रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कुटुंब प्रबोधन कार्यशाळा व स्नेहमेळावा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कुटुंब प्रबोधन कार्यशाळा व स्नेहमेळावा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे.दि.1डिसें (प्रतिनिधी) रा.स्व.संघ शताब्दी वर्षानिमित्त कुटुंब प्रबोधन मंचाच्या वतीने गोखले नगरच्या एकलव्य शाखेत कुटुंब प्रबोधन कार्यशाळा व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. भारतीय परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण कुटुंबमूल्य रूजवण्याचे व जपण्याचे कार्य प्रबोधन मंचातर्फे करण्यात येते.
त्या अनुषंगाने या मेळाव्यास प्रमुख वक्ते श्री. सुहास फडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कुटूंबामध्ये भाषा, भूषा, भ्रमण, भजन आणि भोजन हे कुटूंबाने सहमतीने आणि एकत्रितपणे करण्याचे खूप महत्व आहे. यातून परिवारातील सर्व सदस्याचे परस्पर नाते दृढ होऊन एक सक्षम कुटूंब तयार होते. आपल्या राष्ट्रीय विचारधारेत सक्षम कुटुंबांमुळेच सक्षम समाज बनत असल्याचे मानले जाते, असे सांगून फडके यांनी सामर्थ्यशाली राष्ट्रासाठी “अमृत परिवार” ही संकल्पना बोधकथेच्या माध्यमातून मनोरंजकपणे सांगितली. यावेळी “कुटुंब मित्र” कार्यकर्ता म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करून त्यांनी मा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते एका समारंभात कुटूंब मित्रांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
मेळाव्यात “मन करा रे प्रसन्न” या संकल्पनेवर श्रीमती भारतीताई खरे यांनी आपले विचार मांडून सुदृढ निरोगी शरीरासाठी व्यायामाचे महत्व विशद केले आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. ॐकार भजनीमंडळाचे भजन गायन, प्रश्नमंजुषा ई. मनोरंजक कार्यक्रमांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संपूर्ण वंदेमातरम् गायन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर अनगळ यांनी केले. उपस्थित पदाधिका-यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ झाला. दिलीप जोशी यांनी कुटूंब प्रबोधन पद्य सादर केले. अरूण रानडे यांनी सूत्रसंचालन केले. समारोप व आभार प्रदर्शन मारूतीराव सरगर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यापीठ युनियनच्या सभागृहात साज-या झालेल्या या कार्यक्रमात एकलव्य शाखेचे सर्व स्वयंसेवक सहकुटुंब उपस्थित होते.



