Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

दे धमाल… बेमिसाल…! मैत्रीचा आनंद मेळावा

अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर

0 4 8 2 8 4

दे धमाल… बेमिसाल…! मैत्रीचा आनंद मेळावा

काळ पुढे सरकत जातो.
जबाबदाऱ्या वाढत जातात.
जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात.
पण मनाच्या एका कोपऱ्यात
मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते’
फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत…
आणि अशीच एक हाक आली..
चला.. अंकुर व्हॅली येथे ‘दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर’ साठी.

जवळजवळ चार दशकांनंतर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयचे माजी विद्यार्थी ‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले. ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती; ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती. ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती. अहमदनगरपासून काही अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील ‘अंकुर व्हॅली’मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

आगमनाच्या क्षणीच
गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत
मनाला स्पर्शून गेले.
त्या सुगंधी क्षणांनी
मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच
भेटीत सुंदर सुरुवात दिली.

धुळीत हरवलेली पायवाट
आज पुन्हा हसत भेटली;
वय वाढलं, काळ बदलला,
पण मैत्री तशीच राहिली.

रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती. मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं; पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं. एकेक आठवण उलगडत गेली, हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला. या सुंदर मेळाव्यामागे ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती. एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. त्यांना साथ देणारे सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले, दत्ता नेवसे, सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे, सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे यांचे आणि उपस्थित सर्वांचेच परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले.

प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे, अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले. दादा पाटील महाविद्यालयातून ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो. गुरुजनांचे संस्कार, आई-वडिलांची पुण्याई आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली. शिक्षण, नोकरी, संसार या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं; स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली.

“तेव्हाचा मी आणि आजचा मी” असं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत साठीकडे झुकलेलं वय. पण मन मात्र अजूनही तरुण! हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली; आठवणी बोलक्या झाल्या; आज पुन्हा एकदा आपण ‘आपले’ झालो. या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे, मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग. गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे आणि मनमोकळं हास्य या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं.

मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते,
तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं.
हसण्यातून हसू वाढतं,
आणि आयुष्य अधिक हलकं होतं.

याप्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना “प्रफुल्लित मने” हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते; तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती. निरोपाच्या क्षणी आप्पासाहेब होले यांनी एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्या क्षणातही आपुलकीची उब होती. ‘अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण, आपुलकीचे आदरातिथ्य, सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था’ या सर्वांनी आनंद द्विगुणित केला.

हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती; तो काळाशी केलेला संवाद होता. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही. ती फक्त नव्याने उमलत राहते. असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत… मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो. हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा…!

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे