हक्क बजावताना कर्तव्याचा विसर नको: वृंदा करमरकर
सोमवारीय काव्य त्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
हक्क बजावताना कर्तव्याचा विसर नको: वृंदा करमरकर
सोमवारीय काव्य त्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘हक्क’ या संकल्पनेचा विचार केला असता, आपल्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे हक्क डोळ्यांसमोर येतात. हक्क म्हणजे व्यक्तीला कायद्याने दिलेले संरक्षण व स्वातंत्र्य होय. हे हक्क आपल्याला सन्मानाने व सुरक्षितपणे जगण्यासाठी मदत करतात. आपल्याला शिक्षणाचा हक्क आहे. प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी हा हक्क दिला आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो व समाज प्रगतीकडे जातो.तसेच बालहक्क खूप महत्त्वाचे आहेत. कुठेही अल्पवयीन मुलांवर अन्याय, शोषण किंवा लैंगिक शोषण होत असल्यास त्याविरुद्ध तक्रार करण्याचा हक्क आपल्याला आहे.
तसेच माहितीचा हक्क (RTI) नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार देतो. अशा प्रकारे हक्कांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. हक्कांची जाणीव असल्यास आपण स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करू शकतो आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपल्याला मतदानाचा हक्क आहे म्हणजे सरकार निवडण्यासाठी मत देण्याचा अधिकार आहे.१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे.
सर्व जाती, धर्म, लिंगासाठी हा समान हक्क आहे. मतदान लोकशाहीत नागरिकांची भूमिका दाखवते. मत देणे गुप्त असते. मतदानाचा हक्क वापरणे ही जबाबदारी आहे. यामुळे नागरिक देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात.मतदान लोकशाही टिकवण्यासाठी मदत करते. प्रत्येक नागरिकाने हा हक्क बजावावा.पण आपले अमूल्य मत विकू नये.
कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मत दिले पाहिजे. हक्क आणि कर्तव्य या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हक्क बजावताना कर्तव्याचा विसर पडू नये, तर कर्तव्याचेही भान हवे. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आपल्या आदरणीय राहुल सरांनी ‘हक्क माझा’ हा ज्वलंत विषय दिला. मला परीक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल मी राहुल सरांचे आभार मानते. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



