ्र धबधबे आणि वाऱ्यावर डोलणारी झाडे, चिंब भिजलेली फुले, पाखरांची किलबिल, आकाशातील इंद्रधनू, दुथडी भरून वाहणारे नदी-नाले, शिवारातील डोलणारी पिके असा हा हिरवा ऋतू. याच पार्श्वभूमीवर नागपंचमीचा सण येतो. श्रावण महिना सणांचे रिंगण घेऊनच येतो. सणांची लगबग वातावरणात चैतन्य निर्माण करते. श्रावणातील शुक्ल पंचमीला येणारा ‘नागपंचमी’चा सण भारतीय संस्कृतीतील निसर्ग पूजक परंपरेचे सुंदर प्रतीक आहे.
नाग चवत हा नागपंचमीचा आदला दिवस. या दिवशी भाजके पदार्थ खाऊन उपवास करतात. ज्वारीच्या लाह्या, तंबीटाचे लाडू केले जातात. नागपंचमीला दिंडे, कडबू, गव्हाची खीर करण्याची प्रथा आहे. या सणाला मुली माहेरी येतात. झाडांवर झोपाळे बा़ंधले जातात. तसेच झिम्मा फुगडीखेळणे, फेर धरणे आदि पारंपारिक खेळ खेळून मुली मैत्रिणींसह रात्री जागवतात. पंचमीची कहाणी घरोघरी वाचली जाते. नागाच्या मातीच्या प्रतिमा़ंची पूजा केली जाते. सांगली जिल्ह्यातील शिराळ्यातील नागपंचमी प्रसिध्द आहे.
नागपंचमी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि इतर अनेक राज्यांत विविध परंपरांनी साजरी होते. नागांची प्रतिमा किंवा वारूळाची पूजा, दूध-दही अर्पण करणे आणि नैवेद्य दाखवणे अशा प्रथा आढळतात. साप हे पृथ्वीवरील अतिशय प्राचीन प्राणी आहेत. जीवाश्मांच्या (fossils) आणि उत्क्रांतीच्या पुराव्यां नुसार सापांचे पूर्वज साधार ण १० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असावेत. म्हणजे डायनासोरांच्या काळातही सापांचे पूर्वज पृथ्वीवर होते. कालांतराने त्यांच्या पायांचा आकार कमी होत गेला आणि पुढे सध्यासारखे पाय नसलेले साप विकसित झाले. आज जगभरात सापांच्या ३,००० पेक्षा जास्त जाती आहेत. सापा़च्या अंगावरील खवले त्या़च्या त्वचेचे रक्षण करतात. भारतात आढळणाऱ्या सापांपैकी काही विषारी, तर अनेक बिनविषारी आहेत. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे प्रमुख विषारी साप; तर धामण, अजगर, तस्कर, पाणसाप आदी बिनविषारी साप आहेत. त्यामुळे साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. सापांविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत; प्रत्येक साप विषारी असतो किंवा साप सूड घेतो, हे गैरसमज आहेत.
आदिमानवाने निसर्गातील शक्तींना देवतारूप मानून त्यांची पूजा केली. सूर्य, वृक्ष, नद्या, पर्वत यांच्याप्रमाणे नागालाही पवित्र मानले गेले. भारतीय संस्कृतीत नाग देवतेला श्रद्धेचे स्थान मिळाले. मात्र जिवंत सापाला दूध पाजणे योग्य नाही; सापांना पकडून प्रदर्शन करणेही टाळावे. पुंगीच्या सुरांवर साप डोलतो असे दिसते; प्रत्यक्षात तो संगीताच्या तालावर नाचत नसतो. तो पुंगीच्या हालचालींकडे लक्ष देऊन शरीराची हालचाल करतो. साप हा जैविक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. तो उंदीर व इतर काही जीवांची संख्या नियंत्रित करून शेतीचे संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे सापांविषयीची भीती किंवा अंधश्रद्धा न बाळगता त्यांचे पर्यावरणातील स्थान समजून घेणे आवश्यक आहे. नागपंचमी म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर माणूस आणि निसर्ग यांच्यातील सहअस्तित्वाची जाणीव करून देणारा सण आहे.
नागांची प्रतिकात्मक पूजा करणे आणि सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू देणे, हीच खरी श्रध्दा आहे. सापांविषयीची भीती किंवा अंधश्रद्धा न बाळगता त्यांचे पर्यावरणातील स्थान समजून घेणे आवश्यक आहे. परंपरेचा सुगंध आणि आधुनिक पर्यावरणदृष्टी यांची सांगड घालत साजरी झालेली नागपंचमीच खऱ्या अर्थाने संस्कृतीला समृद्ध करणारी ठरेल. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘पंचमीत्सोव’ हा विषय सणाचे औचित्य साधून दिला आहे. शिलेदारा़नी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला या काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल राहुल सरांचे मनापासून आभार.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



